अक्कलकोट


अक्कलकोट हे शहर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हायात येते. हे तालुक्याचे ठिकाण असून महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर वसले आहे. अक्कलकोटला एस. टी. बसने व रेल्वेने येता येते. सोलापूर, नळदुर्ग, गुलबर्गा, गाणगापूर, अफजलपूर या मार्गाने येता येते. अक्कलकोटचे ऐतिहासिक महत्व असून हे पूर्वी संस्थान होते. येते राजघराण्याची गादी असुन भोसले हे संस्थानिक आहेत. श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले, पहिले शहाजीराजे, मालोजीराजे, फत्तेसिंहराजे तिसरे व श्रीमंत विजयसिंहराजे भोसले असे पराक्रमी व कर्तबगार राजेहोऊन गेले.अक्कलकोट शहराची ख्याती सबंध महाराष्ट्रभर आणि देशभर पसरली ती म्हणजे दत्तावतारी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचेमुळे. श्री स्वामी समर्थाचा हा अवतार श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे कारकीर्दीत झाला. श्रीमंत मालोजीराजे भोसले हे स्वामी भक्त होते. अक्कलकोट मधील २२ वर्षांच्या वास्तव्यात श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेक चमत्कार करून यांची महती सर्व महाराष्ट्रभर पसरली. अक्कलकोटचे पूर्वीचे नाव होते प्रज्ञापूर. स्वामींच्या वास्तव्याने पावन झाल्याने नंतर ते अक्कलकोट म्हणून जगात प्रसिध्द झाले. स्वामी महाराजांनी अक्कलकोट मध्ये तब्बल २२ वर्ष आपले वास्तव्य ठेवले. येथेच स्वामींनी निजसमाधी घेऊन आपले अवतारकार्य संपविले. अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. ज्या वटवृक्षाखाली परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज बसत, तेथेच आज एक विशाल मंदिर उभे राहीले आहे. जे वटवृक्ष स्वामी देवस्थान (श्री स्वामी समर्थ अन्नछत्रमंडळ ट्रस्ट, अक्कलकोट) म्हणून ओळखले जाते. या मंदिराजवळच अन्नछत्र आहे, जे आज श्री जन्मेजय विजयसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सूरू आहे. येथे भाविकांना दररोज दुपारी १२ वा. व रात्री ०८ वा. विनामुल्यपणे महाप्रसाद मिळतो. मंदिराच्या अन्नछत्रामध्ये प्रत्येक दिवशी अंदाजे ४/५ हजार भाविक महाप्रसाद ग्रहण करतात. मंदिराची धर्मशाळा अप्रतिम आहे. याशिवाय अक्कलकोट मध्ये इतरही काही धार्मिक महत्व असलेली स्थळे आहेत. त्यापैकी स्वामींचा प्रिय शिष्य श्री चोळाप्पा महाराज यांच्या ईच्छेप्रमाणे त्यांचे घरी स्वामी महाराजांनी अखेरची विश्रांती घेतली  ते समाधी मंदिर आहे. तसेच स्वामींचे परमशिष्य बाळाप्पा महाराज यांचा मठ आहे. नुर बाबाचा दर्गा आहे. अक्कलकोट-गाणगापून रोडवर संस्थानने उभारलेले भक्तनिवास व तेथे स्वामींच्या लिलांचे चित्ररूपात प्रर्दशन मांडलेले आहे, जे प्रत्येक स्वामी भक्तांनी अक्कलकोटला गेल्यावर अवश्य पाहावे. दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमित आज ही स्वामींचा सहवास जाणवतो, व आपल्या भक्ताला त्यांनी दिलेल्या ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीसी आहे’ याची प्रचिती येते. देशभरातील दत्तभक्तांचे पवित्र ठिकाण म्हणून अक्कलकोट प्रसिध्द आहे. अक्कलकोट हे दिन-दुबळ्यांची पंढरीच आहे. येथे प्रत्येकाला आधार मिळतो.
        अक्कलकोटचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथिल एक मोठे शस्त्रगृह. येथे अनेक जुन्या परंपरागत शस्त्रांचा संग्रह येथील भोसले राजघराण्याने प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवलेला आहे. वेगवेगळी खड्गे, ढाली, बर्च्या, भाले, दांडपट्टे, कुऱ्हडी, बंदुका, खंजीर इत्यादी वस्तू प्रदर्शनात ठेवल्या आहेत. प्रदर्शनात येथील राजकन्येचा लहान मुलांच्या खेळण्यातील गाड्यांचा संग्रहदेखील आहे. राजपुरुषांची सुंदर आणि रंगीत छायाचित्रे प्रदर्शनात मांडली आहेत.

              श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु