दीनजन उध्दारक परब्रह्म स्वामी महाराज !



॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 19 वे
दीनजन उध्दारक परब्रह्म स्वामी महाराज !
स्वामी भक्तांनो,
           परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तवत्सल भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे सर्वाधिपती स्वामी महाराज हे अल्पशा सेवेने ही संतुष्ट होतात, त्यांना फक्त भाव महत्वाचा आहे. जसे  भगवान श्री कृष्णाने सुदामाला न मागता ही सर्व काही दिले, तसेच स्वामी महाराज आपल्या भक्तांना न मागता ही सर्वस्व देऊन टाकतात. तेव्हा अशा प्रेमळ व सर्वसत्याधिश स्वामी महाराजांच्या दरबारी याचक म्हणून उभे राहण्यापेक्षा त्यांच्याशी एकरुप होऊन राहावे, असे आनंदनाथ महाराज आजच्या अभंगातून सांगणार आहेत. स्वतः आनंदनाथ महाराज हे स्वामी स्वरुपात एकरुप झाल्यामुळे ते स्वामी महाराजांशी कधी मित्रत्वाने, कधी शिष्यत्वाने तर कधी पुत्र या नात्याने व्यवहार करत असत. कारण स्वामी महाराज व आनंदनाथ महाराज यांच्यात द्वेताद्वेत भेद ऊरलाच नव्हता, ते एकरुप आणि एकतत्व झाले होते.

        तेव्हा आजच्या अभंगातून आनंदनाथ महाराज हे स्वामींना आपला सखा या नात्याने प्रेमळ साद घालत आहेत. त्यांना मागणी करत आहेत, ही विनंती नाही तर मित्रभाव आहे. तेव्हा पाहू या आजचा प्रेमभाव व्यक्त करणारा अभंग.......
प्रेम द्यावे माझ्या मना । हेची पुरवावी वासना ।।1।।
तुझ्या नामाचा हा छंद । सहज घडो ब्रह्मानंद ।।2।।
रंग भरोनी हृदयी । प्रेमभाव असो देही ।।3।।
हेची मागने दातारा । तुजपाशी की दातारा  ।।4।।
आनंद म्हणे श्री गुरुनाथा । सख्या ऐकावे समर्था ।।5।।
         आज आपल्या 05 चरणांच्या अभंगातून आनंदनाथ आपल्या सर्वेश्वर स्वामी सख्याशी हितगुज करत आहेत.
प्रेम द्यावे माझ्या मना । हेची पुरवावी वासना ।।
        अभंगाच्या प्रथम चरणात आनंदनाथ स्वामींना एक मागणे मागत आहेत, स्वामींना म्हणत आहेत, हे स्वामीराया ! माझे एकच मागणे आहे, माझी एकच ईच्छा आहे की, मला फक्त सर्वाविषयी प्रेमभाव वाटावा. माझ्या मनात केवळ प्रेम आणि ममता असावी. याशिवाय काहीही नको, सदैव प्रेमाचा वर्षाव वाणीतून व्हावा, हृदयात नेहमी वात्सल्य असावे, एवढेच दान दे. असे आनंदनाथ म्हणतात. आपण परमेश्वराजवळ प्रेम सोडून सर्वकाही मागतो, हाच आपल्यात आणि साक्षात्कारी सत्पुरुषात मुख्य फरक असतो.
तुझ्या नामाचा हा छंद । सहज घडो ब्रह्मानंद ।।
            अभंगाच्या दुसऱ्या चरणात आनंदनाथ म्हणतात, हे दयाळा स्वामीनाथा ! सतत तुझे नाम ओठी राहावे, केवळ तुझ्या नामाचा छंद मला लागावा, एवढेच मला दे. मला जगाने वेडा म्हटले तरी चालेल त्याची मला काही चिंता नाही. मला फक्त तुझ्या नामाचे वेड लागू दे, तुझ्या नामाचे चिंतन हाच ध्यास राहु दे. हिच एक आस आहे की, तुझ्या नामाचा छंद असाच राहावा कारण यानेच मला अगदी सहज ब्रह्मानंद प्राप्त होतो. हा ब्रह्मानंद असाच रोज घडावा यासाठी तुझ्या नामाचा छंद असाच राहू दे, हिच एकमेव मागणी आनंदनाथ करतात.
रंग भरोनी हृदयी । प्रेमभाव असो देही ।।
         आपल्या तिसऱ्या चरणात आनंदनाथ आणखी थोडे पुढे जाऊन स्वामींना सांगतात, पतितपावना स्वामीराया ! तुझ्या भक्तिच्या रंगाने माझे हृदय भरून जावे. माझ्या मनातील ईतर सर्व षडविकार जळून त्याजागी केवळ प्रेमभाव असावा. माझा देह प्रेमभावाने रंगून जावा. सर्वाविषयी सद्भावना व वात्सल्य हिच माझी ओळख बनावी, एवढेच दान मला द्यावे, हिच माझी मागणी आहे.
हेची मागने दातारा । तुजपाशी की दातारा ।।
         दयाळा स्वामीराया ! मला कायम तुझा सहवास लाभावा, तुझी कायम सोबत मिळावी. सर्व जगाने जरी मला दूर लोटले तरी तू मात्र मला दूर लोटू नकोस, तू मला अंतर देऊ नकोस. तू मला सोडून जाऊ नकोस. हिच मागणी तुझ्यापाशी करतो आहे. कारण तू सर्व दातार आहेस. सर्व देवी देवतांही तुझ्याच दारात दान मागावयास येतात. त्या सर्वांना दान देणारा सर्व दातार आणि दयाळू तूच आहेस. तेव्हा माझी ही मागणीही तूच सहज पुर्ण करु शकतोस म्हणून तुला ही विनंती करत आहे. अशी विनंती आनंदनाथ अभंगाच्या चौथ्या चरणात करत आहेत.
आनंद म्हणे श्री गुरुनाथा । सख्या ऐकावे समर्था ।।
           आनंदनाथ महाराज अभंगाच्या शेवटी स्वामी महाराजांना विनंती करत आहेत की, स्वामी आपणच माझे गुरु आहात, आपणच माझे सखे सोबती आहात. तेव्हा आपल्याला मी आपला शिष्य म्हणून आणि त्याही पेक्षा आपला सखा सोबती म्हणून हे मागणे मागत आहे. आपण माझ्या सोबत कायम राहावे आणि माझ्याकडून सर्वांशी प्रेमभावपूर्वक वर्तन घडावे, हिच माझी अंतिम विनंती आहे. असे आनंदनाथ महाराज आपल्या अभंगाच्या शेवटी करताना दिसतात.
        स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या स्वरुपात एकरुप झाल्यामुळे आनंदनाथ महाराजांना लहान - मोठे, गरीब - श्रीमंत, आपला - परका असा कोणताही भेदाभेद उरला नव्हता. मी स्वामींचा आणि स्वामी माझे, त्यामुळे सर्व सृष्टीमधेही ते स्वामींची निर्मिती म्हणून स्वामींनाच पाहत असत. कोणी कितीही वाईट वागले तरी त्यांना त्याचे काहीच नसे. सुख आणि दुःख या जाणीवे पलिकडील परब्रह्म तत्वात समाविष्ट झालेल्या आनंदनाथ महाराजांना भेदाभेद दिसणार तरी कसा ? यामुळेच आनंदनाथ महाराजांना प्रसिद्धिचे ही काहीच देणे घेणे नव्हते. ते नेहमी प्रसिद्धिपासून कोसोदूर राहिले. आपण ही तसेच स्वामी महाराजांच्या स्वरुपात एकरुप होण्याचा प्रयत्न करुण आपले कल्याण साधावे, सर्वाविषयी दयाभाव दाखवावा. हाच आजच्या अभंगाचा मतितार्थ आहे.
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ । सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
 श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु