स्वामी देई हेंचि दान। नित्य चरणांचे दर्शन ॥



श्री स्वामी समर्थ
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
स्वामी वैभव दर्शन भाग -02
॥ श्री स्वामीसुताची सत्यवाणी ॥
पुष्प 12 वे
स्वामी देई हेंचि दाननित्य चरणांचे दर्शन
स्वामी भक्तांनो,
               आपल्या पुर्व संचिताच्या पुण्याईमुळे आपल्याला परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. घर-दाराचा किंवा संसाराचा त्याग न करता, आपल्याला सहजतेने मुक्ती मिळवून देणारे हे स्वामी चरण प्राप्त झाले आहेत. हे आपले परम भाग्य आहे. हजारो वर्षाच्या खडतर तपानेही लक्षावधी योग्यांना प्राप्त न होणारे मुक्तीदाते स्वामी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत, ही त्यांनी आपल्यावर केलेली फार मोठी कृपादृष्टी आहे. आध्यात्मिक वाटचाल करत असताना योग्य सद्गुरू भेटणे म्हणजेच मोक्षप्राप्तीची अर्धी वाटचाल पुर्ण केल्यासारखे आहे, त्यात ही सद्गुरू जर स्वत: परब्रह्म स्वामी महाराज असतील तर मग मोक्षप्राप्तीची चिंता करण्याचे काहीच प्रयोजन नाही. कारण ज्याच्या अधिन संपूर्ण ब्रह्मांड आहे तो जर आपला सांगाती असेल तर मग व्यर्थ चिंता करणेच नको.

               दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामी महाराजांचा आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण खुप दान धर्म करावा, खुप मोठ मोठी पारायणे करावीत, खुप जप तप अनुष्ठान करावीत, किंवा मोठ मोठाले यज्ञयाग करावेत, असे काहीही नाही. तर हा अक्कलकोट परब्रह्म आपलासा करण्यासाठी आपल्याला फक्त आपले चित्त शुध्द ठेवायचे आहे. कारण स्वामी महाराज हे भाव-भक्तीचे भुकेले आहेत. त्यांना ईतर काहीही नको. फक्त शुध्द भक्तीभाव आणि या शुध्द भावातून केलेले स्वामी नाम स्मरण, एवढ्यानेच हा अक्कलकोटस्थ परब्रह्म आपला संपूर्ण योगक्षेंम चालवतो. त्यामुळे अंतरबाह्य शुध्द होऊन स्वामी नामाचे भजन करणे हिच आपली स्नान संध्या आहे आणि हाच आपला सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे. एवढे ज्याने साधले त्याला स्वामींचा आशिर्वाद नक्कीच मिळेल. मात्र जर कोणी बाहेरून भक्तीचे नाटक केले आणि चित्त मात्र शुध्द नसेल तर अशा ढोंगी लोकांना स्वामी महाराज एक दिवस सुंदराबाई सारखे अलगद दुर लोटतात. हे ही तितकेच सत्य आहे. तेव्हा प्रत्येकाने स्वामी महाराजांची सेवा करत असताना चित्त शुध्द ठेऊन प्रामाणिकपणे स्वामी सेवा करावी.
ही सेवा कशी करावी ? याची शिकवण देणारा हा आजचा अभंग आहे. सद्गुरू आज्ञेने आपले घर लूटवून आणि धनाचा त्याग करून हरिभाऊ तावडे हे स्वामींच्या भजनी रंगून गेले, आपले तन, मन त्यांनी स्वामींना अर्पण केले, स्वामी शिवाय ईतर कशाचीही अपेक्षा त्यांनी ठेवली नाही. मान-अपमान याचे त्यांना काहीही सोयर सुतक नव्हते, फक्त स्वामी सेवा आणि स्वामी चरण हेच त्यांचे सर्वस्व होते. त्यांच्या दृष्टीपुढे कायम स्वामींचे मंगलमोहक रूप असायचे, स्वामी नामाशिवाय त्यांचा एक ही श्वास बाहेर निघायचा नाही. एवढे एकत्व स्वामीसुत हरिभाऊंचे स्वामीं महाराजांशी झालेले होते. पुर्णपणे स्वामी भक्तीत रंगून गेलेल्या स्वामीसुतांनी स्वामी महाराजांना आजच्या अभंगाद्वारे काही मागणे मागितले आहे. हे मागणे म्हणजेच स्वामीसुतांची निष्काम भक्ती आणि दृढ श्रध्दा याचे उत्तम उदाहरण आहे. परमेश्वराजवळ नेमके काय मागावे, याचा एक आदर्श स्वामीसुतांनी घालून दिला आहे. ज्यातून आपली मोक्षप्राप्तीची वाटचाल अगदी सहजतेने होईल. कारण प्रत्येक गोष्टीत वासना हिच आपली प्रमूख शत्रू असते. अन् या अभंगातून स्वामीसुतांची वासना पुर्णपणे नष्ट झालेली आहे, याची जाणीव आपल्याला स्पष्टपणे होते.
स्वामी देई हेंचि दान । नित्य चरणांचे दर्शन ॥1॥
मज नको धन-दारा।  तुझ्या चरणीं द्यावा थारा ॥2॥
मज ठेवावें भिकारी । सुखें करीन चाकरी ॥3॥
तुझे नाम माझी जोड।  मुखी राहों तेंचि गोड ॥4॥
तुझ्या चरणीं माथा । ऐसें करी दीनानाथा ॥5॥
तुझें नामीं लागो छंद । मज द्यावें दास-पद ॥6॥
सुत मागे हेंचि दान । तुझ्या चरणीं होऊ लीन ॥7॥
               आजच्या अंभगातून स्वामीसुत परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना मागणे मागत आहेत. ते म्हणतात, स्वामीराया ! आज मी तुम्हाला काही मागण्यासाठी आलो आहे. ते आपण मला द्यावे, हीच माझी ईच्छा आहे. माझं पहिल मागण हे आहे की, मला नित्यपणे आपल्या चरणांचे दर्शन मिळावे, हेच दान मला द्या. मला ईतर काहीही नको. धन-दौलत-ऐश्वर्य नको, किंवा परत प्रपंच ही नको, पत्नी ही नको. तर मला फक्त तुमच्या चरणी जागा द्या. मला आपली सेवा करण्याची संधी द्या. मला आपल्यापासून किंवा आपल्या चरणांपासून दुर करू नका. या मायावी जगात केवळ तुम्हीच माझे सर्वस्व आहात. तेव्हा मला कायम आपल्या पायाजवळ राहू द्या. हीच कळकळीची प्रार्थना आहे.
               यापुढे जाऊन स्वामीसुत म्हणतात, एकवेळ मला भिकारी म्हणून जन्माला घातले तरी चालेल, पण मला दुर करू नका. मी भिक्षा मागून खाईल आणि आपली मनोभावे चाकरी करील, आपल्या सेवेत कसलीही कमतरता पडू देणार नाही. अथवा माझे दैन्य दूर करा, अशी प्रार्थना ही मी कधी करणार नाही. आहे त्या स्थितीत सुखाने मी आपली सेवा करील. परंतु मला आपल्यापासून दूर करू नका. मला अंतर देऊ नका. माझ्या सर्व नातेवाईकांनी, आप्त स्वकियांनी जरी मला टाकून दिले, दुर लोटले तरी मला काहीही वाईट वाटणार नाही. कारण आपले पवित्र पावन नाम हे माझ्या जोडीला कायम असेल, हेच माझे सोबतीला कायम राहू दे. तुझे गोड नाम माझ्या मुखी कायम असावे, हाच एक आशिर्वाद मला मिळावा, हिच विनंती आहे.
               हे आनंदनिधान प्रभो ! आपल्या पावन चरण कमली माझा माथा कायम नतमस्तक राहावा, हेच दान मला दे. तुझ्या चरणांचा विसर पडू नये अशीच सद्बुध्दि मला कायम दे. मी ईतर कोणत्याही मायामोहात अडकून पडणार नाही. ईतर कोणताही षडविकार मला वश करणार नाही. एवढीच कृपा माझ्यावर ठेव. मला फक्त तुझ्या नामाचा छंद लागावा, आणि मी जन्मोजन्मी तुझा दास व्हावे, हेच माझे मागणे आहे. तुझे दास्यपद मला मिळावे. हिच माझी अंतिम ईच्छा आहे.  मी आपले लेकरू आहे, कायम आपले लेकरूच राहावे, एवढीच कृपा राहू द्या. आपल्याला जरी अनंत मुलं असले तरी मला मात्र आपण एकमेव माता आहात. मी आपला सुत आहे, आपल्या या अज्ञानी सुतावर एवढीच कृपा ठेवा. एकच दान मला द्या की, मी कायम आपल्या चरणी लीन राहावे. मला कायम आपला सहवास लाभावा. कायम आपली सोबत मिळावी. हेच दान माझ्या झोळीत टाका. हिच या लेकराची विनंती आहे. असे स्वामीसुत स्वामी महाराजांना विनवत आहेत.
               सज्जनहो, आपण अल्पशी सेवा करून ही स्वामींकडे असंख्य मागणे मागतो. डोंगराएवढ्या आपल्या अपेक्षा असतात. मात्र स्वामी कार्यांसाठी आपला संसार लुटवून आपले पुर्ण जीवन हे स्वामींच्या प्रसार कार्यात व्यतित करणारे स्वामीसुत हे स्वामींना केवळ भक्तीचे दान मागताना दिसतात. यातून आपण योग्य तो शोध बोध घ्यावा. कारण स्वामींना भूत-भविष्य आणि वर्तमान या सर्वाची माहिती आहे. त्यांच्यापासून काहीही लपून राहिलेले नाही. तेव्हा आपण परत मागण का मागावे. स्वामी सर्व जाणतातच की, वेगळं कशाला सांगायचे. अन् आपली भक्ती ही सुदामासारखी असावी. आपला परममित्र पुर्ण भगवान श्री कृष्णाच्या घरी पत्नीच्या आग्रहास्तव गेलेला सुदामा काहीही मागत नाही. कारण श्रीकृष्ण सर्व जाणतो, आणि आपली गरिबी ही आपले प्रारब्ध आहे. याची पुर्ण जाणीव सुदामाला होती. परंतु सुदामाने न मागता ही श्रीकृष्णाने सुदामाला कुबेराला ही लाजवेल असे ऐश्वर्य दिले. याचे नाव भक्ती आहे. जर सुदामाने मागितले असते तर त्याच्या मागण्याला बुध्दिची मर्यादा पडली असती. त्याने न मागितल्यामुळे त्याला भरभरून मिळाले. आपण ही हिच सुदामाची वृत्ती ठेवावी. कारण स्वामी महाराज हे पुर्णपरब्रह्म आहेत. त्यांना सर्व ज्ञात आहे. तेव्हा आपण फक्त मनोभावे सेवा करावी, बाकी सर्व करण्यास ‘स्वामी’ समर्थ आहेत. ही जाणीव कायम ऱ्हदयात ठेवावी.
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
श्री स्वामीसुत महाराज की जय 
॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥