॥ श्री स्वामी समर्थ ॥
॥ श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥
॥ स्वामी वैभव दर्शन भाग
-02 ॥
॥ श्री स्वामीसुताची सत्यवाणी ॥
पुष्प 13 वे
दुर्लभ नरदेहाचे सार्थक
करा !
स्वामी भक्तांनो
आपण
आपल्या सभोवताली असणारे अनेक जीव, जंतू, प्राणी पाहतो. ज्यात इवल्याशा मुंगीपासून ते
महाकाय हत्तीपर्यंत अंसख्य जीव आपल्या आजु-बाजूला वावरत असतात. या प्राण्यात कोणी आपल्याला
हवेहवेसे असते तर कोणाची सावली सुध्दा नको वाटतो. काही प्राण्यांचे आपण जीवापाड लाड
करतो, तर काहींना मात्र दुर लोटतो. काही पाळीव प्राणी आपण घरी हौसेखातर पाळत असतो.
परंतु असे असतानाही आपल्या पैकी किती जणांना यापैकी एखादा प्राणी व्हायला आवडेल. किंवा
आपण जसे म्हणतो किंवा ऐकतो की, मला जीवनात अमूक व्हायचं आहे, तमूकं व्हायचं आहे. तसं
जर आपल्याला विचारले की, आपल्याला पुढिल जन्मात कोणता प्राणी व्हायचं आहे.
बैल व्हायचं
आहे की घोडा, कुत्रा व्हायचं की मांजर, मुंगी व्हायचं आहे की माशी. असे जर विचारले
तर आपलं प्रतिक्रिया किती भयानक असेल. किंवा असा प्रश्न विचारणाऱ्या विषयी आपल्या मनात
काय येईल, हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज भासणार नाही. अशी आपली प्रतिक्रिया
असेल.
पण
आपण कधी याचा विचार केला आहे की, आपल्याला आवडो अगर न आवडो आपल्याला पुढिल जन्मी असाच
एखादा प्राणी म्हणून जन्म मिळणार आहे. आपण ही असेच घरदार नसलेले रस्त्यावरचे जीवन जगणार
आहोत, तेव्हा आपले कसे होईल. आता आपल्या वाटेल की, असे कसे होईल ? एवढे सुंदर शरीर आहे, ऐश्वर्य
आहे, तर मग आम्ही प्राणी म्हणून का जन्माला यावे, आम्ही तर पुन्हा मनुष्य म्हणून जन्म
घेऊ. परंतु सज्जनहो, हा विचार करताना आपण एक गोष्ट पुर्णपणे विसरतो की, आपल्याला मिळालेला
मनुष्य जन्म हा खुप महत्प्रयासाने मिळालेला आहे. लक्ष 84 योनी फिरून आल्यावर आपल्याला
हा नरदेह लाभला आहे. आणि जर आपण या जन्मात आपले पारलौकिक कल्याण केले नाही तर आपली
ईच्छा असो वा नसो, आपल्याला परत लक्ष 84 योनीचा फेरा पुर्ण करावा लागणार आहे. म्हणजेच
प्रत्येकाला या जन्मानंतर परत कुत्रा, मांजर, बैल, घोडा, गाढव असे जन्म घेत घेत काळ
व्यतित करावा लागणार आहे. तेव्हा आपल्याकडे दुसरा कोणताच मार्ग शिल्लक राहणार नाही.
तेव्हा आपण काय करणार ? याचा विचार आपण कधी केला आहे काय ?
पुर्व सुकृताने दुर्लभ नरदेह लाभूनही आपण अजूनही घोर निद्रेत
आहोत. आपल्याला मायेच्या प्रभावाखाली आपले पारलौकिक कल्याण विषयी काहीही गांभीर्य नाही.
असे असताना आपल्याला पुढिल गती मिळणार तरी कशी ? याचा साधा विचार कधी आपल्या मनाला
शिवत नाही. परमेश्वरानी एवढी बुध्दी व विचार करण्याची शक्ती देऊन ही आम्ही नको त्या
बाबतीत डोके वापरतो, मात्र स्व-कल्याणाचा एक ही मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत नाही,
हे आपले दुर्दैव म्हणावे की, कपाळकरंटेपण हेच समजत नाही. अशा संसारी मायामोहात घोर
निद्रा घेणाऱ्या आणि आपल्याच विश्वात सुखी असणाऱ्या विसरभोळ्या मनुष्य प्राण्यास जागे
करण्याचे काम आजच्या अंभगातून श्री स्वामीसुतांनी केले आहे. आपल्याला मिळालेला हा नरदेह
व्यर्थ न घालवता कसा सत्कारणी लावावा, याची शिकवण स्वामीसुतांनी यातून दिलेली आहे.
आपल्याला मिळालेला हा नरदेह कोणत्या कामासाठी खर्ची घालायचा आहे, याची जाणीव करून आजचा
अभंग आहे.
चला तर वेळ न घालवता, आता हा अभंग पाहू या ! आणि राहिलेला
आयुष्याचा भाग याप्रमाणे व्यतित करू या….
नरदेह घालवूं नका वाया। भजा, भजा,
स्वामीराया ॥1॥
भाव ठेवा चरणावरीं । स्वामी पहा डोळाभरीं ॥2॥
कान दिले हें कारण । करा भजन-श्रवण ॥3॥
नेत्रीं पहावें ते रूप । मुखीं करा नामजप ॥4॥
वक्षस्थळीं ठेवा मन । आणिक वसो तेथें प्रेम ॥5॥
हात दिले वाजवा टाळी। सर्व मिळोनियां
मेळी ॥6॥
बाहुबळें आलिंगावे । स्वामीदासांसी हो भावें ॥7॥
पायीं नाचा हो रंगणी । माझ्या स्वामीचें अंगणी ॥8॥
बाकी राहिला जो देह । करा लोटांगणी करा व्यय ॥9॥
स्वामीसुताने ही काया । अर्पण केली स्वामीराया ॥10॥
आजच्या अभंगातून आपल्याला मिळालेला दुर्लभ नरदेह हा कशासाठी
आहे व तो कसा खर्ची घालावा, याची शिकवण हरिभाऊ तथा स्वामीसुत महाराज आपल्याला करून
देत आहेत. ते म्हणतात की, बाबांनो हा नरदेह जो आपल्याला मिळालेला आहे, तो खुप दुर्लभ
तर आहेच मात्र हा देह प्राप्त होण्यासाठी आपण अनंत यातना सहन केल्या आहेत. एखाद्या
बैलाला शेतकरी जेव्हा चाबकाचे फटके मारतो तेव्हा आपला जीव हा कासाविस होतो, मात्र आपल्याला
माहित नसते की, असे असंख्य फटके आपण ही मागच्या जन्मात खाल्लेले आहेत. गदर्भ जन्मी
अनेक उकिरडे फुंकले आहेत, तेव्हा कुठे हा मनुष्य देह प्राप्त झाला. या प्रत्येक जन्मी परमेश्वराला साकडे घालून आपण
हा जन्म मागवून घेतला आहे, यासाठी आपण आजन्म तुझे नाम चिंतन करू असे वचन ही परमेश्वराला
दिलेले आहे. तेव्हा आता तरी या वचनाला जागा, आपले कल्याणाचा विचार करा. हा नरदेह व्यर्थ
घालवू नका, तर आता या जन्मी स्वामीरायांचे भजन करा. त्यांचे नाम चितंन करा. यातच आपले
हित आहे. हे स्वामी नामच आपल्याला तारणार आहे. या चरणांशिवाय आपल्याला ईतर कोठेही मार्ग
नाही, गत्यंतर नाही. तेव्हा स्वामी चरणी भाव ठेवा, स्वामींचे सुहास्यवदन मुखमंडल डोळेभरून पाहा आणि स्वामी नामाचे चिंतन, भजन, स्मरण करा,
अशी विनंती स्वामीसुत करतात.
पुढे स्वामीसुत हा देह कसा सत्कारणी लावावा हे सांगताना म्हणतात
की, आपल्याला हे जे कान दिले आहेत, ते देण्यामागचे म्हणजे आपण या कानांनी भजन श्रवण करावे, स्वामी
नामाचा गजर ऐकावा. हेच कानाचे मुख्य काम आहे. त्यानंतर आपल्याला नेत्र म्हणजे हे जे
डोळे दिले आहेत, ते ईश्वरांचे मंगलमयी रूप पाहण्यासाठी दिले आहेत. या डोळ्यांनी अभद्र
असे काही पाहण्यापेक्षा डोळेभरून स्वामींचे सर्वांगसुदंर तेजस्वी मुखमंडल पाहावे, तरच
डोळ्याचे पारणे फिटेल, असे स्वामीसुत स्पष्ट करतात. यानंतर आपल्याला जे मुख म्हणजे
वाचा दिली आहे, ती स्वामींचे नामजप घेण्यासाठी दिलेली आहे. या मुखाने सदैव स्वामी नामाचे
भजन करावे, स्वामींच्या लीलांचे गुणगाण करावे, हाच याचा प्रमुख धर्म आहे. उगीच अभद्र
बोलणे, ईतरांचे मन दुखावणे, ईतरांची निंदा-नालस्ती करणे हे काम मुखाचे नाही, असे स्वामीसुत
स्पष्ट करतात.
यानंतर आपल्याला जे हात दिले आहेत, स्वामी भजनात टाळी वाजविण्यासाठी
दिले आहेत. हातांचा मुख्य धर्म हा ईश्वर भक्तीचा गजर हाच आहे. सर्वांनी एकत्र येऊन
स्वामींचे भजन हे टाळ्यांच्या गजरात करावे, यानेच हाताचा उध्दार होईल. यासोबतच या हातांनी
स्वामीदासांना प्रेमभावे आलिगंन द्यावे, एकमेकांची भेट ही आलिगन देऊन घ्यावी, म्हणजे
आपापसांतील प्रेम आणि स्वामींची भक्ती वृध्दिंगत होईल. यानंतर आपल्याला जे हे पाय दिले
आहेत, ते स्वामींच्या दारात प्रेमभावे रंगून नाचण्यासाठी दिले आहेत. या पायांनी स्वामींच्या
समोर देहभान विसरून स्वामी भजनात रंगून नाचावे, दंग होऊन जावे. तरच या पायाचे चीज होईल.
किंवा स्वामींच्या दिंडीत चालत जाऊन या पायांचा उध्दार करावा, हेच त्यांचे हिताचे आहे.
असे स्वामीसुतांना वाटते.
आपल्या शरीरातील महत्वाचे हात, पाय, मुख, डोळे, कान या अवयवांचे
प्रमुख कार्य सांगितल्यानंतर पुढे स्वामीसुत म्हणतात की, सज्जनहो, हे सर्व प्रमुख अवयव
स्वामींच्या भजन किर्तनात खर्ची घातल्यानंतर जो देह शिल्लक राहतो, तो उर्वरित देह सुध्दा
स्वामी कार्यात व्यतित करा, म्हणजे स्वामी सेवेंच्या प्रचार-प्रसारासाठी हा देह उपयोगात
आणा. याने स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतील. आपल्याला सद्गती देतील. ही सद्गती
मिळण्यासाठी आपण स्वामींच्या चरणी लोंटागण घालून हा देह समर्पित करावा. आपल्यातील आत्म्याचे
या परमात्म्याशीं एकरूप साधावे. मनाने, वाणीने आणि शरीराने कोणालाही दु:ख देऊ नये.
कोणाचेही अहित करू नये, कोणताही चुकीचा मार्ग पत्करू नये. तर सरळ पुर्ण परब्रह्म भगवान
श्री स्वामी समर्थ महाराजांना शरण जावे, त्यांच्या पायी डोके ठेऊन नतमस्तक व्हावे,
म्हणजे हा नरदेह सत्कारणी लागेल. असे स्वामीसुत म्हणतात.
ही वरील शिकवण देताना अभंगाच्या शेवटी स्वामीसुत स्वत:चा
दाखला देऊन विनम्र भावाने सांगतात की, बाबांनो मी सुध्दा स्वामी कृपेने मिळालेली माझी
काया स्वामींच्या चरणी अर्पण केली आहे. जो देह मला त्यांच्या कृपेने प्राप्त झाला होता, तो देह मी त्यांच्या चरणी वाहून
माझ्या जीवनाचे सार्थक करून घेतले आहे. आता श्रींच्या कृपेने माझा नरदेह सार्थकी लागून
माझा लक्ष 84 फेरा निश्चितच सुटणार आहे. एवढा ठाम विश्वास माझा श्री स्वामी देवांच्या
चरणी आहे, म्हणून मी आता निश्चिंत आहे. आपणही माझ्याप्रमाणे आपला संपूर्ण भार स्वामी
चरणी वाहावा, आणि हा नरदेह सत्कारणी लावावा, हिच आपूलकिची पार्थना आपणा सर्वांना आहे.
या विनंतीचा आपण मान ठेवावा व स्वहित साधावे, हिच विनंती करतो आणि स्वामी चरणी लोंटागण
घेतो. असे स्वामीसुत शेवटी म्हणतात.
सज्जनहो,
आपण आता तरी जागृत होऊन यावर विचार करावा आणि आपले पुढिल जीवन हे स्वामींच्या पायी
समर्पित करावे, आपला संसार करत करत स्वामी महाराजांनी सांगितलेला मार्ग अवलंबावा. श्री
स्वामी चरणांवर गाढ श्रध्दा ठेवावी, आणि आपले सर्वस्वी कल्याण साधावे. हिच आज या निमित्ताने
आपल्याला विनंती करतो आणि या त्रयोदश पुष्पाला श्री स्वामी देवांच्या चरणी अर्पण करून,
स्वामीं नामाचा धावा करतो........
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री
स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
॥ श्री स्वामीसुत महाराज की
जय ॥
॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥