परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज स्वरूप वर्णन !



श्री स्वामी समर्थ
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
स्वामी वैभव दर्शन
पुष्प 02 रे
परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज स्वरूप वर्णन !
ब्रह्मांडनायक स्वामींचा सर्वंश्रेष्ठ अधिकार व अगाध स्वामी शक्ती याची जाणीव करून देणारा अप्रतिम लेख !
स्वामी भक्त हो, आपण पहिल्या लेखात परब्रह्माचे वास्तव्य स्थान अक्कलकोट क्षेत्राबद्दल माहिती घेतली. आजपर्यंत कधीही व कुठेही न ऐकलेले माहात्म्य आपण काल वाचले असेल. सर्वं स्वामी भक्तांना अक्कलकोटची ओढ लावणारा व तेथिल चरण धूली आपल्या माथी धारण करण्यास लावणारा हा अनुभव होता.
असे बऱ्याच भक्तांनी कळवले. आज आपण या अक्कलकोटाला एवढे माहात्म्य ज्यांच्यामुळे प्राप्त झाले, त्या पुर्ण परब्रह्म स्वामी महाराजांची महती समजावून घेणार आहोत. ही माहिती आपल्याला नक्कीच रोमांचकारी ठरेल, यात शंका नाही. तेव्हा आपण आता सूरू करू या……
साधक जनहो, आज आपण स्वामी कृपाकिंत परमश्रध्देय श्री आनंदनाथ महाराज यांचा परब्रह्म स्वामींची स्वरूप ओळख करून देणारा अभंग पाहाणार आहोत. आजपर्यंत आपण नेहमीच ऐकले आहे की, स्वामी महाराज परब्रह्म आहेत, ब्रह्मांडनायक आहेत, राजाधिराज आहेत. तर हेच आपण आज आनंदनाथ महाराजांच्या स्वानुभवातून जाणणार आहोत की, स्वामी महाराज नेमके कोण ? स्वामींचा नेमका अधिकार कोणता ? स्वामींचे नेमके सामर्थ्य कोणते ? स्वामी सखा आनंदनाथ महाराज यांचा जवळपास सहा वर्षाचा काळ हा स्वामी समवेत अक्कलकोटात गेला आहे. त्यानंतर मग स्वामींनी त्यांना आपले आत्मलिंग स्वमुखातून काढून देऊन वेगुंर्ल्याला जायचा निरोप दिला व पुढिल कार्याची आज्ञा दिली. यांनतर ही ते अनेक वेळा अक्कलकोटी येऊन आपल्या सद्गुरू चरणी विलीन होत असत. या काळात त्यांना स्वामींच्या अधिकाराचा व सामर्थ्याचा आलेला अनुभव त्यांनी पुढिल अभंगाद्वारे अतिशय रसाळपणे प्रकट केला आहे.
आम्ही नमू ऐशा पाया । देह नाही जेथे वाया ॥1
काय उणे त्याच्या घरा । ऐशा नमिले दातारा ॥2
नाम शोभे कृपावंत । स्वामीराज समर्थ ॥3
तोची माझा बुध्दिदाता । आम्हा बळे खेळविता ॥4
चौदा विद्या पायापासी । रिध्दी सिध्दी ज्याच्या पायी ॥5
चौसष्ट कला त्या अंकित । देव ज्यासी  शरणागंत ॥6
ब्रह्मा वेदाचा आधारी । श्वानरूपे ज्याच्या द्वारी ॥7
आदिदेव शिव जाण । ज्यासी समर्थांचे ध्यान ॥8
विष्णू लक्ष्मीचा पती । आज्ञा वागवितो चित्ती ॥9
इंद्र जाहाला छडीदार । काळ ज्याचा हो चाकर ॥10
देव सिध्द सेवा करी । योगी आठवी अंतरी ॥11
तेथे मानव पामर । भुलोनी गेले कैसे नर ॥12
आनंद म्हणे ऐशा पाया । भावे नमू स्वामीराया ॥13
वरील अभंगाद्वारे आनंदनाथ महाराज सांगतात की, भक्त जनहो, आम्ही ज्या परब्रह्माच्या चरणी शरण गेलो आहोत, तेच आमचे भाग्यविधाते आहेत. आम्हाला सद्गती ही केवळ याच पायाजवळ मिळणार आहे. हे चरण काही साधे सुधे नाहीत, तर जेथे सर्वंच देवता नतमस्तक होतात, जो आदि आणि अनंत आहे. ते पदकमल म्हणजे स्वामी चरण आहेत. त्यामुळे या पायावर नतमस्तक होताना आम्ही धन्य झालो आहोत. आमचा जन्म सार्थकी लागला आहे. स्वामी हे पुर्णावतार परब्रह्म आहेत. सर्व ब्रह्मांडाचे मालक आहेत, त्यामुळे आम्हाला इतर कुठे जायची गरजच नाही. आमच्या स्वामी देवाजवळ काहीच उणे नाही, कशाचीही कमतरता नाही. जे आपल्याला पाहिजे ते स्वामी चरणाजवळ मिळेल. जेथे आपल्याला दान देणाऱ्या देवता ही याचक म्हणून उभ्या असतात, त्या सर्व दातार स्वामींच्या दारात काय कमी असणार ! म्हणूनच त्यांना दिलेले श्री स्वामी समर्थ हे नाव फक्त त्यांनाच शोभून दिसते. कारण ते श्री म्हणजे सर्व ऐश्वर्यंसंपंन्न आहेत, स्वामी प्रमाणे सर्व ब्रह्मांडाचे मालक आहेत, तसेच ते स्वत: परब्रह्म असल्यामुळे सर्व बाबतीत समर्थ आहेत. त्यांना ईतरांकडे पाहाण्याची आवश्यकता नाही. एवढे श्री स्वामी समर्थ असूनही ते आपल्या भक्तांसाठी नेहमी कृपावंत आहेत, आनंदनिधान असणारे स्वामीराज समर्थ आहेत. अनंतकोटी ब्रह्मांडाचे मालक असलेले स्वामी सर्वांचेच मार्गदर्शक आहेत. आपल्या सर्वांना बुध्दि देणारे बुध्दिदाता ही तेच आहेत, आपल्या मनात विचारांचे द्वंद निर्माण करून आपली परिक्षा पाहणारे व आपण त्या सर्वशक्तीमान स्वामींच्या स्वरूपाला ओळखतो की विसरतो ? याचा खेळ रचणारे ही स्वामींच आहेत. तेव्हा अशा वेळी भक्तांनी सावध होऊन फक्त स्वामींचरणांचा ध्यास धरावा, तरच मार्ग सापडेल. अन्यथा आपण पदभ्रष्ट होऊ. कारण चौदा विद्या, चौंसष्ट कला, रिध्दि व सिध्दी या त्यांच्याच पायापाशी विराजमान आहेत. मानवी बुध्दिला भुरळ पाडणाऱ्या व मनुष्याच्या मनात षड् विकार निर्माण करणाऱ्या वरील सर्व गोष्टी या स्वामींच्या अंकित आहेत. म्हणून त्यांना शरण गेल्यास आपण हा भवसागर सहजतेने पार करून जाऊ. असे आनंदनाथ महाराज सांगत आहेत.
अहो, फक्त चौदा विद्या, चौसष्ट कलाच नाही तर सर्वं देव सुध्दा स्वामी जवळ शरणागत भावनेने उभे आहेत. असे आनंदनाथ महाराज सांगत आहेत. ते म्हणतात की, तसे पाहता ब्रह्मदेव हे जगाचे निर्माते आहेत, पण त्यांना वेदाचा आधार आहे, वेद हे ब्रह्मदेवांचे मार्गदर्शक आहेत. परंतु हेच चार वेद मात्र माझ्या स्वामींच्या दारात चार श्वान म्हणजे चार कुत्रे बनून शरणागत भावाने राहातात. जो सर्वांचा आदिदेव आहे असे म्हणतात, तो सर्व देवांत श्रेष्ठ म्हणून त्याला महादेव म्हणतात. ते भगवान शिव शंकर सुध्दा सदैव माझ्या स्वामींचेच ध्यान करतात. त्यांच्याच भजनात दंग होतात, एवढे माझे स्वामी महान आहेत. तर दुसरीकडे सर्व जग हे धनाच्या मागे धावते, अन् या धनाची देवता लक्ष्मी ही ज्या भगवान विष्णूंची धर्मपत्नी आहे. तो श्रेष्ठ लक्ष्मीपती सदैव आपल्या चित्तात स्वामी आज्ञेचेचं पालन करतो. हा स्वामींचाच अधिकार आहे. असे आनंदनाथ महाराज सांगत आहेत. अहो, जेथे या प्रमुख देवताच जर स्वामींच्या आज्ञेत वागतात, तर तेथे इतर सामान्य देवतांचा काय पाड ?  सामान्य देवता तर बिचाऱ्या पडेल ती स्वामी आज्ञा शिरसावंद्य मानणारच ना ! अन् आहे ही तसेच, इतर देवतां मध्ये सर्वश्रेष्ठ असणारा देवराज इंद्र हा स्वामींचा छडीदार म्हणजे चोपदार झाला. तर ज्यांच्या भयाने सर्व भयभित होतात, तो काळ हा स्वामींची चाकरी करू लागला. तेव्हा इतरांची कथा काय वर्णावी ! सर्व देवता, सिध्द ज्यात यक्ष, गंधर्व, किन्नर हे स्वामींची सेवा तत्परतेने करू लागले. एवढा समर्थ आणि राजस माझ्या स्वामींचा दरबार आहे. या सर्वांचे राजाधिराज माझे स्वामी महाराज आहेत. असे आनंदनाथ महाराज सांगतात.
भू-तलावरील सर्व योगी केवळ माझ्या स्वामींचीच सदैव चित्तात आठवण करतात. स्वामींचेच नामस्मरण करतात. स्वामी नामात सदैव दंग राहतात. एवढे सगळे होत असताना ही आमच्या सारखे पामर मनुष्य प्राणी  मात्र स्वामींना कसे काय विसरून गेले आहेत, हेच कळत नाही. जेथे सर्व शक्तीमान देवता ही त्यांच दास्यत्व मानन्यात धन्यता मानतात, त्या परब्रह्म स्वामींना यत्किंचतही स्वत:चे अस्तित्व नसलेले मानव प्राणी मात्र विसरून गेले आहेत, याचे मोठे कोडे वाटते. व अशा मनुष्य प्राणांची किव ही येते. असे अत्यंत कळवळीने आनंदनाथ सांगत आहेत. तेव्हा आता तरी सर्व मानव जातीने तत्परतेने आपली चूक सुधारून, डोळ्यावरील अज्ञानाचा पडदा दूर करून, मनातील शंका कूशंकाचे खुळ काढून, शरणागत भावनेने, प्रेमभावातून स्वामी चरणावर धाव घ्यावी व आपले कल्याण करून घ्यावे. हीच तळमळीची व आपुलकीची मागणी आपल्या अभंगाच्या शेवटी सर्वांना स्वामी सखा आनंदनाथ महाराज करत आहेत.
सज्जनहो, आपल्याला वरील अभंगातून आपल्या पुर्ण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची ओळख नक्कीच झाली असेल. तेव्हा आता मनातील सर्व किंतु-परंतु काढून अक्कलकोट स्वामींना शरण जावून आपल्या जीवनाचे सार्थक करावे, हीच आपल्याला आग्रहाची मागणी आहे. स्वामी महाराज हे अंतिम सत्य आहेत, त्यामुळे इतरस्त्र कुठेही न फिरता आपला सर्व भार हा स्वामीवर सोपवून स्वामींना शरण जावे. हिच अंतिम ईच्छा व्यक्त करून इथेच विरामतो..!
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ  सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ 
॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥