परब्रह्म भगवान श्री स्वामी महाराज स्वरूप वर्णन !



॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 20 वे
परब्रह्म भगवान श्री स्वामी महाराज स्वरूप वर्णन !
स्वामी भक्तांनो,
            स्वामींचे अंतरंगीचे शिष्य श्री आनंदनाथ महाराज यांच्या आत्मानुभवातून प्रकट झालेले स्वामींचे दिव्य काव्यामृत आपण मागील 19 पुष्पापासून पाहात आहोत. हे आपले 20 वे पुष्प आहे. आपण ही आनंदनाथ महाराजांच्या अभंगाची लेखमाला 21 पुष्पानंतर तुर्तास थांबविणार आहोत. ती पुन्हा काही दिवसांनी सुरु करु...! काही दिवसांची विश्रांती घेऊन आपण पुन्हा स्वामीसुत महाराजांचे अभंग चर्चेसाठी घेणार आहोत. स्वामीसुत महाराजांचे 21 अभंग पाहून पुन्हा दिगंबर दास महाराजांचे 21 अभंग पाहणार आहोत. असे पुढील नियोजन आहे.

            त्यामुळे हे आपले आनंदनाथ महाराजांच्या अभंगाचे शेवटून दूसरे पुष्प आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी.......!
स्वामी भक्तांनो,
            आनंदनाथ महाराज हे स्वामींच्या सहवासात अक्कलकोटी प्रत्यक्षपणे 06 वर्षे होते. पूर्ण परब्रह्म स्वामींचा खुप मोठा सहवास त्यांना मिळाला. या काळात त्यांना स्वामींचे जसे जसे अनुभव आले, जसे जसे स्वामींचे स्वरुप उलगडत गेले, तसे तसे त्यांनी काव्य स्वरुपात मांडलेले आहे. मागील सर्व लेखात आपण याचा अनुभव घेतला आहे. आजपर्यंत कधीही व कोठेही न ऐकलेले स्वामींचे स्वरूप दर्शन, स्वामींचे अधिकार दर्शन आणि एकूणच स्वामींचे सकल वैभव दर्शन आपण आनंदनाथ महाराजांच्या स्वानुभवातून पाहिले आहे. ज्यातुन आपल्याला स्वामी महाराज व त्यांचे सामर्थ्य नेमके पणाने उघड झाले. यापुढे असाच प्रयत्न राहिल. असो.
              आजचा अभंग हा परब्रह्म स्वामी महाराजांच्या सगुण स्वरूपाचे वर्णन करणारा आहे. भूवैकुंठ अक्कलकोटी स्थिरावलेला पूर्ण परब्रह्म अक्कलकोटी नेमका प्रत्यक्षपणे कसा दिसायचा ? कसा भासायचा व कसा राहायचा याचे वर्णन आजच्या अभंगातून आपल्याला वाचायला मिळणार आहे...! तेव्हा मायामोहनाशक आणि सर्वेश्वर स्वामी महाराज मायाधिपती होऊन अक्कलकोटी कसे सगुण रुपी वावरले हे आनंदनाथ महाराजांच्या काव्यात पाहू या..….....
सुंदर ते रूप मूर्ती मनोहर । निर्गुण साचार स्वामी माझा ।।1।।
विशाल हो भाळी केशराची उटी । कस्तुरी लल्लाटी शोभतसे ।।2।।
मूर्ती मनोहर निर्गुण साचार कलियुगी ।।3।।
कृपानेत्र पाहोनी तेज:पुंज खरे । रवि तेज बरे विराजीत ।।4।।
सरळ नासिक तेजासी आगळे । प्रेमे पवन खेळे तयामाजी ।।5।।
कोटी ते मदन टाकू ओवळून । लावण्याची खाण जेथे खरी ।।6।।
रुद्राक्ष आगळा शोभतसे गळा । वरी तुळशीमाळा ढाळ देत ।।7।।
कटीसी कौपीन पिवळी ती जाण । तारक निधान कलियुगी ।।8।।
आनंद म्हणे ऐसी मूर्ती येता ध्यानी । जीव मन दोन्ही कुरवंडिये ।।9।।
         आजचा अभंग 09 चरणांचा असून यातून आनंदनाथांनी निर्गुण निराकार स्वामींचे अक्कलकोटी घेतलेले सगुण साकार स्वरुप वर्णन केलेले आहे.
सुंदर ते रूप मूर्ती मनोहर । निर्गुण साचार स्वामी माझा ।।
विशाल हो भाळी केशराची उटी । कस्तुरी लल्लाटी शोभतसे ।।
         अभंगाच्या प्रारंभी आनंदनाथ म्हणतात, माझा स्वामी पूर्ण परब्रह्म असून तो सर्वनियन्ता आणि सर्वेश्वर आहे. तो ब्रह्माण्डनायक म्हणूनही सर्वविख्यात आहे. तो निर्गुण निराकार आहे. असे असताना सुद्धा तो भाविक भक्तांच्या व सर्व देवी देवतांच्या आग्रहास्तव अक्कलकोटी अवतीर्ण झाला आहे. येथे घेतलेले स्वामींचे रुप हे खूपच लोभस आणि मनोहर आहे. त्याची सुंदरता ही एकमेद्वितीय आणि वेदांनाही अवर्णनीय आहे. सर्वेश्वर चैतन्य मूर्ती जेव्हा सगुण साचार रुपात वावरते त्याचे वर्णन तरी कसे करावे ? हा प्रश्न पडतो, इथे तर मुळ परब्रह्म तत्वच सगुण रुपात स्वामी समर्थ नामाने अवतरले आहे, त्याचे वर्णन करण्याचे धाडस कोण आणि कसे करणार ? हा यक्षप्रश्नच आहे. असे आनंदनाथ महाराजांना वाटते. तरीही स्वामींच्याच कृपेने हे धाडस करुण स्वामी स्वरूप वर्णन करतो आहे, असे आनंदनाथ सांगतात. स्वामींचे रूप मनोहर आहे, शरीर सर्वांग सुंदर आहे. भाळ म्हणजे कपाळ हे सुद्धा विशाल असून त्यावर केशराची उटी लावलेली आहे, सोबतच कस्तुरी ही लल्लाटी शोभून दिसत आहे. अशी स्वामीराजांची मूर्ती साजिरी आहे. असे आनंदनाथ अभंगाच्या पहिल्या व दुसऱ्या चरणात सांगतात.
मूर्ती मनोहर निर्गुण साचार कलियुगी ।।
कृपानेत्र पाहोनी तेज:पुंज खरे । रवि तेज बरे विराजीत ।।
          अशी ही मूर्ती निर्गुण निराकारी असूनही कलियुगात सगुण साकार स्वरुपात मनोहरपणे वावरत आहे. या स्वामींचे नेत्र हे तेज:पुंज आहेत, एवढे तेज या स्वामींच्या नेत्रात आहे की, ज्यापुढे सूर्याचे तेजोकिरण ही कमी पडतील. सहस्त्र सूर्यांनाही तेजस्वी बनवणारा हा तेजोनिधी असूनही आपल्या भक्तांकडे कायम कृपानेत्राने पाहत असतो. हेच माझ्या स्वामी देवांचे अभूतपूर्व वैशिष्ट्य आहे. असे आनंदनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या व चौथ्या चरणात सांगतात.
सरळ नासिक तेजासी आगळे । प्रेमे पवन खेळे तयामाजी ।।
कोटी ते मदन टाकू ओवळून । लावण्याची खाण जेथे खरी ।।
       अभंगाच्या पुढील चरणात आनंदनाथ म्हणतात, स्वामी महाराजांचे नाक हे सरळ असून त्याचे तेज ही निराळेच आहे. खुप उठावदार आणि अतीव सुंदर नासिकाग्र स्वामींना शोभून दिसत आहे. या दिव्य नासिकेत पवन म्हणजे हवा ही प्रेमभावपूर्वक खेळ खेळत असते. म्हणजे स्वामींचा श्वासोंश्वास हा पवन देवाचा खेळ आहे. हा खेळ चालू असला काय किंवा बंद झाला काय ? याचा स्वामींच्या जन्म मरणावर काडीचाही फरक पडणार नाही. कारण ते जन्म मरणाच्या पलिकडील अंतिम सत्य आहेत. किंवा जन्म मरणांचा खेळ रचणारे सर्वनियन्ता सर्वेश्वर आहेत. त्यांना कशाचीही पर्वा नाही.
         स्वामींचे रुप तर एवढे सुंदर आणि मनोहर आहे की, ज्याचे वर्णन करणे कदपिही शक्य नाही. स्वामींच्या लावण्यासमोर एक दोन नाही तर कोट्यावधी मदन जरी ओवाळून टाकले म्हणजे एकत्र केले तरी सुद्धा त्यांना स्वामींच्या पायाच्या नखाचीही बरोबरी करता येणार नाही. एवढे लावण्य स्वामी महाराजांचे आहे. कारण सर्वांना लावण्य देणारी लावण्य खाण म्हणजे परब्रह्म स्वामी महाराज आहेत, असे आनंदनाथ महाराज अभंगाच्या पाचव्या व सहाव्या चरणात स्वामी स्वरूप वर्णन करताना सांगतात.
रुद्राक्ष आगळा शोभतसे गळा । वरी तुळशीमाळा ढाळ देत ।।
कटीसी कौपीन पिवळी ती जाण । तारक निधान कलियुगी ।।
         अभंगात पुढे आनंदनाथ म्हणतात, स्वामींच्या गळ्यात असणारा रुद्राक्ष खुप आगळा वेगळा आहे, अन तो खुप शोभून दिसतो आहे. स्वामींना एक वेगळेच चैतन्य यामुळे आलेले आहे. यासोबतच असणारी गळ्यातील तुळशीची माळा यामुळे स्वामींचे स्वरुप अजूनच सुंदर आणि प्रेमळ दिसत आहे. आकाशात शोभून दिसणाऱ्या तारकासमुहातील नक्षत्राप्रमाणे हा रुद्राक्ष स्वामींच्या गळ्यात तुळशी माळेसोबत शोभून दिसत आहे. याने एक वेगळीच शोभा स्वामींच्या स्वरुपात दिसत आहे.
             तसेच स्वामींनी आपल्या कटीसी धारण केलेली कौपीन ही पिवळ्या रंगाची असून यामुळे स्वामींचे स्वरूप आणखीनच सर्वांग सुंदर शोभत आहे. कटी म्हणजे कंबर आणि कौपीन म्हणजे लंगोटी असा वरील शब्दाचा अर्थ आहे. पिवळे वस्त्र धारण केल्यामुळे स्वामींच्या मुळच्या सौंदर्यात आता आणखी भर पडली आहे. त्यामुळे कलियुगात सर्वांच्या उद्धारासाठी अवतरलेले हे तारक निधान स्वामी महाराज अक्कलकोटी अशा साध्या वेषात विसावले आहेत. असे आनंदनाथ आपल्या अभंगाच्या सातव्या व आठव्या चरणात सांगतात.
आनंद म्हणे ऐसी मूर्ती येता ध्यानी । जीव मन दोन्ही कुरवंडिये ।।
        अभंगाच्या शेवटच्या चरणात आनंदनाथ म्हणतात, एवढा मोठा पूर्ण परब्रह्म असणारा आणि ब्रह्माण्डनायक असणारा हा स्वामी देव अगदी सहजतेने आणि साधेपणाने अक्कलकोटी वावरतो आहे. सकल ब्रह्मांडाला सर्व काही पुरावणारा पुर्णब्रह्म स्वतः मात्र फक्त लंगोटी धारण करुण राहतो, ही फार मोठी शिकवण देणारी बाब आहे. सद्भक्ताला सर्वसंग परित्यागाचे शाश्वत सत्य दाखवणे आणि पाखंडी लोकांना एक दिवस मी तुम्हाला याच अवस्थेत आणून ठेवील असा सज्जड दम दाखवणे, हिच महत्वपूर्ण शिकवण स्वामी महाराजांची लंगोट धारण करण्यामागची आहे. असो.
          आनंदनाथ म्हणतात, अशी ही निर्गुण निराकार असणारी आणि सगुण साकार बनलेली स्वामीराज मूर्ती पाहता, तिचे सर्वांग सुंदर ध्यान करता, मन प्रसन्न होते, समाधी अवस्था प्राप्त होते. या स्वामींच्या चरणावर जीव आणि मन दोन्ही ही ओवाळून टाकावे, अर्पण करावे, हिच भावना अंती मनात येते. जेथे सर्व देवी देवता नतमस्तक होतात, त्या सद्गुरु पायी आपला देह समर्पित करावा, हिच अंतिम ईच्छा आहे. असे आनंदनाथ अभंगाच्या शेवटी सांगताना दिसतात.
           स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज हे पूर्ण परब्रह्म आणि ब्रह्मांडनायक आहेत. सर्वांचे आदि आणि अंत तेच आहेत. सर्व देवांचे देव आणि सर्व दातार असणारे स्वामी केवळ आपल्यासाठी अक्कलकोटी स्थिरावले आहेत. त्यामुळे त्यांना शरण जाणे यातच आपले हित आहे. तेथे कोणताही भेदाभेद नाही किंवा कोणीही लहान मोठे नाही. सर्व समान हिच शिकवण देण्यासाठी स्वामींनी हा अवतार धारण केला. आपल्या जवळ असलेल्या यत्किंचित धनाचा आपल्याला गर्व चढतो आणि आपली आचरण पद्धती आमूलाग्र बदलते. पंरतु अखिल ब्रह्मांडाचा सर्वसत्याधिश असूनही स्वामी महाराज केवळ लंगोटी धारण करुण राहतात, ही फार मोठी शिकवण आपल्यासाठी व स्वामींच्या नावे बाजार भरवून भाविकांना लुटणाऱ्या पाखंडी लोकांसाठी आहे. तेव्हा यातून योग्य तो शोध बोध घेऊन आपली आचरण पद्धती बदलावी आणि सर्वाठायी स्वामींना पहावे, स्वामींचे व्हावे, हाच आजच्या अभंगाचा मतितार्थ आहे.
         हा मतितार्थ आपण आचरणात आणू या आणि सर्वेश्वर स्वामींना शरण जाऊन स्वामींचे नाम चिंतन करु या......!
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
 श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु