स्वामी सेवा


 श्री स्वामी समर्थ 
परब्रह्म स्वामी महाराजांची सेवा कशी करावी ?
अक्कलकोट निवासी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात. परंतु अजूनही अंसख्य भाविकांना स्वामींची सेवा कशी करावी ? किंवा स्वामींची पुजा कशी करावी ? याबद्दल माहिती नाही. तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज काही लोकांमुळे निर्माण झालेले आहेत. यासर्वाचा विचार करून, त्याविषयी पुढिल विवेचन आहे.
स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेऊन करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा, मुर्तीची स्थापना करू शकतो. स्वामींची मुर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना आपल्या घरी करावी. यात कुठलाही भेद नाही. बरेच लोक सांगतात की, स्वामींची मुर्ती घरात ठेऊ नये. कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो, दर गुरुवारी षोडशोपचार पूजा करावी लागते. रोज नैवेद्य आरती करावी लागते. इत्यादि. इत्यादि. पण हा केवळ गैरसमज आहे, बाकी काही नाही. स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजा ही ते अतिप्रेमाने स्विकारतात. गजेंद्राने आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमल पुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपूऱ्या पूजेअभावी आपल्यावर रागवेल, ही भावनाच चूकीची आहे. तेव्हा स्वामी महाराज रागावतील ही भिती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी. जशी जमेल तशी स्वामींची पूजा, भक्ति व सेवा करावी.
        दूसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी तर ती कशी व कोणती ठेवावी ? कारण स्वामींच्या मुर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल निर्माण झालेले आहेत. तेव्हा आपण आता ते गैरसमज व त्याची सत्यता तपासून पाहू.....!
          अनंतकोटी  ब्रह्माण्डनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैसमज व त्यावर खुलासा....!
1) स्वामींची प्रतिमा (फोटो) फक्त राजयोगात असणारी पाहिजे, हातात ब्रह्मांड (गोटी) असलेली नको.
2)स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको.
3) स्वामींची मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको.
4) स्वामीं महाराज उभे असलेली प्रतिमा नको.
           कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात. सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी यांचे पूजन करू नये. हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का ? तर मुळीच नाही ! वरील सर्व गैरसमज हे धाधान्त खोटे व निर्रथक आहेत, कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांडनायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांडनायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही, म्हणणे म्हणजे त्यांच परब्रह्म स्वरूप व ब्रह्माण्डनायकत्वच अमान्य करण्यासारख आहे. तसेच जे स्वामी अक्कलकोटामध्ये 22 वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसले त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला मज्जाव करणे, आपल्या धर्मात जिला गोमाता मानले जाते, तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते असे म्हणतात, जिच्यात 33 कोटि देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे. जिचे मूत्र आणि विष्ठा हि पवित्र मानले जाते, किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही. अन सर्वात महत्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोट मधील आपल्या वास्तव्यकाळात ज्या भागीरथी गाईला क्षणभर ही अंतरू दिले नाही, तिच्या मृत्युनंतर तिची एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करुण समाधी बांधली. तिच्याच सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे, जे परब्रह्म आहेत, भक्तवत्सल भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत. त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करु नये असे म्हणणे किंवा वरील सर्व प्रकारच्या प्रतिमांचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींच्या परब्रह्म तत्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे. हा अपराध कोट्यावधी ब्रह्महत्या पेक्षाही ही मोठा आहे. स्वामींच्या लीलाकाळात श्री बाळापा महाराजापासून ते श्री आनंदनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षाखालील हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजत असत ज्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक जास्त आहेत. पण त्यांच कधीच काही अहित झाल नाही. तर मग त्यांचे कल्याण करुन त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमा पूजनाने आमचे काही अहित करतील, असा विचार मनात आणणे ही सुद्धा स्वामींची घोर प्रतारणा ठरेल !  असो. तेव्हा अशा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुर्लक्ष करुण, जशी जमेल तशी स्वामींची यथेच्छ सेवा करुण आपले कल्याण करुण घ्यावे, ही नम्र विनंती.....!
            स्वामी भक्तांनो, आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मुर्ती अथवा कोणतीही स्वामींची प्रतिमा ठेवा. स्वामींची मुर्ती असेल तर रोज मुर्तीला स्नान घालून, प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन अष्टगंध लावा. उपलब्ध असतील ती पुष्पे (फुले) स्वामींना अर्पण करा. स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात. त्यांना अप्रिय असे एक ही फुल नाही. तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही पुष्प किंवा तुळशी मंजुळा, तुळशी पत्रे स्वामींना वाहावित. नंतर अक्षता वाहाव्यात. त्यानंतर मग दिप अगरबत्ती ओवाळून, आपण जी भाजी भाकरी खातो, त्याचाच सकाळ संध्याकाळ नैवेद्य स्वामींना दाखवावा. एखादे वेळी शक्य नसेल तर दूध साखर, पेढ़े किंवा फरसाण ठेवले तरी चालेल. केलेली प्रत्येक गोष्ट अगोदर स्वामींना अर्पित करा. नैवेद्याच्या बाबतीत सुध्दा स्वामी महाराजांना प्रिय-अप्रिय असे काहीच नाही. अखिल सृष्टी ही त्यांचीच निर्मिती असल्यामुळे सर्वच पदार्थ स्वामींना प्रिय आहेत. तेव्हा अभक्ष्य (मांसाहार) सोडून ईतर सर्व पदार्थांचा नैवेद्य स्वामी महाराजांना चालतो. ही बाब सदैव ध्यानात ठेवा.  सकाळी उठल्या बरोबर स्वामींचे स्मरण करा. घराबाहेर पडताना व बाहेरुन घरात आल्यावर प्रथम स्वामींचे दर्शन अथवा स्मरण करा. हृदयात प्रेम, वात्सल्य, ममता ठेवा. आचरण शुद्ध ठेवा. प्राणी मात्राबद्दल दया असू द्या. कुणाबद्दल ही द्वेष, मत्सर ठेवू नका. सर्वांचे कल्याण व्हावे, हिच भावना सदैव असू द्या. काही कारणास्ताव एखादे दिवशी स्वामींची पूजा झाली नाही तरी त्याचे दुःख न करता त्या ऐवजी स्वामींची अंतःकरणातून क्षमा मागावी व स्वामींचे सतत नामस्मरण करावे. कारण कर्मकांडाचा देखावा करण्यापेक्षा ऱ्हदयांतून स्वामींचा ध्यास धरणे महत्वाचे आहे.
     नैवेद्य दाखवताना :- एका ताटात (भाजी-भाकरी, पोळी, भात,भजे पापड, मीठ, गोड पदार्थ, विडा) यापैकी जे असेल ते घ्यावे. स्वामींच्या अधिष्ठानासमोर एका पाटावर पाण्याने (तांब्यातील पाण्यात आपले उजव्या हाताची मधली दोन बोटे बुडवून घेऊन) एक चौकोन काढावा, त्या चौकोनावर हे ताट ठेवावे. ताटाच्या बाजुला एक तांब्या भर पाणी ठेवावे. ताटातील पदार्थावर व तांब्यातील पाण्यात तुळशी पत्रे टाकावीत. दिवा, धुप किंवा अगरबत्ती लावून स्वामींना ओवाळावे. तांब्यातील एक तुळशी पत्र घेऊन नैवेद्यावर तीन वेळा पाणी शिंपडावे व तीन वेळा फिरवावे. पाणी शिंपडताना गायत्री मंत्र म्हणावा, गायत्री मंत्र येत नसेल तर ‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी शिंपडावे. यानंतर मग तीन वेळा पाणी फिरवताना, ‘ प्राणाय स्वाहा:।,  अपानाय स्वाहा:।,  व्यानाय स्वाहा:,  उदानाय स्वाहा:,  समानाय स्वाहा:  ब्रह्मणे अमृत्वाय स्वाहा:।’ हे मंत्र अथवा ‘श्री स्वामी समर्थ’ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी ताटावरुन फिरवावे. नंतर ते तुळशीपत्र स्वामींना अर्पण करुन नमस्कार करावा. अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखविला जातो. नैवेद्य दाखविल्यानंतर 15-20 मिनिंटानी ते नैवेद्याचे ताट स्वामींना नमस्कार करुन उचलून घ्यावे व आपल्या भाजीत भाजी आणि भाकरीत भाकर मिळसावी. जेणेकरून घरात कायम अन्नपुर्णेचा वास राहिल.
वरील प्रमाणे आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची पुजा करावी. या सोबत रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे 1/3/7 अध्याय वाचन करावे. रोज श्री गुरुस्तवन स्तोत्र, श्री स्वामीचरित्र स्तोत्र, श्री स्वामी पाठ आणि तारक मंत्रासह किमान 3 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. याला स्वामींची नित्यसेवा असे म्हणतात. जो कोणी एवढी स्वामींची नित्यसेवा करतो. त्यांचा संपुर्ण योगक्षेंम स्वत: स्वामी महाराज चालवतात. असे अभिवचन स्वामी महाराजांनी दिलेले आहे. तेव्हा ही सेवा करून आपले जीवन सार्थकी लावावे, ही नम्र विंनती.
 पारायणाचे नियम 
परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पुर्णब्रह्म आणि अनंतकोटी ब्रह्मांडनायक आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे. प्रत्येक वस्तूत व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे, असे आपला धर्म व संस्कृती सांगते. आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत असतो, तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ, काळ आणि वेळेचे कसलेही बधंन आपल्याला नाही. हे जरी सत्य असले तरी ईच्छित कार्यपुर्तीसाठी संकल्पयुक्त 11, 21, 33, 51, 108 अशा संख्येत घरी पारायण करताना खालील बाबीचे पालन करावे.
1.पारायण काळात घरात शांतता व पवित्रता ठेवावी. स्वामी नाम चिंतन करावे.
2.पारायण हे गुरुवार किंवा शुभ दिवस पाहून सुरू करावे. पारायण हे संकल्पपुर्वक करावे.
3. पारायण हे शक्य तो देवघरात करावे, ईतर ठिकाणी पारायण करावयाचे असल्यास तेथे स्वामी महाराजांचे अधिष्ठान मांडावे.
4. पारायण सुरु करण्यापुर्वी स्वामींना श्रीफळ अर्पण करून विनंती करावी.
5.रोज एक वेळा श्री स्वामी स्तवन आणि श्री स्वामी पाठ वाचून नंतर एक माळ स्वामी मंत्राचा जप करावा. नंतर रोजचे तीन अध्याय किंवा पारायण वाचन करावे. सर्वात शेवटी एक वेळा तारक मंत्र म्हणावा.
6.ग्रंथ चौरंग किंवा पाटावर ठेवावा. पारायण करताना पुर्व किंवा उत्तरमुखी बसावे. दिवा व अगरबत्ती चालू असावी.
7. अध्याय वाचन सुरु करण्यापुर्वी एक वेळा आनंदनाथ विरचित गुरूस्तवन वाचावे आणि 01 माळ श्री स्वामी मंत्राचा जप करावा. तसेच रात्री झोपताना एक वेळा तारक मंत्र म्हणावा.
8. अध्याय वाचन हे संथ गतीने आणि एकाग्रपणे करावे. त्यातील मतितार्थ समजून घ्यावा.
9. पारायण काळात आपण कोणतेही शुध्द शाकाहारी अन्न खाऊ पिऊ शकतो. याला कसलेही बंधन नाही. फक्त अभक्ष्य भक्षण (मांसाहार) करू नये आणि अपेयपान (मद्यपान) करू नये. पारायण काळात परान्न घेऊ नये.
10. पारायण काळात आचरण कसे असावे ? असा एक खुप मोठा प्रश्न भाविकांना पडतो. तेव्हा याचे उत्तम उदाहरण पाचवा वेद म्हणून प्रसिध्द गुरूचरित्र ग्रंथात दिलेले आहे. ‘अंत:करण असता पवित्र  सदा वाचावे गुरूचरित्र ’ याप्रमाणे आचरण ठेवावे. बाकी ईतर देखावा करण्यात काहीच अर्थ नाही.
11. वेळ कोणती असावी ? हा एक प्रश्न आहे. तर पारायण हे शक्यतो सकाळी किंवा सांयकाळी करावे करावे. किंवा आपण आपल्या वेळेनुसार कधीही वाचू शकता. कारण आनंदनाथ महाराजांनी म्हटलेले आहे की, ‘आनंद म्हणे शुभ वेळ  स्वामीदासा सर्व काळ 
12. अशौच (सुतक / वृध्दि) याकाळात 10 दिवस वाचन बंद ठेवावे.
13. महिलांनी अडचणीचे 04 दिवस वाचन बंद ठेवावे.
14. संकल्पित पारायण काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे.
15. संकल्प पुर्ण झाल्यावर 3, 5, 7, 9 या संख्येत बाल-गोपालांना जेऊ घालावे.
16. सांगतेचा संकल्प करून स्वामींना परत एकदा श्रीफळ अर्पण करावे.
वरील सर्व नियम हे घरी आसन मांडून संकल्पयुक्त करत असलेल्या पारायणासाठी लागू असून, नित्यसेवेच्या माध्यमातून रोज 1/3/7 अध्याय वाचताना हे नियम पाळायची काहीही आवश्यकता नाही.
 पारायणाच्या सुरूवातीला पहिल्या दिवशी करावयाचा संकल्प 
(हातात पाणी घेऊन त्यात अखंड पाच-सात अक्षता व थोडा अष्टगंध किंवा कुंकू टाकावे. नंतर पुढिल संकल्प म्हणावा.)
‘हे पुर्ण परब्रह्म ब्रह्मांडनायक श्री स्वामी महाराज मी …………(स्वत:चे नाव) गोत्र………. (गोत्र माहित नसल्यास कश्यप गोत्र म्हणावे) गांव…….(गावाचे नाव) येथिल रहिवाशी असून आपला सेवक आहे. माझे हे………..(आपली समस्या, अडचण याचा उल्लेख करावा) कार्य साध्य व्हावे, या संकल्प पुर्तीसाठी मी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे…….(पारायण संख्या) एवढे पारायण करणार आहे.
हे सर्वनियन्ता श्री स्वामी देवा! मी आपल्या सर्वसाक्षित्वाचे आणि सर्वेश्वर स्वरूपाचे स्मरण करून, चराचरात असलेले आपले अस्तित्व स्मरण करून ही सेवा करत आहे. या सेवेने संकल्पित कार्याव्यतिरीक्त मला आपल्या ब्रह्मांडनायक मुळ शक्ती स्वरूपाची जाणीव होऊन आपली कृपादृष्टी प्राप्त व्हावी. तसेच या सेवेसाठी आपले कृपाशिर्वाद मिळून ही सेवा निर्विघ्नपणे पुर्ण करून घ्यावी, हिच आपल्याला विनंती.’
 श्रीस्वामीचरणार्पणमस्तु 
(असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे.)
 सांगतेचा संकल्प शेवटच्या दिवशी करावयाचा संकल्प 
(हातात पाणी घेऊन त्यात अखंड पाच-सात अक्षता व थोडा अष्टगंध किंवा कुंकू टाकावे. नंतर पुढिल संकल्प म्हणावा.)
‘हे पुर्ण परब्रह्म ब्रह्मांडनायक श्री स्वामी महाराज मी …………(स्वत:चे नाव) गोत्र………. (गोत्र माहित नसल्यास कश्यप गोत्र म्हणावे) गांव…….(गावाचे नाव) येथिल रहिवाशी असून आपला सेवक आहे. माझे हे………..(संकल्प सोडताना पहिल्या दिवशी उल्लेख केलेली आपली समस्या, अडचण याचा उल्लेख करावा) कार्य साध्य व्हावे, या संकल्प पुर्तीसाठी मी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे…….(पारायण संख्या) एवढे पारायण पुर्ण केले आहेत.
हे सर्वनियन्ता श्री स्वामी देवा! मी आपल्या सर्वसाक्षित्वाचे आणि सर्वेश्वर स्वरूपाचे स्मरण करून, चराचरात असलेले आपले अस्तित्व स्मरण करून ही सेवा केली आहे. या सेवेने संकल्पित कार्याव्यतिरीक्त मला आपल्या ब्रह्मांडनायक मुळ शक्ती स्वरूपाची जाणीव होऊन आपली कृपादृष्टी प्राप्त व्हावी. तसेच या सेवेसाठी आपले कृपाशिर्वाद मिळून ही सेवाआपण माझ्याकडून निर्विघ्नपणे पुर्ण करून घेतली, त्यामुळे मी ही सेवा आपल्याच पवित्र पावन चरण कमली समर्पित करतो. आपण या अत्यल्प सेवेचा स्विकार करून, मला ईच्छित फलप्राप्ती द्यावी. आपली अखंड कृपादृष्टी माझ्या संपुर्ण कुटुंबाला लाभावी, हिच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना.’
 श्रीस्वामीचरणार्पणमस्तु 
(असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे.)
 श्री वटवृक्ष स्वामी प्रसन्न 

रोजचे अध्याय वाचन झाल्यावर खालीलपैकी एका मंत्राचा तीन माळी जप करावा.
जप हा अतिशय संथगतीने आणि शांत चित्ताने एकाग्रतापुर्वक करावा.

 स्वामी  

 श्री स्वामी समर्थ 

 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ