अक्कलकोट माहात्म्य दर्शन भाग 03



श्री स्वामी समर्थ
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
स्वामी वैभव दर्शन भाग -02
॥ श्री स्वामीसुताची सत्यवाणी ॥
पुष्प 08 वे
अक्कलकोट माहात्म्य दर्शन भाग 03
तीर्थशिरोमणी तीर्थराज अक्कलकोट !
स्वामी भक्तांनो......
               आपण मागिल काही दिवसांपासून स्वामीसखा श्री हरिभाऊ तावडे यांच्या दिव्य अनुभूतीपर रचनाद्वारे ब्रह्मांडनायक स्वामी महाराजांचे स्वरूप उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत. या भावपुर्ण रचनाकडे बारकाईने पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की, सद्गुरू कृपेने काहीही अशक्य नाही. कारण पुर्वीचा व्यापारी असलेला आणि आकडे मोडीशिवाय ईतर फारसा लेखन क्षेत्रांशी संबंध नसलेला हरिभाऊ हा केवळ स्वामी कृपेने महर्षी व्यास मुनींनाही लाजवेल अशा उत्कृष्ट रचनाद्वारे स्वामींची वामय सेवा करत आहे. ही श्रींची कृपादृष्टी नाही तर काय आहे ! असो.

               यापूर्वीच्या दोन पुष्पाद्वारे आपण ‘अक्कलकोट माहात्म्य दर्शन’ जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अन् आजचे पुष्प ही आपल्यापुढे अक्कलकोटचेच महत्व प्रतिपादन करणारे आहे. आजच्या तिसऱ्या आणि या लेखमालेतील अंतिम अक्कलकोट माहात्म्य पुष्पा नंतर मग आपण ईतर विषयाकडे वळणार आहोत.
               सज्जनहो, आपल्याला प्रश्न पडला असेल की, अक्कलकोटचे महत्व आणि माहात्म्य सर्वांना माहित असताना प्रस्तुत लेखकाने या विषयावर एवढे लिखाण का केले असावे ? तर याचे कारण म्हणजे अक्कलकोटचे महत्व जगात प्रसिध्द आहे, हे जरी त्रिवार सत्य असले तरी, या अक्कलकोटात नेमके काय महत्वाचं आहे ? येथे आल्यावर आपण नेमके काय केले पाहिजे ? याची माहिती व्हावी आणि त्यानुसार आपण अक्कलकोटी आल्यावर वर्तन करावे. या शुध्द हेतूसाठी हे लिखाण केले आहे. ‘स्वामी वैभव दर्शन भाग-01’ मधील प्रथम पुष्प वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की, अक्कलकोटी जाणे व तेथे स्वामींना प्रदक्षिणा घालणे आणि स्वामींच्या समोर बसून ध्यान करणे हे लक्षावधी यज्ञापेक्षाही जास्त श्रेष्ठत्तर आहे. हजारो वेळा केलेल्या गंगा स्नानापेक्षाही जास्त पुण्यप्रद आहे. हिच माहिती आपल्यापर्यंत योग्य आणि शुध्द स्वरूपात पोहोचविण्यासाठी हा लेखन प्रंपच केला आहे. तर काही पंथ हे ‘स्वामींच्याच नावावर पोट भरतात आणि स्वत:ला स्वामीपेक्षाही मोठे समजून, आपल्या अनुयांयाना अक्कलकोटी जाऊ नका, असा पाताळयंत्री सल्ला देतात.’ अशा लोकांचे ऐकून अक्कलकोटाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मदरिद्री लोकांना सत्यता पटवून देणे व आपल्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी अक्कलकोटी नतमस्तक होण्यास बाध्य करणे हाही एक उद्देश्य या लेखनाचा आहे. जेणेकरून बुवा-बाबांच्या नादी लागून आयुष्याचे मातोरे करण्यापेक्षा अशा ढोंगी बाबांची पावलोपावली फजिती करणाऱ्या परब्रह्म भगवान स्वामी महाराजांना सर्वांनी शरण जावे. स्वामींच्या चरित्राचा बारकाईने अभ्यास करून स्वामींनी सांगितलेला मुळ मार्ग व या पाखंडी लोकांनी दाखवलेला चुकीचा मार्ग यातील खोटारडेपणा उघड होईल. हाच प्रामाणिक हेतू या लेखन प्रपंचाचा आहे. असो. आपण आता श्री स्वामीसुत महाराजांच्या अलौकिक प्रतिभेतून उत्फुर्तपणे बाहेर पडलेल्या आणि यातील प्रत्येक शब्दाला स्वामींनी वेदवाक्याप्रमाणे सत्य करून दाखवलेल्या अक्कलकोट माहात्म्याला प्रारंभ करू या.....
अक्कलकोटीं जातां चाले वाट पायीं ।  भवपार होई तोचि देखा ॥1॥
पाऊलापाऊली पुण्याची ही जोडी ।  चालावें आवडी नाम गात ॥2॥
स्वामीराय ज्यानें पाहिला विशाळ ।  गेले ते सकळ दोष त्याचें ॥3॥
स्वामीराय ज्यानें देखियेले दृष्टीं।   भाग्यवंत सृष्टिमाजीं तोचि ॥4॥
स्वामीकुशावर्ती ज्यानें केले स्नान।   झालीं त्यालागून सर्व तीर्थें ॥5॥
स्वामीरायें हेंचि महातीर्थ केलें ।  कलियुगीं भले जगदोध्दारा ॥6॥
तयामाजीं स्नान करीतां पावन ।  उध्दरती जन निश्चयेंसी ॥7॥
जन्मांतरी नाही त्यासी कांही दु:ख ।  एकचि श्रीमुख देखिलिया ॥8॥
सर्व सृष्टिजनां, मुक्तीचें हो घर।   असे तें साचार, तया चरणीं ॥9॥
निरंजनीची ठेवी आली ही हातासी।   घ्या हो अहर्निशी तुम्हीं त्यासी ॥10॥
स्वामीसुत म्हणे भूवैकुंठी गेला ।  तोचि एक भला जगीं जाण ॥11॥
               पुर्ण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेल्या अक्कलकोटचे  महत्व विषद करताना स्वामीसुत सांगतात, लोकहों, माझ्या स्वामीरायांचे अक्कलकोट हे सर्वश्रेष्ठ धाम आहे. मुक्तीचे माहेरघर आहे. येथे येणारा प्रत्येक जीव हा धन्य होतो. जो जो कोणी अक्कलकोटची वाट आपल्या पायाने चालतो, त्याचा भवपार निश्चितच तरूण जातो.  तो जन्म-मरणाच्या भवतापातून मुक्त होतो. अक्कलकोटकडे पडणाऱ्या प्रत्येक पावलोपावली मिळणारे पुण्य अगणित आहे. याचे कोणीही मोजमाप करू शकत नाही. तेव्हा मुखाने स्वामीनाम घेत अक्कलकोटकडे वाटचाल करावी. मनात स्वामी भेटीची ओढ ठेवावी. प्रत्येक पावलागणिक वाढणारी स्वामी भेटीची ओढ ही तुम्हाला स्वर्गप्राप्तीचा आनंद मिळवून देणारी आहे. याच तीव्र ओढीने स्वामींच्या दरबारी जाऊन ज्याने स्वामी महाराजांचे ते विशाल आणि सर्वांगसुदंर मनोहर रूप पाहिले, त्याच्या जन्मजन्मांतरीचे सर्व दोष नष्ट होऊन तो पुण्यवान ठरतो. त्याचे सर्व दोष जळून खाक होतात. ही श्री चरणांची किमया आहे. असे स्वामीसुत सांगतात. पुढे हेच अधिक स्पष्ट करून सांगताना म्हणतात की, ज्या मनुष्याने आपल्या चक्षूने स्वामींरायांचे दर्शन घेतले किंवा ज्याच्या दृष्टिला हे स्वामीचरण पडले, तो या सकल सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ आणि भाग्यवंत आहे. त्याच्या भाग्याची सीमाच नाही. एवढे स्वामींचे दर्शन पुण्यकारक आणि फलप्रद आहे.
               यापुढे स्वामीसुत म्हणतात, अक्कलकोटी गेल्यावर ज्याने स्वामींच्या कुशावर्ती तीर्थात स्नान केले किंवा या तीर्थातील एक थेंब पाणी जरी आपल्या शरीरावर पडले तरी सुध्दा आपल्याला सर्व तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य मिळते. तेव्हा आता प्रश्न उरतो की, हे कुशावर्त तीर्थ अक्कलकोटात कुठे आहे ? आजगायत आपण याचे नाव ऐकले नाही. तर सज्जनहो, स्वामींचे प्रियतम शिष्य श्री चोळाप्पा महाराज यांच्या घरातील विहिर म्हणजेच हे ‘कुशावर्ती तीर्थ’ होय. या कोरड्या पडलेल्या विहिरीला स्वामी देवांच्या कृपेने पाणी आले, आणि हे पाणी म्हणजे ‘कुशावर्ताचे तीर्थ आहे !’ असे स्वामींनी उपस्थितांना सांगितले.  या विहिरीतील पाणी हे सर्व तीर्थक्षेत्रीच्या पाण्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे. असे स्वामी वचन असल्यामुळे, ही विहीर म्हणजे एक महातीर्थ झाली आहे. स्वामींनी आपल्या सामर्थ्याने हे महातीर्थ निर्माण केले आहे, या महातीर्थात स्नान करणारा मुक्त होतो. आपल्या अन्य एका अभंगात स्वामीसुत म्हणतात, ‘स्वामी कुशावर्ती स्नान | करिता मोक्ष त्यालागून ||  बारा वेळ काशीतीर्थ | एक वेळ कुशावर्त ||’ यावरून आपल्याला या महातीर्थाचे महत्व लक्षात येईल. या तीर्थातील पाणी शरीरावर पडल्याने, याच्या स्नान मात्राने आपला देह पवित्र होतो, आपला उध्दार होतो. एवढेच काय ‘स्नान करिता गोहत्या | जाय तशी ब्रह्महत्या ||’ असे विलक्षण फल देणारे हे तीर्थ आहे. या कलियुगातील लोकांचा उध्दार करण्यासाठी, जगदोध्दारासाठी परब्रह्माने हे तीर्थ निर्माण केले आहे, असे स्वामीसुत आवर्जुन सांगताना दिसतात.
               ज्यांनी हे महातीर्थ निर्माण केले आहे, त्या पुर्णब्रह्म स्वामी महाराजांचे मुखमंडल ज्याने पाहिले, त्याला जन्मांतरी कोणतेही दु:ख येणार नाही. उलट तो पुण्यात्मा हा या सुख-दु:खाच्या खुप पुढे निघून जाईल. त्याला मुक्ती मिळेल. या अखिल सृष्टीत मुक्ती मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे श्रींचे मुखमंडल दर्शन होय. श्रींच्या चरणी सर्व मुक्ती नतमस्तक झालेल्या आहेत. तेव्हा ज्याला मुक्ती हवी त्याने श्रींचे मुखमंडल पाहावे. असे स्वामीसुत बजावताना दिसतात. जशी एखादी निरंजन हजारो वर्षाचा काळोख एका क्षणात नष्ट करते. अगदी तसेच लक्ष 84 योनी फिरलेल्या या जीवाला मुक्त करण्यासाठी केवळ स्वामी चरण पुरेसे आहेत, या श्री चरणांचे रात्र-दिवस आपण ध्यान करावे. यांची पूजा अर्चना करावी. असे स्वामीसुत सांगतात.
               शेवटी स्वामीसुत म्हणतात, या भूवैकुंठ असणाऱ्या अक्कलकोटी जो कोणी भला माणूस जातो, त्याचा उध्दार निश्चित होतो. अक्कलकोटी जाणारा जीव हा सर्व देवी देवतांचा सुध्दा लाडका होतो. एवढे महत्व अक्कलकोट भूमीचे आहे. येथे जाणारा जीव सर्व जगात वंदनीय आहे. सर्वश्रेष्ठ आहे. असे स्वामीसुत स्वानुभवाने स्पष्ट करताना दिसतात. ही भूमीच एवढी पवित्र आणि पावन आहे की, जेथे राहण्याचा मोह परब्रह्माला ही आवरता आला नाही. अन् या पावन भूमीत स्व:त परब्रह्म 23 वर्षे सलग राहिल्यामुळे आता ही भूमी वैकुंठापेक्षाही लाखपट जास्त श्रेष्ठत्तर झालेली आहे. अक्कलकोटची प्रत्येक वस्तू आणि वास्तू स्वामींच्या स्पर्शाने पवित्र झालेली आहे, येथिल प्रत्येक बाबीला एक आगळेवेगळे महत्व आहे. एक विलक्षण उर्जा आहे. स्वामी महाराजांचा पदस्पर्श झाल्यामुळे येथिल प्रत्येक मातीचा कण ही मोक्षकारक आहे. त्याची योग्यता हजारो वर्ष साधना करणाऱ्या योग्यापेक्षाही हजारपट जास्त आहे. असे हे भूवैकुंठ अक्कलकोट धाम आहे. या अक्कलकोटी जाऊन आपण आपले कल्याण साधावे. असा उपदेश स्वामीसुत आपल्या या अभंगातून देताना दिसतात.
               सज्जनहो, ही एकट्या स्वामीसुतांची अनुभूती आहे. असे स्वामीसुतासारखे अक्कलकोटी जाऊन धन्य झालेले लाखो जीव आहेत. ज्यांना स्वामी कृपेचे अमृतपान पिण्यास मिळाले. श्रींचा कृपाशिर्वाद मिळाला. या सर्वांचेच जवळपास वरील प्रमाणेच अनुभव आहेत. स्वामी कृपेने धन्य झालेले हे जीव सदैव स्वामींच्या या पूण्यभूमीचे ऋणी राहिले, त्यामुळेच त्यांनी मुक्तकंठाने अक्कलकोटचे व तेथिल स्वामी चरणांचे महत्व प्रतिपादन केले. आपले सद्गुरु परब्रह्म स्वामी महाराजांच्या या पूण्यभूमीचे माहात्म्य जगभर प्रसारीत केले. ही त्यांची एकनिष्ठ शिष्यवृत्ती आणि सद्गुरूंप्रती आदरभाव होता. म्हणून त्यांनी कायम अक्कलकोट ही आपली मोक्षभूमी, मायभूमी मानून तिचे गुणगाण केले. आता जे लोक अक्कलकोटकडे दुर्लक्ष करून आपले स्वत:चे महत्व वाढवण्याचा निरर्थक यत्न करतात. त्यांची स्वामी महाराजांप्रती असणारी निष्ठा ही किती फसवी आहे, याची जाणीव आपल्याला झाली असेल. तेव्हा आपण अशा लोकांच्या शब्दभ्रमात न अडकता तातडीने अक्कलकोट जवळ करावे आणि आपले सर्वस्वी कल्याण साधावे. हिच आंतरिक प्रार्थना करून, येथे विरामू या...! जाता जाता स्वामींचे प्रेमळ नाम आपल्या मुखी घेऊ या.........
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
श्री स्वामीसुत महाराज की जय 
॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥