स्वामी नामाचे माहात्म्य !



श्री स्वामी समर्थ
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
स्वामी वैभव दर्शन
पुष्प 04 थे
स्वामी नामाचे माहात्म्य !
स्वामी भक्तांनो आपण गेले काही दिवस आनंदनाथ महाराजांच्या भावपुर्ण रचनेद्वारे स्वामी स्वरूप उलगडत आहोत. आनंदनाथ  महाराजांची स्वामींवरील निष्ठा, गाढ श्रध्दा आणि स्वामीवर असलेला विश्वास याची जाणीव आपल्याला त्यांच्या प्रत्येक अभंगाद्वारे मिळते. स्वामी महाराजांनी सुध्दा ज्यांना आपलं परब्रह्म स्वरूप दाखवलं, विश्वरूप दर्शन दिल. त्यांना ते सत्यपणे व परखडपणे सर्व भक्तांसमोर उघड करण्याची आज्ञा केली. श्री स्वामीसुत महाराज, श्री बाळाप्पा महाराज व श्री आनंदनाथ महाराज हे त्यापैकीच थोर सत्पुरूष होत. आपल्या समाधी नाट्यानंतर ही त्यांनी ज्यांना आपले विश्वरूप दर्शन दिले,
त्यात श्री शंकर महाराज व श्री सद्गुरू पिठले महाराज या महान विभूती होत. म्हणून या सर्वांनी जो उपदेश केला आहे, तो आपल्याला आपल्या आजवरच्या आचरणाविरुध्द व विचित्र वाटेल. पण हे सर्व स्वामी तत्वात विलिन झालेले महान जीव असल्यामुळे यांचा उपदेश आपल्याला मुक्ती मिळवून देणारा आहे. तो खुप मोलाचा आणि वेदाप्रमाण आहे. पुर्ण परब्रह्म स्वामी महाराजांना शरण जा. आपला संपुर्ण भार त्यांच्यावर सोपवा. जशी होईल तशी फक्त स्वामी नामस्मरणाची सेवा करा. केवळ नाम स्मरणानेच तुमचा उध्दार होईल. हाच सारांश सर्वांच्या उपदेशाचा आहे. तेव्हा चला मग आपण हीच गोष्ट अजून चांगल्या तऱ्हेने जाणून घेण्यासाठी आजचा आनंदनाथ महाराजांचा अभंग पाहू या….
शरण जाता कृपावंता स्वामी पुरवी मनोरथा 1
हेतू धरूनि निरधार भक्ती करा निरंतर 2
दया धर्म वागवावा देह पायासी अर्पावा 3
सर्व सुखाची ही कोटी सत्य आहे अक्कलकोटी 4
आनंद म्हणे स्वामी पाहातादु:ख हरेल ती चिंता 5
आनंदनाथ महाराज सांगतात, संसारी मायाजालात अडकलेल्या भोळ्या भाबड्या जीवांनो, या भवतापातून बाहेर पडायचे असेल, एक चिरतंन सुख अनुभवायचे असेल किंवा प्रपंचातून परमार्थ साधायचा असेल तर एकच करा. माझ्या कृपावंत, भक्तवत्सल, दीनानाथ स्वामींना शरण जा. सर्व भार त्यांच्यावर सोपवून मोकळे व्हा. एकदा सर्वस्व माझ्या स्वामीवर सोपवून तर पाहा. तो तुमच्या सकल मनोरथांना पुर्ण करेल. तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होतील. संसारात राहून भक्ती करताना आपण एखादा हेतू डोळ्यासमोर ठेवून भक्ती करतो. त्यामुळे बऱ्याच वेळा हेतू तडीस गेला नाही तर निराशा मिळते. तेव्हा हेतू समोर ठेवायचाच असेल तर स्वामी नामाचा निर्धार पुर्वक उच्चार हाच हेतू धरून निरंतरपणे अंखडित स्वामी महाराजांची भक्ती करा. म्हणजे सर्व संकल्प सिध्दीस जातील. सर्व अडचणी वर मार्ग निघेल. यथावकाश सर्वंच उद्देश तडिस जातील. सुखी आणि समृध्द जीवन जगायचे असेल तर मुखी स्वामी नाम घ्या, ऱ्हदयात प्राणीमात्राबद्दल दया हा धर्म ठेवून वागा. याने स्वामी तुम्हाला आपलेसे करतील. त्यांचा वरदहस्त कायम तुमच्या शिरावर असेल. ज्याने तुमचा भवसागर सहज तरून जाईल. जर याउपर ही स्वामी कृपा हवी असेल आणि आपल्याला स्वामींचेच व्हायचे असेल तर मग आपला नश्वर देह स्वामी पायावर अर्पण करा. केवळ स्वामींचेच बनून जा. जेणेकरून तुम्हालाही स्वामींच्या अपार कृपेचा लाभ मिळेल. स्वामींची असिम करुणा तुम्हाला मिळेल. इहलोकी आणि परलोकी ही तुमची वाहवा होईल. कारण  थोरा घरचा श्वान त्यास सर्व ही देती मान या उक्तीप्रमाणे आपण स्वामी पायी शरण गेल्यावर आपली योग्यता नसतानाही स्वामीं कृपेने मोठा बहुमान मिळतो. सर्व संशय दुर होतात. अधिकारी पदाची प्राप्ती होते. आत्मा आणि परमात्मा यातील दिव्य फरक कळू लागतो. परमात्म तत्वाची प्राप्ती होते. आपल परक हा भेद ही जेथे उरत नाही. तेथे ईतर विकारांच काय ? असा उपदेश आनंदनाथ महाराज देतात.
अखिल विश्वात निर्माण होणाऱ्या सर्व सत्य असत्य गोष्टींचा मुळ कारण असणारा आणि डोंबाऱ्यांच्या खेळा प्रमाणे सृष्टीचा खेळ रचणारा परब्रह्म हा तुमच्या आमच्या कल्याणासाठीच भू-वैकुंठ अक्कलकोट येथे विराजमान झाला आहे. अक्कलकोट हे त्यांनी निवडलेले मोक्षधाम आहे. सर्व सुखाची कोटी अर्थात गुरूकिल्ली ही अक्कलकोट येथे विसावलेली चैतन्य मुर्ती आहे. देवांनाही जो चैतन्य देतो, तो सर्वदाता अक्कलकोटात बुध्दिला भ्रम निर्माण करणाऱ्या रूपात अवतरला आहे. तेव्हा भक्तांनी भ्रमात न अडकता सर्व चैतन्य मुर्ती सर्वेश्वर स्वामी महाराजांना शरण जावे आणि आपला उध्दार करून घ्यावा. असे आनंदनाथ महाराज सांगतात. ते पुढे म्हणतात,  काय स्वामींचा महिमा वर्णावा हेच कळत नाही. केवळ ज्यांच्या दर्शनाने, ज्यांना केवळ पाहितल्याने  सर्व दु:ख, चिंता दुर पळतात. वासना ज्यांच्या वाऱ्यालाही थांबत नाही. त्या स्वामींची एकनिष्ठपणे भक्ती करणाऱ्या भक्ताला सृष्टी पालनकर्ता काय कमी पडू देईल ! ज्यांच्या नामाने काळ ही थरथरा कापतो, त्या स्वामी नाम स्मरणाने हा भवसागर पार करणे काय कठिण आहे ! असा बहुमोल संदेश आपल्याला या अभंगातून आनंदनाथ महाराजांनी दिलेला आहे.
चला तर मग सर्व संशय दूर सारून त्या परब्रह्म मुर्तीला शरण जावू या. त्यांच प्रेमळ भजन गाऊ या…..
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ 
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ 
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ  सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ 
॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥