श्री स्वामीदेव


परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज !
          अनंतकोटी ब्रह्मांडनायक परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज ही एक अनाकलनीय चैतन्य शक्ती आहे. जिचा शोध वेदांनाही लागू शकत नाही.  भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पुर्णपरब्रह्म आहेत. ते या अनंतसृष्टीचे मुळ मुळ तत्व आहेत. त्यांना ना उगम आहे ना अंत आहे. एवढे अगाध आणि अर्तक्य माहात्म्य स्वामी महाराजांचे आहे. स्वामींची अल्प शब्दातील ओळख म्हणजे ‘मुळ मुळीचा आकारू  तोचि अक्कलकोटीचा कृपाळू ’ अशीच आहे. यामागचे कारण ही तसेच आहे. या परब्रह्माने आपल्या अक्कलकोटीच्या वास्तव्यात केवळ आणि केवळ जनकल्याणाचेच कार्य केले. मुढ अज्ञानी लोकांना साध्या शब्दात परमार्थ समजावून सांगितला. लोकांच्या मनातील निरर्थक भीती आणि अंधश्रध्दा दुर केल्या. अनेक रुढ समजूती, रानटी प्रथा स्वामींची नाहीशा केल्या. नवस-तावस करणे, मुक्या प्राण्यांचे बळी देणे, असे प्रकार बंद केले. लोकांना मुळ आध्यात्मिक ज्ञान दिले. ईश्वराच्या सत्य स्वरुपाची ओळख करून दिली. तत्कालीन समाजात फोफावलेला शास्त्राचा टोकाचा प्रामाण्यवाद स्वामीं महाराजांनी खोडूनच टाकला होता. त्यामुळे स्वामी हे आपल्या मनात येईल असे ते वर्तन करीत आणि आपल्या भक्तांना तसेच करण्यास भाग पाडीत. स्वामींचे वर्तन हे जरी पुर्णपणे शास्त्रविरूध्द असले तरी त्यामागची त्यांची शिकवण ही सर्वाथाने योग्य आणि स्वत:च एक प्रामाण्य असे. अन् का असू नये ! जो स्वत:च सर्व वेदांचा ही कर्ता आहे, ज्याच्या आज्ञेने सर्व ब्रह्मांड चालते, त्याची शिकवण म्हटल्यावर ते वेदांनाही प्रामाण्य राहिल्याशिवाय कशी राहील. अशी स्वामींची विचित्र करणी होती.
दगड-धोंड्याच्या देवांची स्वामी महाराज तर फार फजिती करीत आणि त्यातील फोलपणा आपल्या भक्तांना दाखवून देत. दगड-धोंड्याची पूजा करण्यापेक्षा जीवंत गरजू लोकांची सेवा करावी, असे स्वामींचे फर्मान असे. हेच स्वामी महाराजांचे वेगळेपण होते. एकदा आपल्या घरात घुबड बसल्यामुळे घर सोडून निघालेल्या चोळाप्पाला स्वामी महाराजांनी खडसावून घरी परत आणले, आणि घरात घुबड शिरल्यावर घुबडाला घराबाहेर काढायचे असते, आपण घर सोडायचे नसते. अशी समजूत घालून अंधश्रध्दा दुर केली. अशी कितीतरी घटना आहेत, ज्याद्वारे स्वामींनी लोकांना सन्मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला.
स्वामी महाराज हे स्व:च परब्रह्म स्वरुप असल्यामुळे त्यांनी आपल्याकडे आलेल्या भक्तांना परत दुसरीकडे पाठविले नाही, तर त्यांना जीवनमुक्त करण्याचे कार्य केले. ज्यातून असंख्य शिष्य संप्रदाय तयार होऊन, समाजात जनजागृती आणि ईश्वर भक्तीचा प्रचार-प्रसार   फार मोठ्या प्रमाणात झाला. या अलौकिक शिष्यांच्या फळीत श्री आनंदनाथ महाराज वेंगुर्लेकर, श्री स्वामीसुत महाराज, श्री गजानन महाराज, शेगांव, श्री साईबाबा शिर्डी,  श्री बाळाप्पा महाराज, श्री गोपाळबुवा केळकर, श्री रामानंद बीडकर, श्री आळंदीचे नृंसिह सरस्वती इ. असे अनेक थोर विभूती स्वामींच्या कृपाछत्राने पावन होऊन जन कल्याण करत्या झाल्या. स्वामी महाराजांच्या समाधी नाट्यानंतर ही श्री शंकर महाराज, धनकवडी, पुणे आणि श्री पिठले महाराज यासारख्या महान विभूतींनी स्वामींच्या अगाध शक्तीचा आणि सर्वेश्वर स्वरूपाचा प्रत्यक्ष लाभ घेतला. ही बाब स्वामींचे परब्रह्मत्व अधोरेखित करणारी तर आहेच, सोबतच स्वामी महाराजांचा आपल्या अनाथ सृष्टी वासियांविषयी असलेला लळा स्पष्ट करणारी ही आहे.
परब्रह्म स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटी सकाळी 05 ते रात्री 10 वाजेपर्यंत लोकोध्दाराचे कार्य करीत असत. दीन, दुबळ्या, दु:खित लोकांना दु:खमुक्त करण्याचे काम करीत असत.  हे काम करताना आलेला माणूस किती पापी आहे, किती अधम आहे, याचा विचार ते कधीच करत नसत. फक्त आलेल्या दर्शनेच्छू व्यक्तीमध्ये समर्पण भाव आणि श्रध्दा यालाच ते महत्व देत. त्यामुळेच स्वामींच्या दरबारात शरणांगतांचा तात्काळ उध्दार होई, अन् जर कोणी ढोंगी, कपटी अथवा परिक्षा घेण्यासाठी आला असेल तर मग त्याच्या शेकडो पिड्यांचा उध्दार स्वामी महाराज शिव्यांची लाखोली वाहून करत असत. अशा वेळी स्वामींचा रागाचा पारा एवढा वर चढे की, समोरचा व्यक्ती गळीतगात्र होऊन गयवया करीत असे. एवढे प्रचंड अलौकिक शक्ती सामर्थ आणि भारदस्त शरीर स्वामीं महाराजांचे होते. स्वामी महाराजांच्या शरीरावरून त्यांची काया ही खुप प्राचीन तीनशे ते चारशे वर्षे जुनी असावी, असे भक्तांना वाटे. त्यामुळे काही भक्त्‍ा आणि लहान बालके हे स्वामींना ‘स्वामी आजोबा’ म्हणूनच हाका मारीत. तेव्हा स्वामी भगवान ही प्रेमळ हास्यद्वारे त्यांना ‘ओ’ देत असत. हे त्यांचे भक्तांपाठी असलेले विशेष प्रेम आणि वात्सल्य होते.
अशा पुर्ण परबह्माने 1878 मध्ये समाधी घेण्याचे नाटक जरी केले असले, तरी सुध्दा आजही ते आपल्या भक्तांना पुर्णपणे अभय देत उभे आहेत. ‘भिऊ नकोस, मी तुझ्या बरोबर आहे !’ हे शब्द आजही लाखो लोकांचे मनोधैर्य वाढवत आहेत. त्यांना जगण्याचे व संकटांना सामोरे जाण्याचे खुप मोठे बळ देत आहेत. अशा परब्रह्माचे आपण ही चरणानुदास होऊन आपले जीवन कृतार्थ करून घ्यावे, ही सर्वांना प्रार्थना.

                         श्री स्वामी महाराज अवतार रहस्य !

          परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे या सकल सृष्टीसाठी एक चैतन्य शक्ती होत. श्री स्वामी महाराजांचे येणे हे त्यांचे दैवी रहस्य आहे. कारण फक्त याच वेळी आणि याच रुपात प्रथमत:च परब्रह्म धरणीवर अवतरला आहे. हा परब्रह्म या पुर्वी कधीही भू-वर प्रकट झाला नव्हाता. प्रत्येक वेळी त्यांनी आपला अंश अवतारच या जगत् कल्याणासाठी पाठवला होता. पण या वेळी असे न करता हा परब्रह्म स्वत:च प्रकट झाला. ही आम्हा सृष्टी वासियांच्यासाठी फार मोठी आणि अलौकिक गोष्ट आहे. अन् यामध्ये ही अद्भूत बाब म्हणजे परब्रह्माने आपले प्रकटीरण हे मातेच्या उदरातून केले नाही. तर यावेळी या परब्रह्माने आगळी वेगळी आणि अगम्य लीला करून प्रत्यक्ष धरणी मातेलाच आपली जननी बनवले. चैत्र शुध्द द्वितीया या शुभ मुहुर्तावर परब्रह्म स्वामी महाराज हे धरणी दुभंगून छेली नावाच्या गावात प्रकट झाले.  येथून पुढे विश्व संचार करून लोकोध्दाराचे कार्य केले. दीन, मुढ जनांना आधार दिला. गोर-गरीबांना मायेची सावली दिली. अनाथांना आईची ममता दिली. अशा प्रेमळ आणि भक्तवत्सल स्वामी महाराजांचे प्रकटीकरण हे नेमके कशासाठी झाले आहे, याचे वर्णन त्यांचे पुत्रवत प्रिय शिष्य श्री आनंदनाथ महाराज यांनी अतिशय सुरेख आणि रसाळ शब्दात केले आहे. आपण ते त्यांच्याच शब्दात पाहू या......
समर्थांचा अवतार भक्तांसाठी झाला  तारावया भला कलियुगी ।।
वेद, शास्त्रे, श्रुती, पुराणे वर्णिती  अघडित कीर्ती समर्थांची ।।
सद्गुरू तारक घोर निवारक  ब्रह्मादिका कौतूक दावियेले ।।
नर सुरवर झाले हो अंकित  येती शरणांगत गुरुपाया ।।
आनंद म्हणे तरी निवडूनी घ्या रे  कलियुगी बा रे तरावया ।।
          आपल्या या अभंगाद्वारे श्री आनंदनाथ महाराज सांगतात की, सज्जनहो, भक्तवत्सल, दीनानाथ श्री स्वामी देवांचा अवतार हा केवळ आणि केवळ भक्तांच्या कल्याणासाठीच झाला आहे. या अंधकारमय कलियुगात सद्भक्तांना ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी आणि त्यांना मायेची ममता देण्यासाठीच हा ब्रह्मांडनायक भू-तलावर प्रकट झाला आहे. समाजात फोफावलेले प्रचंड अज्ञान, अंधश्रध्दा आणि अनाचार, अनीती यांचे उच्चाटन करण्यासाठीच हा देवाधिदेव आपल्या मुळ रुपात आणि मुळ शक्ती स्वरुपात अवतीर्ण झाला आहे. हा स्वामीदेव सर्व दु:खाचा हर्ता आहे. तो सर्व भक्तांचा पाठीराखा आहे. हा स्वामीदेव आपल्या सर्व लेकरांकडे सारख्याच ममत्वाने पाहत असतो, येथे कोणताही भेदाभेद नाही अथवा कोणतीही बंधने नाहीत. जन्माला आलेला प्रत्येक जीव हा स्वामींचाच बाळ आहे. त्याला स्वामीं महाराजांकडून वागणूक ही सारखीच मिळते, मग तो मनुष्य असो वा ईतर प्राणी, स्वामींच्या दरबारात सर्वजण समान आहेत. कारण श्री स्वामीदेवांचे प्रकटीकरण हे या कलियुगात आपल्या भक्तांना तारण्यासाठीच झालेले आहे. त्यांना मुक्तीचे भागीदार बनविण्यासाठीच स्वामींनी प्रकट होण्याचे प्रयोजन केलेले आहे. त्यामुळे जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मुक्तीचा मार्ग दाखविणे हेच स्वामींचे मुख्य अभिावचन आपल्या भक्तांना आहे. असे आनंदनाथ महाराज स्वामींच्या प्रकटीकरणाबद्दल वर्णन करताना दिसतात.
          पुढे स्वामींच्या अधिकाराबद्दल  आणि श्रेष्ठत्वाबद्दल सांगताना आनंदनाथ म्हणतात की, माझा स्वामीदेव हा या विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ आणि सामर्थ्यवान आहे. त्याला कोणतीही सीमा नाही, कोणतेही बंधन नाही. उलट त्यानेच सर्वांना आपल्या बंधनात बांधलेले आहे. माझ्या स्वामींचे शक्ती सामर्थ्य हे एवढे अगाध आणि अनंत आहे की, 04 ही वेद, 18 पुराणे 06 शास्त्रे, सर्व श्रुती यांनाही त्यांचे वर्णन करता आलेले नाही. एवढे अवर्णनिय आणि अनंत असे स्वामींचे शक्ती सामर्थ्य आहे. ज्यांच्या पुढे सर्व देवीदेवता या शरणांगत म्हणून उभ्या आहेत. माझा समर्थ सदगुरु हा मला सर्वच संकटातून तारण्यास आणि माझे सर्वच आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक घोर निवारण्यास समर्थ आहे. माझा स्वामीदेव हा एवढा श्रेष्ठ आहे की, ब्रह्मादी सर्व देवतांना माझ्या स्वामीदेवांचे आणि त्यांच्या सामर्थ्याचे कौतूक आहे. माझ्या स्वामींच्या सर्वश्रेष्ठत्वापुढे सर्वच नरनारी आणि देवी-देवता हे स्वामींचे अंकित होऊन स्वामींच्या सर्व आज्ञेचे पालन करतात. हे सर्वच माझ्या स्वामींचे शरणांगत आहेत. असा माझा हा श्री स्वामीदेव आहे,ज्याचा सर्वच लोकांनी गुरु म्हणून स्विकार करावा. आपले सदगुरू म्हणून माझ्या स्वामींची निवड सर्वांनी करून घ्यावी आणि या भयानक कलियुगात आपला उध्दार करून घ्यावा. असा संदेश आनंदनाथ देतात.
          अक्कलकोट स्वामी महाराज हे सर्व देवतांचे राजे आणि परब्रह्म तत्व आहेत, ते ब्रह्मांडनायकही आहेत. त्यामुळे या चराचर सृष्टीमधील सर्व जीवांचे कल्याण करणे आणि दुष्ट विचांराचे दमन करणे, हेच स्वामींचे मुळ प्रकटनामागचे रहस्य आहे. कलियुगातील वाढते पाप,अधर्म, अनीती, अत्याचार,  कमी होत चाललेली माणूसकी, सद्धर्म यामुळेच सर्व देवतांनी मिळून स्वामींची करुणा भाकली आणि स्वामींना या भू-वर प्रकट होण्यासाठी प्रसन्न केले. तेव्हा कुठे हा परब्रह्म ‘धरा भार उतराया ।’ प्रकट झालेला आहे. जगत् कल्याणासाठी स्वामींनी अक्कलकोटी वटवृक्षाखाली निवास केला आहे. अक्कलकोटातील स्वामींचे हे स्थान म्हणजे सकल जीवमात्रांचे मुक्तीस्थान आहे. हे स्थान वैकुंठापेक्षाही लाख पटीने श्रेष्ठ असणारे स्वामीधाम आहे. तेव्हा आपण सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्रेष्ठत्व आणि त्यांचे प्रकटीकरणाचे रहस्य जाणून घेऊन, स्वामींना संपुर्ण शरणांगत व्हावे. स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हावे, यातच सर्वांचे कल्याण आहे.

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥