परब्रह्माच्या प्रकटीकरणाचे महारहस्य !



श्री स्वामी समर्थ
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
स्वामी वैभव दर्शन भाग -02
॥ श्री स्वामीसुताची सत्यवाणी ॥
पुष्प 02 रे
परब्रह्माच्या प्रकटीकरणाचे महारहस्य !
स्वामी भक्तांनो.......
               आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खुप मोठी महापर्वणी आहे. हे आपण कालच पाहिले आहे. आजच्याच दिवशी हा ‘अक्कलकोटस्थ परब्रह्म’ आपल्या सर्वांच्या पुर्वपुण्याईने आपल्याला प्राप्त झाला होता. या भूतलावर अवतीर्ण होऊन सर्व जगतावर अंनत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा आज प्रकट दिन वा जयंती महोत्सव आहे. हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा, ध्येर्य, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा आहे. सूर्याला तेज पुरविणारा आणि मातेच्या ऱ्हदयात ममता निर्माण करणारा, तेजरुपी मायासागराचा धनी असलेला, आपला ‘श्री स्वामी देव’ याच चैत्र शुध्द द्वितिया शके 1071 (इ.स.1149) मध्ये छेली या खेडे गावी प्रकट झाला होता.
आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे, त्यापेक्षा लाख पटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवन चरित्र आहे. हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. इ.स. 1149 ते 1878 हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो. परंतु 1149 पुर्वी आणि 1878 नंतर ही दृश्यादृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालूच होती व आजही चालूच आहे. तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखे महाकठिण कार्य आहे. तरी सुध्दा दया सागर स्वामींनाच शरण जावून आपण स्वामींचा प्रकट दिन सोहळा श्री स्वामी सुत महाराजांच्या पुढिल अभंगातून पाहू या.....
दत्त माझा अवतरला दीन भक्तांच्या काजाला ॥1॥
छेलीखेड्या ग्रामामाजीं झाला अवतार हा सहजी ॥2॥
गोटी खेळण्याचा रंग तेव्हां मनी झालो दंग ॥3॥
तेथे होता विजयसिंग आतां येथे करू रंग ॥4॥
गजानन आनंदला   पाहुनियां त्या खेळाला ॥5॥
नाचताती चहू कोणीं नुपुरें वाजतीं चरणीं ॥6॥
गोटी गोटीचा हा वाद हरीचा हसण्याचा छंद ॥7॥
हंसू लागे वक्रतुण्ड हलवूनी प्रीती सोंड ॥8॥
विष्णु स्तंभी प्रकटलें दत्त गोटी फोडूनि आले ॥9॥
माझ्या स्वामीचीं करणीं कंप होतसे धरणीं ॥10॥
गोटी विजयसिंग मारी । दुसरी गोटी होय करीं ॥11॥
गोटींचा हो पडला ढिग । चकित झाला विजयसिंग ॥12॥
गोटी स्वामी माया झाली। स्वामीहस्तीं ती शोभली ॥13॥
गोट्या झाल्या रानोमाळ। काय मौजेचा हा खेळ ॥14॥
एक प्रहर खेळ केला । समर्थ दाविली ती लीला ॥15॥
स्वामीसुत म्हणे झाला । अवतार भक्तांच्या काजाला ॥16॥
               आपल्या या वरील अभंगात स्वामीसुतांनी स्वामी प्रकट दिनाचा प्रसंग वर्णन केला आहे. स्वामीसुतांनी स्वामींच्या प्रकट दिनावर भाष्य करणारे अनेक अभंग लिहिले आहेत. त्यापैकी  हा एक आहे. ज्यातील स्वामी प्रकट दिन सोहळा आपण आज पाहणार आहोत. या अभंगाच्या सुरूवातीला स्वामीसुतांनी जो दत्त हा शब्द वापरला आहे, तो स्वामी महाराजांसाठी वापरला आहे. तर दत्त महाराजांसाठी अभंगाच्या मध्ये दत्त गोटी फोडूनि आले हा उच्चार केला आहे.
               स्वामीसुत म्हणतात, माझा स्वामी जो अवतरला आहे, तो केवळ भक्तांच्या कल्याणास्तव ! भक्तांचा सांभाळ करणे, धर्माचे रक्षण करणे आणि अधर्मियांचा सर्वनाश करणे, हेच भंगवतांचे प्रमुख कार्य असते. याच कारणासाठी तो आपले नाव, रूप बदलून अवतार धारण करत असतो. पण या वेळी परब्रह्माने स्वत:च येणे केले आहे. त्याने कोणताही अवतार धारण केला नाही किंवा ईतर कोणत्याही देवतेला पाठविले नाही. तर प्रत्यक्ष पुर्ण परब्रह्म स्वत:च यावेळी आपल्या मुळ रुपात अवतीर्ण झाला. असे स्वामीसुत सांगतात. ही घटना हस्तीनापूर जवळील छेली या खेडी गावी घडली. जेथे हा परब्रह्म अगदी सहजतेने प्रकट झाला. सहजतेने शब्द वापरण्या मागचा उद्देश्य स्पष्ट दिसून येतो की, हा अवतार नवमास मातेच्या उदरी राहून प्रसूती पिडा सहन न करता झालेला आहे. म्हणजेच  धरणी दुंभगून 08 वर्षाची बालक मुर्ती प्रकट झाली.
परब्रह्म 08 वर्षाच्या बालक स्वरुपात अवतीर्ण होण्यामागचे कारण स्वामीसुत आपल्या अन्य एका अभंगात सांगतात, की हस्तीनापूर नजीक छेली ग्रामी भगवंताचा परमभक्त विजयसिंग हा गोटीला भगवंत मानून खेळ करीत होता. ‘विजयसिंगे ही गोटी वटवृक्षछायेस गोमटी भगवंत मानोनिया जगजेठी मांडोनिया खेळतसे नाव घेऊनि भगवंताचे गोटी आहे कौतूक त्याचे असा खेळ तो बाळक खेळत असताना पुढे काय करत आहे पहा ! एकटाच बोले आपसांत म्हणे देवबापा खेळ वेगी असे म्हणत तो बालक स्वत:चा आणि भगवंताचा असे दोन्ही डाव स्वत:च खेळत होता. आपण आणि परमेश्वर वेगळे आहोत, हि भावनाच त्याच्यात नसल्यामुळे, तो हा खेळ खेळत होता. शेवटी अशा निष्पाप आणि निर्मळ मनाच्या बालकाचे अंत:करण ओळखून आणि आपली प्रकट होण्याची योग्य वेळ आली आहे, हे जाणून स्वामींनी प्रकट होण्याचे ठरवले. एकदा प्रकट होण्याचे ठरवले की मग क्षणाचाही विचार न करता स्वामी महाराज हे भगवत्स्वरुपात नित्य मग्न असलेल्या आठ वर्षाच्या विजयसिंगाच्या निमित्ताने वटवृक्षाच्या झाडाखाली असलेल्या श्री गणेशांच्या साक्षीने परब्रह्म स्वरूपात प्रकटले.
प्रकट झाल्यानंतर श्री स्वामी महाराज आपल्या विजयसिंग या भक्तांसोबत गोट्या खेळण्याची लीला दाखवित होते. या खेळात काही वेळाने अन्य दोन बालक ही सामिल झाले. आता स्वामी महाराज, विजयसिंग, रामसिंग आणि हरिसिंग असे चौघे मिळून हा गोट्याचा खेळ खेळत होते. (यातील हरिसिंग हाच पुढिल जन्मात हरिभाऊ म्हणून जन्माला आला व स्वामीसुत होऊन आपल्या मागिल जन्मातील आठवणी कथन करू लागला.) खेळताना स्वामी महाराज खुपच हट्ट करत होते. आपल्या मर्जीप्रमाणे वागत होते. स्वामींचा हा मनमानी खेळ व हेकेखोरपणा पाहून त्या वडाखाली असलेल्या मंदिरातील श्री वक्रतुंड गणेश हा स्वामींच्या या  अद्भूत लिलेचे कौतूक करीत मोठमोठ्याने हास्य करीत आपल्या देवळातून बाहेर चालत आला. बाहेर येऊन तो ही लाला मौजेने पाहत उभा राहीला. सर्वजण गोटी खेळण्यात दंगून गेले. स्वामी महाराज ही मोठ्याने हास्य करत अगदी लहानाहून लहान होऊन तल्लीनतेने हा खेळ खेळू लागले. श्री गणेश भगवान आपली सोंड प्रेमाने गदगदा हलवून मोठ्याने हास्य करत या खेळाचा आनंद घेत होते.
मुलांचा दंगा व स्वामींचा आणि गणेशांचा हास्य आवाज ऐकून ईतर देवतांना ही याबद्दल कुतूहल निर्माण झाले. आकाशात उभे राहून सर्व देवता हा अजब खेळ पाहायला गर्दी करू लागल्या होत्या. तेवढ्यात मुलांच्या बाजूलाच असलेल्या मंदिराच्या एका खांबातून श्री भगवान विष्णू प्रकट झाले, तर स्वामींनी फेकलेल्या एका गोटी मधून श्री दत्तात्रेय भगवान गोटी फोडून बाहेर आले. स्वामींच्या या कृत्यांने धरणी माता कंप पावू लागली. तशा मग ईतर देवता ही आकाशातून हा दिव्य खेळ पाहत पुष्प वृष्टि करू लागल्या. यक्ष, गंधर्व, किन्नर नृत्य करत होते. हे होत असतानाच विजयसिंग हा स्वामींची एक एक गोटी जिंकत होता, लगेच स्वामींच्या हातात एक एक नवी गोटी येत होती. थोड्या वेळाने तेथे गोट्यांचा खुप मोठा ढिग जमा झाला, हे दृश्य पाहून विजयसिंग चकित होऊन गेला. स्वामी मायेने सर्वत्र गोटी दिसू लागली. शेवटी तीच स्वामींच्या हातात ही शोभून दिसू लागली. आजूबाजूला सगळीकडे रानोमाळ गोट्याच गोट्या दिसू लागल्या. हा खेळ पाहून सर्वजण मौज करत होते. संपूर्ण एक प्रहर भर हा खेळ खेळून स्वामींनी एक आगळी वेगळी लीला सर्वांना दाखविली. सर्वत्र मीच आहे. मी सर्वव्याप्त आहे. हाच संदेश स्वामींनी प्रकट होऊन दिला. प्रकट होताच गोट्याचा खेळ खेळून प्ररब्रह्माने आपण ब्रह्मांडनायक असून या गोट्यासारखेच अनंत ब्रह्मांड माझ्या हाती असून मी त्याच्यांशी हवे तसे खेळतो. माझ्या ईच्छेशिवाय काहीही घडू शकत नाही. हाच बहूमोल संदेश दिला आहे.
स्वामींच्या हातातील गोटी विषयी असाच एक प्रसंग शुरसेनानी 2015 मध्ये आला आहे. तो पुढील प्रमाणे, श्री स्वामी समर्थ हातातील गोटीविषयी म्हणाले, ‘ असे सख्या तुला पाहायचे आहे का ते काय आहे ?’ असे म्हणून स्वामींनी ती गोटी खाली टाकली. तत्क्षणी गोटी ब्रह्मांडरूप होऊन तिचा स्फोट झाला. ब्रह्मांडाचे अधिक व्यापक दर्शन त्यात होऊ लागले. सहजलीलेने श्री स्वामीं देवांनी ते ब्रह्मांड आपल्या बोटात ओढून घेतले. तेव्हा ती पुन्हा गोटीच दिसू लागली. तेव्हा ती परब्रह्ममूर्ती पुढे म्हणाली, ‘ आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत आहे. आम्ही सोडले की सारे संपले.’ हा रोमांचकारी प्रसंग श्री स्वामी महाराज व परमपुज्य मामासाहेब देशपांडे यांच्या मधील असून, श्रीपाद सेवा मंडळ, पुणे या संस्थेचे अध्वर्यु शिरीषदादा कवडे यांच्या बरोबरील चर्चेवेळी समजला. (संदर्भ : शुरसेनानी 2015 दिवाळी अंक)
स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांनी प्रकट होऊन आपली पहिली लीला ही मुलांना दाखविली. यावरून स्वामींना बालकांविषयी असलेली ममता व स्नेह याची जाणीव होती. भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ, उपमन्यू बाळ यानांही परमेश्वर भेटला मात्र यासाठी त्यांना कठोर परिश्रम व दिर्घ स्वरुपाची साधना करावी लागली होती. येथे मात्र विजयसिंगाला अगदि सहजतेने आणि ते ही स्वत:प्रमाणेच बालक स्वरुपात प्रत्यक्ष परब्रह्म भेटला, त्याच्यांशी खेळला. यावरून परब्रह्माचे अथांग करूणा स्वरूप प्रकट होते. त्यांची निर्मळ आणि निस्वार्थ भक्तांप्रती असणारी ओढ लक्षात येते. तेव्हा आपण ही आपले मन निर्मळ आणि निस्वार्थ ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करावा, म्हणजे आपल्याला ही स्वामी महाराज आपलेसे करतील. हीच शिकवण देणारा आजचा अभंग आहे.
अभंगावरील विवेचन झाल्यानंतर पुढे आपण आता स्वामींचे ओझरते चरित्र पाहण्याचा प्रयत्न करू या.....
स्वामी महाराजांनी या मुलांचा उध्दार केल्यानंतर मग छेली या गावातील लोकांचा उध्दार केला. येथिल ग्रामस्थांना अनेक लीला दाखवल्या. स्वामींच्या आगमणाने छेली गाव हे गोकुळ बनले. जे भाग्य गोकुळ वासिंयाना भगवान श्रीकृष्णामुळे प्राप्त झाले, तेच भाग्य छेली वासियांना स्वामी कृपेने मिळाले. स्वामींच्या नाना लीला, असंख्य खेळ याचे साक्षिदार होण्याचे महत्भाग मिळाल्यामुळे छेली वासिय लोकांचे भाग्य विलक्षणच बनले. पंचक्रोशितील ग्रामस्थांचे तीर्थक्षेत्र बनलेल्या छेली गावचे दैवत ‘श्री स्वामी देव’ मात्र आपला मुक्काम अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेते झाले. तेव्हा मग येथिल ग्रामस्थांचे कल्याण करून व त्यांना सत्य बोध करून स्वामी महाराज आपल्या पुढिल भ्रमंतीला निघाले. तेव्हा छेली ग्रामस्थांच्या दु:खाला पार उरला नाही. जी अवस्था श्री कृष्णांच्या गोकुळ सोडण्याच्या वेळी गोकुळ वासियांची झाली होती, त्याहून ही बिकट अवस्था छेली ग्रामस्थांची झाली होती. पण काहीही झाले तरी परब्रह्म आता मागे परत फिरणार नव्हते. त्यामुळे जड अंत:करणाने सर्वजण आपल्या घरी परतून स्वामी विरह दु:खात आकंठ बुडाले. इकडे स्वामी महाराज छेली गावातून निघून थेट हरिद्वारास गेले. पुढे ऋषिकेश येथे जावून तेथिल पुरोहितांमधील हरीहर भेद नाहीसा केला. हरी वेगळा आणि हर म्हणजे शिव वेगळा नसून हे दोन्ही एकच आहेत. याचा दाखला देऊन तेथिल काही भक्तांना आपले विश्वरूप दाखविले. यानंतर मग हिमालय पर्वतावर काही काळ निवास करून तेथून पुढे मग रुद्र प्रयाग, देवप्रयागला गेले. त्यानंतर मग काशी क्षेत्री स्वामींनी काही काळ निवास केला. त्यानंतर मग ब्रदिनाथ व केदारनाथ येथे भ्रमंती करून स्वामी पुढे सोमप्रयाग, नरनारायण स्थान येथून पुढे मग मानसरोवर येथे गेले. येथे काही काळ वास्तव्य करून मग स्वामी तेथून पुढे चीन आणि तिबेट या प्रदेशात गेले. येथून पुढे मग नेपाळ येथिल पशुपतीनाथ येथे काही काळ निवास केला. पुढे नंतर जगन्नाथपुरी, द्वारका, गिरणार पर्वत, कलकत्ता, रामेश्वर, हैद्राबाद, मुंबई, अंबेजोगाई, राजूर, पंढरपूर, हुमणाबाद, मोहोळ, मंगळवेढा, सोलापूर अशी भ्रमंती करत करत शेवटी अक्कलकोटी आले व येथेच स्थिर झाले. स्वामी महाराज अक्कलकोटी आल्यानंतर त्यांनी केलेल्या लीला व तेथिल चरित्र हे बऱ्यापैकी उपलब्ध असल्यामुळे याबाबत जास्त काही लिहिण्याची आज आवश्यकता नाही. पण स्वामी महाराजांच्या छेली गावापासून ते अक्कलकोटी येईपर्यंतच्या प्रवासासंबधी व चरित्रासंबंधी खात्रीशिर आणि सुत्रबध्द माहिती उपलब्ध नसल्यामुळे याबाबतीत नेहमीच मत मतांतरे होत असतात. परंतु अक्कलकोटमध्ये स्वामींचे जवळपास 23 वर्षे वास्तव्य होते. आणि या काळात स्वामींनी दाखवलेल्या लीला, आपले सामर्थ्य, आपला सर्वेश्वराधिकार यागोष्टी पाहता, स्वामी महाराज हे पुर्ण परब्रह्म स्वरुप होते. या बाबतीत मात्र सर्वच चरित्रकारात एकमत आहे. आपण ही स्वामींच्या स्वरुपाबद्दल व शक्ती सामर्थ्याबद्दल स्वामी वैभव दर्शन भाग 01 मध्ये सविस्तर माहिती घेतल्यामुळे ईतर मत मतांतरे यात न गुतंता स्वामींच्या सर्वेश्वर आणि पुर्ण परब्रह्म स्वरुपावर दृढ श्रध्दा आणि निष्ठा ठेवून, आपली पुढिल आध्यात्मिक वाटचाल करावी. स्वामी महाराजांना पुर्णपणे शरण जावे. हाच एक महत्वपुर्ण संदेश देऊन हे लांबलेले लेखन पुष्प थांबवतो.
आपणांसर्वांना परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमीत्त लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा देतो. आपणा सर्वांना स्वामी महाराज, सुख, समृध्दि, सदबुध्दी, आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगती देवो. हिच सर्वेश्वर सर्वंनियंत्ता स्वामी महाराजांच्या चरणी विनम्र पार्थना......!!!
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
श्री स्वामीसुत महाराज की जय 
॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥
(संदर्भ : शुर सेनानी 2015-श्री संजय वेंगुर्लेकर, कलियुगी श्री स्वामी समर्थ-श्री शरद काका लाठकर )