॥ श्री स्वामी समर्थ ॥
॥ श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥
॥ स्वामी वैभव दर्शन भाग
-02 ॥
॥ श्री स्वामीसुताची सत्यवाणी ॥
पुष्प 11 वे
स्वामी भजनाचा लागो छंद
!
स्वामी भक्तांनो
‘जगाच्या
कल्याणा संताच्या विभूती । देह झिजविती परोपकारे ॥’ या
उक्तीप्रमाणे आपल्या देशात असंख्य संत महात्म्यांनी जगत् कल्याणाचे कार्य केले.
दिशाहिन मानवाला योग्य मार्ग दाखविला. हे सर्व कार्य संतानी अहोरातपणे आणि
विनामुल्यपणे केले. केवळ मानवाचे कल्याण होऊन, त्याने आपले हित साधावे, हाच एकमेव
उद्देश संताचा होता. हे कार्य करताना सर्वच संताना अतोनात त्रास सहन करावा लागला.
अनेक प्रकारचा छळ सहन करावा लागला. परंतू तरी सुध्दा ही संत मंडळी मागे हटली नाही
किंवा आपल्या कर्तव्यापासून विन्मुख झाली नाही. उलट दर्शी त्यांनी आपल्या कार्याची
गती वाढवली, त्रास देणाऱ्याला ही पुन्हा पुन्हा योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न
करून त्याचे सर्व अपराध पोटात घालण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली. एवढे
विशाल ऱ्हदय संताचे होते.
त्यांना मान आणि अपमान हे दोन्हीही कस्पटासमान होतो,
म्हणून ते ना सन्मानाने सुखी होत ना अपमानाने दु:खी होत. अशी विरक्त अवस्था
प्राप्त झाल्यामुळेच ते संत पदाला पोहचले होते. त्यांना ना धनाचा मोह होता ना प्रसिध्दीची
आकांक्षा होती. ते यासर्व षड् विकारापासून मुक्त होते. संताची अवस्था व्यक्त
करताना एके तुकाराम महाराज म्हणतात, ‘सोने रुपे आम्हा मृत्तिकेसमान। माणिक पाषाण
खडे जैसे ॥’ यावरून आपल्याला संताची वैराग्य स्थिती लक्षात येते. आजच्या युगात
खऱ्या संताची ओळख होण्यासाठी वरील गोष्टी जर त्या संताना लागू झाल्या तर तो खरा
संत आणि जर याविरूध्द जर त्याचे आचरण असेल तर मग तो पाखंडी. अशी ओळख आपल्याला करता
येईल. असो.
अशाच एका परोपकारी आणि आपले सर्व ऐश्वर्य लोकांत लूटवून
गृहत्याग करणाऱ्या संताची अभंग मालिका आपण पाहात आहोत. श्री स्वामीसुत हे सुध्दा
स्वामी कृपेने अत्यंत विरक्त झाले होते. स्वामी नामात रंगून गेले होते. स्वामी
सेवेचा प्रचार-प्रसार आणि जगत् कल्याण याशिवाय ईतर कोणताही निजध्यास त्यांना
नव्हता. आपल्या शरीरातील रक्ताचा एक न एक थेंब हा विश्व कल्याणासाठी खर्ची पडावा,
अशी धारणा त्यांची होती. आपला प्रत्येक अवयव हा केवळ स्वामी नामात खर्ची पडावा,
अशी दृढ ईच्छा त्यांची होती. याच गोष्टी त्यांनी एका अभंगातून स्वामी महाराजांना
मागणी स्वरूपात मागितल्या आहेत. तोच अभंग आपण आज पाहणार आहोत. चला तर मग
स्वामीसुतांच्या पवित्र मनाची अवस्था प्रकट करणारा आजचा अभंग आपण पाहू या...
स्वामीबापा, माझे मागणे तुजपासी। विघ्न भजनासी
येऊ नये ॥1॥
तुझा हा निरोप सर्वांसी मी देतो । तुझे नाम गातो आवडीने ॥2॥
तेथेहि उपाधी न बाधो सर्वथा । बापा दिनानाथा सांभाळावे ॥3॥
स्वामीसुत म्हणे तूचि बाप धनी । सांभाळी भजनी बाळकासी ॥4॥
अभंगाच्या
सुरूवातीलाच स्वामीसुत स्वामी महाराजांना साकडं घालून विनंती आर्जव करताना दिसतात.
ते म्हणतात की, हे स्वामी मायबापा ! मी तूझे लेकरू आहे, तु माझी माता आहेस. तुझ्याशिवाय
या नश्वर जगात माझे कोणीही नाही. माझा दाता, त्राता केवळ तुच आहेस. तेव्हा माझे एक
मागणे तुजपासी आहे, तेवढे पुर्ण कर. एकच गोष्ट मला दे, ती म्हणजे माझ्या मुखातून सतत
तुझे भजन होऊ दे. त्यात कधीही खंडण पडू देऊ नकोस किंवा माझ्या भजनात विघ्न येऊ देऊ
नकोस. हिच माझी विनंती आहे. मला ईतर काहीही नको, धन, दौलत, ऐश्वर्य यापैकी काहीही नको.
फक्त कायम तुझे नाव ओठी राहावे, एवढेच दान मला दे. त्यात कसलेही विघ्न येऊ नये, हाच
आशिर्वाद मला दे. माझे चंचल मन ईतर कोणत्याही क्षणभंगूर गोष्टीत अडकणार नाही, अन् या
नश्वर जगात मला गुंतवणार नाही. एवढीच कृपा तुझी राहू दे. दीन दयाळा, हिच वारंवार विनंती
तुला आहे. असे स्वामीसुत स्वामींना विनवतात.
पुढे स्वामीसुत म्हणतात, स्वामीराया ! तुम्ही माझ्यावर कृपा
केली, माझे सर्वस्वी कल्याण झाले. हा तुमचा भक्तवत्सलपणा आहे. आपण भक्ताभिमानी आहात,
शरणांगतवत्सल आहात, दीनजनउध्दारक आणि पतीतपावन आहात. एवढेच नाही तर अन्यन्य भावाने
शरण आलेल्यांचा संपुर्ण योगक्षेमं मी चालवतो. हे तुमचे अभिवचन आहे. हाच तुमचा सहजस्वभाव
आहे. तेव्हा तुमचा हा निरोप मी सर्वांना पोहोचविण्याचे काम करतो. सर्वांना आपल्या चरणी
अन्यन्य भावाने शरण येण्यासाठी जागृत करतो. आवडीने तुमचे नाम गातो, तुमच्या नामाची
गोडी सर्वांना लावतो. सर्व जनमाणसांतील अज्ञान दुर करून, अहंभाव नष्ट करून त्यांना
आपल्या चरणी नतमस्तक होण्यासाठी साकडे घालण्याचे काम मी करतो. प्रपंचात किंवा मायामोहात
अडकलेल्या सर्व जीवांना तुमच्या भजनाचे वेड लावण्याचे कार्य करतो. ‘बुडती हे जन न देखवे
डोळा’ या उक्तीप्रमाणे सर्वांना सन्मार्गाला लावण्याचे कार्य तुमच्या कृपेने करतो.
परंतु हे परब्रह्मा ! हे कार्य करत असताना, तुझ्या नामाचा
प्रसार करत असताना, एका गोष्टीची काळजी तूम्ही घ्या. ती म्हणजे हे कार्य करताना, हे
सर्व मीच करत आहे, असा अहंभाव माझ्या मनात निर्माण होऊ देऊ नका. किंवा माझ्यामुळे इतक्या
लोकांना फायदा झाला, असा वृथाभिमान माझ्या मनात शिरु देऊ नका. मी केवळ आपला सेवक आहे.
आपण सांगाल ती कामगिरी करणे, हिच माझी चाकरी आहे. या पलिकडे माझी काहीही लायकी नाही.
तेव्हा हे अल्पसे काम करत असताना, मी कोणत्याही उपाधीमध्ये अडकणार नाही, असा आशिर्वाद
मला द्या. वृथा मोठेपणा मिळवून माया माझा आत्मघात करणार नाही. एवढीच कृपा माझ्यावर
अखंड ठेवा. हे स्वामीनाथा ! आपल्या ईच्छेशिवाय वृक्षाचे पान ही हालत नाही. किंवा प्रत्यक्ष
वारा हा सुध्दा आपल्या आज्ञेने वाहत असतो. या जगात आपल्या ईच्छेशिवाय कोणतेही गोष्ट
घडत नसताना, मी हे केले, मी ते केले. असा वृथाभिमान माझ्या मनात निर्माण होऊ देऊ नका.
कर्ता करविता आपणच आहात. तेव्हा आपल्या नाम चितंनाचे प्रचार कार्य करताना, मी कोणत्याही
उपाधीने, पदवीने बाधला जाऊ नये, अशी कृपा माझ्यावर करा. मी कोणत्याही उपाधीने, पदवीने,
मोठेपणाने हुरळून जाऊन आपलाच आत्मघात करून घेणार नाही, एवढी माझ्यावर कृपा करा. अशा
वेळी मला सांभाळा, मला योग्य मार्ग दाखवा. हे दीनानाथा, अशा प्रसंगी माझा तोल ढळणार
नाही किंवा मायेचा आघात माझ्यावर होणार नाही. एवढीच भिक्षा मला द्या. हिच प्रार्थना
आपल्या चरणी आहे.
अभंगाच्या शेवटी स्वामीसुत म्हणतात, हे स्वामीप्रभो ! सृष्टीच्या
उत्पत्ती, स्थिती आणि लयास तुच कारणीभूत आहेस. या अनंत ब्रह्मांडाचा नायक ही तूच आहेस.
आम्ही सर्व तुझीच लेकरे आहोत. आमचा मायबापधनी तूच आहेस. तुझ्याशिवाय ईतर सर्व नाते
हे भ्रमाचे भोपळे आहेत. ते कधीतरी फुटणारच. पण तू हा अनंत आणि अविनाशी अंतिम तत्व आहेस.
तुझा आदि ही नाही आणि अंत ही नाही. तू अनादि आहेस. अर्तक्य आहेस. बुध्दीची देवता श्री
गणेश आणि श्री सरस्वती माता यांचाही उत्पत्तीकर्ता तूच आहेस, म्हणून तुला बुध्दीने
कधीही आणि कोणालाही जाणता येणार नाही, एवढा अगम्य परब्रम्ह परमात्मा तू आहेस. ज्या
मायेने भगवान शंकराली ही मोहिनी रूप घेऊन भुलविले, आपल्या प्रभावाखाली आणले, त्या मायेचा
उत्पत्तीकारक तूच आहेस. म्हणूनच तुला मायाधिपती असे म्हणतात. अशा सर्वेश्वर स्वामीराया
! माझ्यावर एकच कृपा कर. तुझे भजन करत असताना मला कोणतीही गोष्ट बाधा आणणार नाही, माझ्यावर
कोणतेही विघ्न येणार नाही. किंवा कोणतीही गोष्ट माझे चित्त विचलित करणार नाही. मला
माझ्या मार्गापासून दूर नेणार नाही. एवढीच कृपादृष्टि माझ्यावर ठेव. तूच माझा बाप,
तूच माझी माय आणि तूच माझा धनी आहेस. तेव्हा हे दयाळा, मला एवढेच दान दे. तुझ्या भजनाचा
छंद असाच राहू दे ! हा छंद कायम राहावा, यासाठी तूच माझा सांभाळ कर. हिच शेवटची कळकळीची
प्रार्थना…!
सज्जनहो, आपल्याकडून ही स्वामी महाराजांनी अशीच सेवा करून
घ्यावी, कोणतीही गोष्ट आपले चित्त विचलित करू शकणार नाही, किंवा आपण ईतर नश्वर गोष्टीत
भरकटत जाणार नाहीत, असाच शुभाशिर्वाद आपण स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून
मागू या ! अन् स्वामीसुत महाराजांप्रमाणे निष्काम, निर्लोभी अशी स्वामींची भक्ती करू
या. असाच स्वामी कार्याचा प्रसार-प्रचार करू या…..
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री
स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
॥ श्री स्वामीसुत महाराज की
जय ॥
॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥