॥ श्री स्वामी समर्थ ॥
॥ श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥
॥ स्वामी वैभव दर्शन भाग
-02 ॥
॥ श्री स्वामीसुताची सत्यवाणी ॥
पुष्प 17 वे
मंगलमुर्ती परब्रह्म श्री
स्वामीराज !
स्वामी भक्तांनो,
आपण
समर्थ सदगुरूंचे शिष्य म्हणून या भूतलावर वावरत आहोत. ही खुप मोठी भाग्याची गोष्ट आहे.
समर्थ शिष्य ही उपाधी मिळणे हे देव दुर्लभ आहे. एवढे प्रंचड शक्ती सामर्थ्य स्वामी
महाराजांचे आहे. जेवढे सर्वश्रेष्ठ सामर्थ्य आणि अधिकार स्वामींचा आहे, तेवढेच मनमोहक
आणि आर्कषक स्वामींचे रूप आहे. स्वामींचे स्वरूप हे मंगलमय तर आहेच, अन् जन्मोजन्मीचा
शीण घालवणारे आल्हाददायक ही आहे. ज्यांना ज्यांना स्वामींचे हे दिव्य स्वरुप पाहण्याचे
सदभाग्य प्राप्त झाले, ते सर्व जण या जन्ममृत्यूच्या भवतापातून मुक्त झाले. त्यांना
सर्व मुक्ती सहजतेने प्राप्त झाल्या. एवढे अलौकिक सामर्थ्य स्वामी मुखमंडलाचे आहे.
श्री
स्वामीसुत महाराजांनी सुध्दा हेच तजोमय मुखमंडळ पाहून संसाराचा त्याग केला. केवळ स्वामींच्या
दर्शनाने त्यांच्या सर्व वासना, सर्व विकार मुळासकट नष्ट झाले. यापुढे स्वामी दर्शन
हिच एक तृष्णा शिल्लक राहिली. हे एकट्या स्वामीसुतांच्या बाबतीत घडले असे नाही, तर
असे असंख्य स्वामीभक्तांच्या बाबतीत घडले. या सर्वांना स्वामींच्या मंगलमय दर्शनाने
मोक्षाचा लाभ झाला. सर्व विकारांचा नाश झाला. आज स्वामीसुत महाराज आपला हाच अनुभव पुढिल
अभंगातून आपल्याला सांगत आहेत.
जीव माझा आनंदला । पाहूनि स्वामीराज तुला ॥1॥
रूप पाहुनी लोचनीं । सुख झाले हो अंतकरणी ॥2॥
सर्व हरला शीणभाग । आतां नसावा हा वियोग ॥3॥
तूंचि बाप आपुलें नाव । सांगितले मी गांवोगांव ॥4॥
दिले चरणींचे रज । तेणें झाले सर्व काज ॥5॥
स्वामीसुत आनंदला । तुझें रुप पाहुनि डोळां ॥6॥
अभंगाच्या
प्रारंभीच श्री स्वामीसुत म्हणतात, हे दयाघना ! हे भक्तवत्सला ! तुझे दर्शन झाल्यामुळे माझा जीव हा
आनंदुन गेला आहे. हे स्वामीराया ! तुझे सर्वांगसुंदर रूप पाहून मी दंग झालो आहे. हे
दीनानाथा ! तुझ्या दर्शनाचा मला लाभ झाला, ही खुप मोठी भाग्याची गोष्ट आहे. तुझे मनमोहक
रूप मला माझ्या डोळ्यात साठवण्याचा दुर्लभ योग प्राप्त झाला, याने माझ्या डोळ्याचे
पारणे तर फिटलेच, परंतु माझे अंत:करण ही पावन झाले. हे दीनबंधू स्वामीराया ! तुझी ही
माया अशीच माझ्यावर राहू दे. तुझ्या दर्शनाचा योग मला सदैव लाभू दे. मला अन्य काहीही
नको, माझी एकच ईच्छा आहे की, तुझ्या दर्शनाचा लाभ वारंवार व्हावा. तुझे कोमल आणि मंगलमयी
रूप मला सदैव दिसावे. एवढीच माझ्यावर कृपा ठेव, हेच माझे मागणे आहे, असे स्वामीसुत
मागताना दिसतात.
पुढे स्वामीसुत म्हणतात, हे अजानुबाहू कृपावंता ! भक्तवत्सला
समर्था, तुझे मुखमंडल एवढे सुंदर आणि तजोमय आहे की, ज्याच्या केवळ दर्शनाने सर्व शीणभाग
नाहीसा होतो. सासरहून माहेरी आलेल्या मुलीला जो आनंद आपले आई-वडील आणि बांधव पाहून
होतो, त्याच्यापेक्षाही शतपटीने आनंद तुझ्या दर्शनाने मला मिळतो. अन् जेवढी ओढ त्या
सारसवासीन मुलीला आपल्या माहेराची असते, त्याहीपेक्षा जास्त ओढ मला ही आपल्या भेटीची
आहे. तेव्हा हे अनाथनाथा ! आता मला हा वियोग सहन होत नाही, तुमच्या भेटीची ओढ मला शांत
बसू देत नाही. माझे चक्षू हे आपल्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी आसूसलेले आहेत. माझी ही
ओढ लक्षात घेऊन, माझ्यावर कृपा करा आणि आपले मंगलमयी रूप मला पाहू द्या. अशी स्वामींना
पोटतिडकीने स्वामीसुत प्रार्थना करतात.
पुढे स्वामीसुत म्हणतात, हे अनाथनाथा ! मी तुझेच लेकरू आहे.
तुझ्याशिवाय माझे या जगात कोणीही नाही. माझा बाप-धनी तुच आहेस. मी गावोगावी फिरून तुझा
प्रचार करताना, तुझेच नाव माझा बाप म्हणून सर्वत्र सांगितले आहे. तुझेच अज्ञानी लेकरू
म्हणून मी सर्वत्र वावरलो आहे. मला केवळ तुझाच आसरा आहे. तू जो मला तुझे पायीचा धुरळा
दिला आहेस, त्याच चरण पादुका मी माथी मिरवून सर्वत्र तुझे नाम गातो आहे. या चरण पादुकाच
माझ्यासाठी कल्पवृक्ष बनल्या आहेत. ज्यांच्यामुळे श्रध्दाळूंचे सर्व दु:ख दूर होऊन
सर्व कामे पुर्ण होत आहेत. हे स्वामीराया ! केवळ तुझ्याच कृपेने निर्जीव पादुका या
भाविकांचे कल्याण करण्यास सिध्द झाल्या आहेत. ही तुझीच अगाध लीला आहे. हे तुझेच सामर्थ्य
आहे. यापुढे ही तुझी माया माझ्यावर अशीच राहू दे. तुझे मंगलमयी रूप मला सदैव माझ्या
डोळ्याने पाहण्याचे सौभाग्य लाभू दे, हिच माझी विनंती आहे.
अशी विनंती करून स्वामीसुत हे स्वामींच्या नामचिंतनात रंगून
गेले. स्वामी महाराजांना दर्शन देण्यासाठी आळवू लागले. स्वत:चे देहभान विसरून स्वामीसुत
हे स्वामींच्या भजनात दंग झाले. स्वामींना वारंवार दर्शनासाठी विनवणी करू लागले. अशी
बराच वेळ सर्व देहभान विसरून विनवणी केल्यानंतर भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री स्वामी
महाराज हे आपल्या आजानूबाहू स्वरूपात स्वामीसुतासमोर उभे राहिले. स्वामीसुत ही स्वामींचे
हे मंगलमयी, मनमोहक सर्वांगसुंदर रुप पाहून, धन्य धन्य झाले. आपल्या विनंतीला मान देऊन
परब्रह्माने आपल्याला दर्शन दिले, या हर्षाने पुन्हा देहभान विसरून स्वामीसुत हे स्वामींच्या
भजनात रंगून गेले. यापुढे अशीच आपली कृपादृष्टी राहू द्या आणि आपले मनमोहक रुप मला
कायम दिसू द्या. हिच एकमेव मागणी करून स्वामीसुत हे परत स्वामींच्या भजनात देहभान विसरते
झाले.
सज्जनहो, स्वामीसुत महाराज हे निस्वार्थ भावनेने स्वामी सेवा
करून स्वामींचे आवडते भक्त आणि लेकरू झाले. स्वामींच्या दर्शनाने स्वामीसुताचे सर्व
भवताप आणि सर्व दोष नाहीसे झाले. आपण ही त्याच भावनेने स्वामी करून आपले भवताप दूर
करावेत, आणि स्वामींचे लेकरू होण्याचा प्रयत्न करावा. स्वामींच्या ईच्छेत ईच्छा मिसळून
राहावे, जेणेकरून एक दिवस आपल्याला ही स्वामी महाराज आपलेसे करून घेतील.
आपले सर्व दु:ख दूर व्हावेत आणि लवकरच आपल्याला स्वामींनी
आपलेसे करून घ्यावे, हिच एक प्रार्थना स्वामी चरणी करून, या पुष्पाला येथेच विराम देतो.
अन् अमंगलाचे मंगल करणाऱ्या मंगलमयी स्वामी नामाचे चिंतन करतो…..
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री
स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
॥ श्री स्वामीसुत महाराज की
जय ॥
॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥