॥ श्री स्वामी समर्थ ॥
॥ श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥
॥ स्वामी वैभव दर्शन भाग
-02 ॥
॥ श्री स्वामीसुताची सत्यवाणी ॥
पुष्प 14 वे
अंतकाळींचा सोयरा । स्वामीराज माझा खरा ॥
स्वामी भक्तांनो,
आपल्या
मागिल अभंगात नरदेहाचे महत्व अतिशय मार्मिक शब्दात पटवून देण्याचे काम स्वामीसुत महाराजांनी
केले आहे. हा अभंग लक्षपुर्वक वाचला असता आपला ‘मी-पणा’ आणि अहंकार एका क्षणात गळून
पडतो. आपला जन्म नेमका कशासाठी झाला आणि आपण काय करत आहोत, याची ओळख करून देण्याचे
काम यातून केले आहे.
स्वामीसुत
श्री हरिभाऊ हे पुर्णार्थाने स्वामी स्वरूपात एकरूप झाले होते. स्वामीनामाचे महत्व
आणि स्वामींच्या अधिकाराची पुर्ण जाणीव झाल्यामुळे हरिभाऊंनी शेवटपर्यंत स्वामी चरण
घट्ट धरून ठेवले. ईतर कोणताही मोहपाश त्यांना अडवून ठेऊ शकला नाही.
किंवा स्वत: स्वामीसुत
ही स्वामी चरण सोडून ईतर कशातच रमले नाहीत. एवढेच काय परंतु जेव्हा स्वामींनी आपले
अवतार कार्य संपविण्याचे ठरविले, तेव्हा स्वामी चरण आपल्याला अंतरणार, या अतीव दु:खाने
त्यांनी स्वेच्छामरण स्विकारले, मात्र स्वामी चरण अंतरु दिले नाही. एवढी एकनिष्ठ भक्ती
त्यांनी स्वामींची केली.
आपण
मात्र आपल्या स्वार्थासाठी अल्पशी सेवा करतो, आणि आपल्या प्रपंचात स्वत:ला गुंतवून
घेतो. दिवसरात्र प्रपंच प्रपंच करत राहतो. आपली हिच वृत्ती आपल्या आत्मघातास कारणीभूत
ठरते. आपण पुर्णवेळ संसारी मायामोहात अडकतो. परंतु संसार हा ईश्वर प्राप्तीसाठी अडसर
ठरावा ईतके त्यात अडकू नये, ही साधी गोष्ट ही आपल्या ध्यानी येत नाही. जशी मधमाशी ही
मध गोळा होईपर्यंत फुलांत रममाण होते, आणि मध गोळा झाला की, त्याचा त्याग करते. अगदी
तसेच संसारात आपण विरक्त व्हायचे असते. हिच शिकवण आपल्या मनावर परत बिंबवण्याचे काम
आजचा अभंग करणार आहे. संसारी मोहमायात पुर्णपणे अडकून पडलेल्या जीवाला विरक्त करण्याचे
काम आजचा अभंग करणार आहे. मायापाशात अडकलेल्या जीवांना अजून एक संधी देण्याचे काम स्वामीसुतांच्या
या अभंगाद्वारे केले आहे.
सोडोनियां सर्व लाज । भजा भजा स्वामीराज ॥1॥
अंतकाळींचा सोयरा । स्वामीराज माझा खरा ॥2॥
बाईल पैशाची हो खरी। उभी राहील ती
द्वारी ॥3॥
इष्ट, मित्र, दुजे जन । धूर पाहाती दुरून ॥4॥
भाऊबंद पाहती वाट । मेला, गेला, झालें नीट ॥5॥
शेवटीं ते हि बा जायाचें । कोणी नाही हो कोणाचे ॥6॥
माझ्या स्वामीरायाविण । काळापुढे अवघे दीन ॥7॥
तोचि सोडवील तुम्हां । म्हणोनी जपा त्याच्या नामा ॥8॥
स्वामीसुत म्हणे भजा। स्वामीराज,
भावें माझा ॥9॥
प्रापंचिक जीवाला उपदेश देताना स्वामीसुत म्हणतात की, बाबांनो,
जर तुम्हाला मोक्ष किंव मुक्ती हवी असेल तर एकच करा. सर्व लाज, शरम, लज्जा सोडून द्या
आणि माझ्या स्वामीराजांचे भजन करा. भजनाची लाज धरू नका. हेच तुमच्या हिताचे आहे. कारण
अंतकाळी ईतर कोणीही तुमच्या सोबत येणार नाही. यमाच्या दारात ईतर कोणाचेही सहकार्य तुम्हाला
मिळणार नाही. अंतकाळी तुम्हाला उपयोगी पडणारा माझा स्वामी हाच एकमेव सोयरा आहे, जो
तुम्हाला यमाच्या तावडीतून सोडवू शकतो. तुमचे सर्वस्वी कल्याण करू शकतो. ईतर कोणीही
तुमच्या कामाचे नाही. तेव्हा वृथाभिमान आणि वृथाभ्रम सोडा आणि माझ्या स्वामींना शरण
जा. असे स्वामीसुत सांगतात.
हिच गोष्ट अजून स्पष्टपणे सांगताना स्वामीसुत आपल्याला एका
एका नात्याचा दाखला देऊन सांगतात की, सज्जनहो, या जगात कोणीच आपले नाही, प्रत्येकाचे
नाते हे स्वार्थाला चिटकलेले आहे. देह आहे तोपर्यंत सर्वच आपले आहेत, मात्र एकदा का
मृत्यू झाला की, मग प्रत्येक जण दुर जातो. मृत्यू नंतर बायको ही फक्त संपत्तीसाठी जीवाचा
आटापीटा करते. मृत्यूनंतर बायको ही फक्त दारापर्यंत सोबत येते, आणि दारातच उभी राहते.
त्यापुढे येत नाही. तर ईतर आप्तस्वकिय, नातेवाईक, मित्र मंडळी हे सर्व लोक स्मशानापर्यंत
सोबत येतात आणि आपल्याला चितेच्या स्वाधीन करून लांबूनच धूर पाहात उभे असतात. कोणीही
जवळ येत नाही. याही पेक्षा आपले भाऊबंद हे तर बरे झाले मेला, गेला, आता सर्व नीट होईल.
अशी भावना आपल्या विषयी ठेवतात. एवढे स्वार्थी लोक झाले आहेत. ईतरांच्या दु:खात आपले
सुख शोधून त्याचा आनंद घेणारे हे भावनाशुन्य लोक काय आपले भले करणार ? किंवा यांच्यामुळे
आपले काय हित साधणार आहे ? असे वास्तविक चित्रण स्वामीसुत आपल्यापुढे मांडतात.
यात पुढे ते अजून म्हणतात की, बाबांनो, येथे राहण्यासाठी
कोणीच आले नाही. प्रत्येकालाच एक ना एक दिवस जावेच लागणार आहे. ज्यांना आज आपल्या जाण्याने
आनंद होत असेल, ते ही सर्व जण उद्या जाणारच आहेत. आपले आजे-पंजे गेले, तसेच आपण ही
जाऊ. येथे कोणीच कोणाचे नाही. सर्वजण हे काही काळाचे सोबती आहेत. तेव्हा वृथाभ्रम ठेऊ
नका. कारण या अखिल विश्वात माझ्या स्वामी बापाशिवाय ईतर सर्व जण काळापुढे दीन आहेत.
म्हणजे स्वामी महाराज सोडून ईतर सर्वांना काळाची भिती आहे. मात्र या सर्वसत्ताधिश काळाला
ज्यांची भिती आहे, ते माझे स्वामी महाराज आहेत. तेव्हा या कळीकाळाच्या तावडीतून सुटायचे
असेल तर सरळ माझ्या स्वामींना शरण जा. तोच तुम्हाला या काळाच्या तावडीतून सोडवू शकतो.
त्याच्या शिवाय ईतर कोणीही हे काम करण्यास समर्थ नाही. तोच एक समर्थ आहे. यासाठी आपण
माझ्या स्वामी देवांना पुर्ण शरणांगत भावनेने शरण जावे व माझ्या स्वामी देवांचे भजन
करावे, त्यांच्या नामाचा सदैव जप करावा, आपले
सर्वार्थाने कल्याण साधण्यासाठी स्वामी महाराजांचा धावा करावा. अशी शिकवण स्वामीसुत
देताना दिसतात.
अभंगाच्या शेवटच्या चरणात स्वामीसुत सांगतात की, बाबांनो,
तुम्हाला एकच प्रेमाची आणि आग्रहाची विनंती आहे, जर तुम्हाला स्वहित साधायचे असेल तर
एकच करा सदैव माझ्या स्वामीराजांचे भजन करा. प्रेमभावे त्यांच्या नामाचा गजर करा. हिच
गोष्ट तुम्हाला अंतिम समयी तारणार आहे. हेच तुमच्या सर्वाच्या हिताचे आहे. हिच जाणीव
सदैव असू द्या. हेच माझे सांगणे आहे.
स्वामी भक्तांनो, वरील अभंगातून स्वामीसुतांनी आपल्याला संसार
करत करत त्यातून कसे अलिप्त व्हावे, हे सांगताना आपण ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्यासाठी
संसारात गुरफटतो तेच लोक आपल्या मृत्यूनंतर आपल्याशी कसे वर्तन करतात. याची जाणीव करून
दिली आहे. तेव्हा आपण संसार करत असताना त्यांत जास्त अडकून पडू नये. आपले कर्तव्य तेवढे
करावे व शेवटी आपल्या हिताच्या विचार करावा. हि फार मोठी शिकवण देणारा आजचा हा अभंग
आहे. जसे कमळाचे फुल हे चिखलात राहून त्यापासून अलिप्त आणि निर्मळ राहते, अगदि तसेच
आपण संसारात असावे, हि शिकवण देणारा हा अभंग आपल्या सर्वांसाठी खुप मोलाचे मार्गदर्शन
करणारा आहे. तेव्हा आपण यातील विचार आपल्या जीवनाता उतरावे आणि स्वत:चे कल्याण करून
घ्यावे, हिच आपल्याला विनंती आहे. अशी सदबुध्दी आपल्या सर्वांना परब्रह्म भगवान श्री
स्वामी समर्थ महाराज देवोत, अशीच अक्कलकोट निवासी स्वामी चरणी प्रार्थना करतो आणि स्वामींचे
मंगलमयी नाम घेऊन येथेच विरामतो.
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री
स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
॥ श्री स्वामीसुत महाराज की
जय ॥
॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥