श्री स्वामी प्रकट दिनाच्या महापर्वणीचे महत्व



श्री स्वामी समर्थ
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
स्वामी वैभव दर्शन भाग -02
॥ श्री स्वामीसुताची सत्यवाणी ॥
पुष्प 01 ले
श्री स्वामी प्रकट दिनाच्या महापर्वणीचे महत्व
स्वामी भक्तांनो......
               मागिल काही दिवसांपूर्वी आपण पुर्ण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशिवार्दाने श्री स्वामी वैभव दर्शन भाग 01 या माध्यामातून स्वामींचे अंतरंगीचे शिष्य श्री आनंदनाथ महाराज वेंगुर्लेकर यांच्या स्वानुभूतीपर अभंग रचनावर विवेचन केले होते. आनंदनाथ महाराजांच्या अलौकिक आणि दिव्य वाणीतून आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वरूप समजावून घेतले. स्वामी महाराजांचा अधिकार व स्वामींची अनंत शक्ती याचीही ओळख करून घेतली.

               श्री आनंदनाथ महाराजांच्या 21 अभंगानंतर आपण आता स्वामीसुत महाराज म्हणजेच श्री हरिभाऊ तावडे यांच्या 21 स्वामी स्वरूप वर्णनपर अभंगावर विवेचन करणार आहोत. आनंदनाथ महाराजांच्या व्यतिरीक्त स्वामींनी आत्मलिंग दिलेले दुसरे एकमेव स्वामीभक्त म्हणजेच श्री स्वामीसुत महाराज होत. प्रापंचिक अडचण स्वामीकृपेने सुटल्यावर स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटी आलेले व दुसऱ्याच भेटीत स्वामींनी आपला सुत बनविल्यामुळे संसाराचा त्याग करणारे एक अलौकिक स्वामी भक्त म्हणजे श्री हरीभाऊ तावडे होत. स्वामीसुत हरीभाऊंचे चरित्र हे खुप प्रेरणादायी व आश्चर्यकारक आहे. पुढे कधी योग आला तर स्वामी कृपेने त्यावर चर्चा करू या.
               आजपासून आपण श्री स्वामी वैभव दर्शन भाग दुसरा सुरूवात करत आहोत. आता यापुढिल 21 पुष्प हे श्री स्वामीसुत महाराजांच्या दिव्य अभंगवाणीवर असतील. भाग एक मधील पुष्प हे आपण एक दिवस आड एक याप्रमाणे प्रकाशित केले होते. मात्र आता वेळेच्या बंधनामुळे यापुढिल लेख हे प्रत्येक तीन दिवसांच्या नंतर प्रकाशित केले जातील. याची सर्व स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी.
               स्वामी भक्तांनो आज चैत्र शुध्द प्रतिपदा अर्थात गुढी पाडवा म्हणजेच हिंदु धर्मानुसार नविन वर्षाची सुरूवात आहे. तेव्हा आजच्या नव वर्षाच्या सुरूवातीला आपण हे पहिले पुष्प स्वामी चरणी अर्पण करून, आपल्या लेखाला सुरूवात करू या. खरे पाहता स्वामी भक्तांसाठी नविन वर्ष हे स्वामी प्रकट दिनाच्या दिवशीच सुरू होते. म्हणजेच उद्याच्या दिवशी चैत्र शुध्द द्वितियाला, पण अजून ही असंख्य स्वामी भक्तांना उद्याच्या दिवसाचे महत्व माहित नाही. आपण उद्याचा दिवस हा फक्त ‘श्री स्वामी समर्थ प्रकटदिन किंवा जयंती ऊत्सव’ म्हणून साजरा करतो. या पलिकडे आपल्याला या दिनांचे विशेष काहीच महत्व वाटत नाही. किंवा आपण कधी ते जाणून घेण्याचा ही प्रयत्न केला नाही. ही उणीव लक्षात घेऊनच हे आजचे प्रथम पुष्प आहे. आजच्या लेखात आपण श्री स्वामीसुत महाराजांनी परब्रह्म भगवान स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाबद्दल सांगितलेले विशेष महत्व पाहणार आहोत. हे महत्व लक्षात आल्यावर आपल्याला समजेल की, श्री स्वामी प्रकट दिन हा वर्षातील सर्वात महत्वाचा व सर्वश्रेष्ठ दिवस आहे.
               स्वामी महाराजांचा जन्म कधी झाला व कुठे झाला हे कोणालाही माहित नसले तरी सुध्दा स्वामी महाराज हे शके अकराशे एकाहत्तर चैत्र शुध्द द्वितीयेला कुरुक्षेत्राजवळील छेली या खेडे गावात एक आठ वर्षांची बालक मुर्ती स्वरूपात धरणी दुभंगून प्रकट झाले. असे वर्णन स्वामी सुतांनी केलेले आहे. पुढे याच दिवशी त्यांनी स्वामी जयंती किंवा प्रकटदिन साजरा करायला सुरूवात केली. स्वामींनीही याला दुजोरा दिल्यामुळे हाच दिवस प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी महाराजांच्या जन्म रहस्याचे वर्णन करणारा विशेष अभंग आपण उद्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनी पाहाणारच आहोत, तेव्हा आज आपण प्रकट दिनाच्या पर्वणीचे महत्व समजावून सांगणारा आजचा अभंग पाहू या.........
स्वामी-महापर्वणी व्रत हेंचि येतां नसे तूल्य पाहतां कपिलाषष्ठी ॥1॥
कपिलाषष्ठी-पर्व अकरा वेळा येतां । असे ह्याचि व्रता एक वेळा ॥2॥
स्वामी अवताराची वेळ ही निपुण । पर्वणी साधून करा स्नान ॥3॥
स्वामी-सागरतीर्थीं, तये दिनीं स्नान । करितां साधन जन्माचे हें ॥4॥
सर्व सृष्टीजन साधा ही पर्वणी । समर्थाची गुणीं हिच असे ॥5॥
महापर्वणी त्याचें अर्धे पुण्य । मिळेल सगुण संधि साधा ॥6॥
भाव ठेऊनियां एक स्वामीपायीं । साधावी ही सोयी, तुम्ही जन ॥7॥
स्वामी-पर्वणीचे स्वामी सागरतीर्थ । केले हें यथार्थ भजा त्यासी ॥8॥
स्वामीसुत म्हणे जगाचा उध्दार। तिथे हें निर्धार पर्वणीचें ॥9॥
               श्री स्वामीसुत महाराज हे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचे महत्व आपल्या वरील अभंगाद्वारे प्रतिपादन करत आहेत. स्वामीसुत म्हणतात, स्वामी प्रकटदिन हि खुप मोठी महापर्वणी आहे. याची तुलना कशाचीच करता येत नाही. एवढे महत्व या दिवसाचे आहे. हिच गोष्ट उदाहरणासह समजून सांगताना स्वामीसुत सांगतात, आपल्या धर्मात सर्वांत श्रेष्ठ योग एकच आहे, जो साधारणपणे साठ वर्षात एकदाच येतो. त्याला कपिलाषष्ठीचा योग असे म्हणतात. हा कपिलाषष्ठीचा योग होण्यासाठी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी, मंगळवार, रोहीणी नक्षत्र, व्यतिपात योग आणि सूर्य हा हस्तनक्षत्रात असायला पाहिजे. यासर्व बाबी जर एकाच दिवशी जुळून असतील तर हा योग होतो. एवढा दुर्लभ असणारा हा योग मात्र स्वामींच्या प्रकट दिनापुढे तुच्छ आहे. असे स्वामीसुत सांगताना दिसतात.
               स्वामीसुत म्हणतात, स्वामी जयंतीचा दिवस हा महापर्वणी असून याची तूलना जर कपिलाषष्ठी योगांशी करायची म्हटले, तर कपिलाषष्ठीचा योग 11 वेळा आल्यानंतर जेवढे पुण्य मिळते, तेवढे पुण्य हे केवळ एकाच स्वामी प्रकट दिनाच्या महापर्वणीने मिळते. एवढा हा दिवस स्वामी भक्तांसाठी महत्वाचा आहे. ज्या दिवशी प्रत्यक्ष पुर्ण परब्रह्म या भूतलावर प्रकट झाला, तो दिवस सर्व सृष्टिंसाठी खुप मोठी पर्वणी आहे. तेव्हा या दिवशी दरवर्षी नित्यनेमाने स्वामी सेवेचे व्रत करावे. सकाळी शुभ मुहुर्तावर सागरतीर्थीं म्हणजेच समुद्र स्नान करून शुचिर्भुत होऊन नंतर मग स्वामींचे दर्शन घ्यावे, मनोभावे स्वामींची सेवा करावी. याने तुमचा परलोक तरेल असे स्वामीसुत सांगतात. पुढे स्वामीसुत सांगतात, सर्व सृष्टिजन हो, या अलभ्य पर्वणीचा लाभ घ्या. केवळ याच एका संधीमुळे सर्व गुणांनी युक्त असणारा आणि सर्व देवांचा देव असणारा माझा स्वामीदेव तुम्हाला आपलेसे करील. अजाणतेपणामुळे जरी यादिवशी कोणी (सागरतीर्थीं) स्नान केले तरी सुध्दा त्याला या महापर्वणीचे अर्धें पुण्य मिळते. तेव्हा या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. असे स्वामीसुत सांगताना दिसतात.
               स्वामी भक्तांनी आपले इहलोक व परलोक साधण्यासाठी केवळ स्वामींच्या चरणी भाव ठेवावा. स्वामींच्या भजनात चित्त एकाग्र करावे, स्वामी महाराजांच्या शिवाय इतरत्र कुठेही धावू नये, केवळ स्वामींना शरण जावे. भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी स्वामी महाराज आपल्या सर्व शरणांगत भक्तांचे सर्वस्वी कल्याण करतात. त्यांना जन्म मरणांच्या फेऱ्यांतून मुक्त करतात. तेव्हा ही संधी कोणीही दवडू नये. हिच विनवणी स्वामीसुत करताना दिसतात. स्वामी प्रकट दिनाची पर्वणी आणि त्यात समुद्र स्नान ज्याने हा योग साधला तो व्यक्ती पुजनिय आहे आणि जगाचा उध्दार करण्यासाठीच अशी पर्वणी परब्रह्माने निर्धाराने निर्माण केली आहे. असे स्वामीसुत सांगतात.
               अभंगात स्वामीसुतांनी सागरतीर्थीं स्नान केल्यावर जन्माचे सार्थक होते, असा जो उल्लेख केला आहे, तो मुबंईच्या भाविकांसाठी केलेला आढळून येतो, कारण सागर तीरी किल्ला बांधून राहावे, अशी स्वामी आज्ञा झाल्यामुळे स्वामीसुत मुंबईत प्रचार करत होते. आणि याच मुंबईत प्रत्यक्ष स्वामी महाराज 25 वर्षे वास्तव्यास होते, असे स्वामींच नेहमी सांगत. त्यामुळे सागरतीर्थीं हा ऊल्लेख केलेला आढळतो. पण सर्वजण या दिवशी समुद्रात स्नान करू शकत नाहीत, मग त्यांनी काय करावे, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तेव्हा ज्यांना समुद्र स्नान शक्य नाही, त्यांनी स्वामींचे ध्यान करून स्नान करावे, स्वामीनामाने आपले साधे पाणी ही गंगाजल होईल. फक्त तेवढ्या श्रध्देने आपण स्वामींचे ध्यान करावे. शेवटी भाव महत्वाचा आहे. ही प्रमुख बाब ध्यानात ठेवावी. दुसरी गोष्ट म्हणजे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे अनंत सागरापेक्षाही विशाल ऱ्हदयांचे आणि अथांग करूणेचे महासागर आहेत. त्यांच्या विशाल स्वरूपाला व करुणेला कोणतीही मर्यादा नाही. तेव्हा आपण स्वामी प्रकट दिनाच्या महापर्वणीच्या दिवशी अक्कलकोटी जाऊन स्वामींचे मनोभावे दर्शन घ्यावे. स्वामी चरणी नतमस्तक व्हावे. या दिवशी अक्कलकोटी जावून घेतलेले स्वामी दर्शन हे समुद्र स्नानांच्या महापर्वणीपेक्षाही  शतपट अधिक पुण्य प्रदान करणारे आहे. तेव्हा ज्यांना समुद्र स्नान शक्य नाही, त्यांनी या महापर्वणीला अक्कलकोट जवळ करावे आणि स्वामींचे मनोभावे दर्शन घ्यावे.
               ज्यांना या दिवशी समुद्र स्नान करणे किंवा अक्कलकोटी जाणेही शक्य नाही. अशा स्वामी भक्तांनी निराश होण्याचे वा दु:खी होण्याचे काहीच कारण नाही. कारण आपले स्वामी महाराज हे कणाकणांत वसलेले आहेत. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी असणारा आपला परब्रह्म आहे. जो सर्व देवांचा ही देव असल्यामुळे तो सर्वव्याप्त आणि सर्वेश्वर आहे. तेव्हा आपण स्वामी प्रकट दिनाच्या महापर्वणीच्या दिवशी आपल्या घरीच स्वामींचे अंत:करणातून स्मरण करावे व स्वामींचे स्मरण करत करत स्नान करावे. स्नानानंतर शक्य असल्यास आपल्या जवळील स्वामींच्या मंदिरात जाऊन ‘श्री स्वामी प्रकट दिन महोत्सवात’ सहभागी व्हावे. किंवा हे ही शक्य नसल्यास आपल्या घरीच आपण स्वामींचा प्रकट दिन ऊत्सव साजरा करावा. मनोभावे स्वामींची पूजा करावी व स्वामींना शरण जावे. असे केल्यानेही आपल्याला स्वामींचा तेवढाच कृपाशिर्वाद मिळेल आणि स्वामींची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहील. तेव्हा सर्व स्वामी भक्तांनी ‘श्री स्वामी प्रकट दिन’ हा ऊत्सव आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे साजरा करून, या महापर्वणीने सोने करून घ्यावे. हीच एक तळमळीची प्रार्थना सर्व स्वामी भक्तांना आहे.
               स्वामी भक्तांनो, पुर्ण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे या भूतलावर येणे हे ही एक देवदुर्लभ गोष्ट आहे. ज्यांच्या दारी सर्व देवता हात जोडून उभ्या आहेत, तो परब्रह्म केवळ आपल्या कल्याणासाठी या धरातलावर अवतीर्ण झाला आहे. त्यामुळे चैत्र शुध्द द्वितीया हा दिवस फक्त आपलांच नाही तर सर्व देवी देवतांचा सुध्दा खुप मोठा उत्सवांचा दिवस आहे. सर्व देवतांही हा दिवस हर्षाने साजरा करतात. तेव्हा आपण ही या संधीचे सोने करून घ्यावे. आपण या सुवर्ण संधीचे सोने निश्चितच कराल, ही आशा ठेवतो आणि सर्वकल्याणकारक ब्रह्मांडनायक श्री स्वामी देवांचे स्मरण करून येथेच विरामतो.......
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
श्री स्वामीसुत महाराज की जय 
॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥