मुक्तीदाता श्री स्वामीदेव !



श्री स्वामी समर्थ
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
स्वामी वैभव दर्शन भाग -02
॥ श्री स्वामीसुताची सत्यवाणी ॥
पुष्प 18 वे
मुक्तीदाता श्री स्वामीदेव !
स्वामी भक्तांनो,
               परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना एक गोष्ट सर्वात महत्वपुर्ण आहे, ती म्हणजे ‘मी-पणाचा’ त्याग. ज्याला ही गोष्ट आध्यात्मात साधता आली, त्याला मुक्ती दुर्लभ नाही. कारण मोक्ष मार्गात एकच गोष्ट बाधा आणते, ते म्हणजे अंहकार. आपण परमेश्वर ईच्छेशिवाय श्वास ही घेऊ शकत नाही. हे अंतिम सत्य असताना, अनेक जण हे मी केले, ते मी केले. हे माझ्यामुळे झाले, ते माझ्यामुळे झाले. असा वृथाभिमान बाळगताना दिसतात. अन् यातच त्यांची आध्यात्मिक साधना खर्ची पडून अंती पदरी निराशा पडते.
तेव्हा भक्तांनी नेहमी सावध असून, आपल्यातील अहंकाराचा लगेच निपटारा केला पाहिजे. परमेश्वर आपल्याला अनेक वेळा संधी देऊन आपली परिक्षा पाहत असतो. आपल्या कडून एखादे सत्कार्य घडवून आपली वाहवा होत असते. परंतु ही वेळ या मानसन्माला भुलून मोठेपणा मिरवायची नसते तर यावेळी ‘कर्ता आणि करविता तुचि एक स्वामीनाथा ॥ ’ ही भावना अंत:करणात रुजवायची असते. कारण यावेळी परमेश्वर आपल्याला स्थितप्रज्ञता शिकवत असतो. सुख असो वा दु:ख, निंदा असो वा स्तुस्ती, आपली वृत्ती ही कायम शांत आणि संयमी असावी. याचे नाव स्थितप्रज्ञता आहे. ही अवस्था सहजासहजी प्राप्त होत नाही. मात्र एकदा का प्राप्त झाली की, मग ईश्वर आणि भक्त असा भेद उरत नाही. लौकिक अर्थाने जरी भक्त आणि भगवंत हा भेद दिसत असला तरी अंतरंगातून एकत्वाची भावना जागृत होते आणि आत्मा-परमात्म्याचे मिलन होत असते. याचेच नाव मुक्ती वा मोक्ष आहे.
               म्हणून स्वामी भक्तांनी नेहमी आपली वृत्ती स्थिर ठेऊन वागावे, मी-पणा, अहंकार, वृथाभिमान यापासून स्वत:ला वाचवावे. आपल्या मार्गातील सर्वात मोठे शत्रू हेच आहेत. तेव्हा यांचा सर्वनाश करणे म्हणजेच आध्यात्मिक प्रगती करणे होय. श्री स्वामीसुत महाराजांनी सुध्दा स्वामींची सेवा करत असताना मी-पणाचा त्याग करून कर्तेपणा हा स्वामींचा हातात दिला. स्वामीसुत हे आध्यात्मातील खुप मोठी आसामी होते, अक्कलकोट येथे एखाद्या भक्ताला स्वामी काही बोलले हे जशाच्या तसे स्वामीसुत त्या भक्ताला आपल्याकडे मुंबईत आल्यावर सांगत असत. आणि स्वामीसुत एखाद्याला काय बोलले हे स्वामी महाराज अक्कलकोटी तो भक्त आल्यावर सांगत असत. स्वामींचे अचुक बोलणे अंतरात्म्यात जाणून घेण्याएवढी कठोर साधना स्वामीसुतांनी केली होती. ज्यामुळे भक्त आणि भगवंत हा भेद नाहिसा होऊन, दोघेही एकरूप पावले होते. ज्यामुळे भक्तांचे बोलणे भगवंत, भगवंताचे बोलणे भक्त जाणत होता. एवढी उच्च साधना आणि अधिकार असून ही कधीही स्वामीसुतांनी स्वत:चा मोठेपणा दाखवला नाही. किंवा वृथा अहंकार बाळगला नाही. तर प्रत्येक वेळी स्वामींच सर्व काही करतात. हीच भावना ठेवली. भक्तीची ही अवस्था स्वामीसुत महाराजांकडून प्रत्येक स्वामीभक्तांनी आवर्जुन शिकण्यासारखी आहे. आजच्या आपल्या अभंगातून स्वामीसुतांनी हिच गोष्ट आपल्या मनावर बिंबवण्याचा यत्न केला आहे. सर्व कर्तेपण स्वामींना अर्पण करण्याचा पाठ शिकवणारा हा अभंग आहे. ज्यातून स्वामीसुतांची निष्काम आणि निस्वार्थ भक्ती दिसून येतेच, शिवाय त्यांची समर्पणाची वृत्ती ही मनाला भेदते. तेव्हा आपण आता हा अभंग पाहू या.......
स्वामीबापा, उडी तुझ्या बळावरी । नाही तरी थोरी काय माझी ॥1॥
आम्हां अनाथासी कोण तें पुसेल।  जरी तें नसेल बळ तुझे ॥2॥
तूंचि नाचविता, तूंचि बोलविता । म्हणूनी व्यवस्था ऐसी माझी ॥3॥
स्वामीसुत म्हणे माझी उडी खरी । तुझ्या बळावरी, स्वामीराया ॥4॥
               स्वामीसुत महाराजांना सांगत आहे की, हे स्वामीराया ! मी हे जे काही प्रसार प्रचाराचे अत्यल्प कार्य करत आहे, हे सर्व आपल्यामुळेच मला शक्य झाले आहे. आपण माझ्या सोबत कायम राहून माझ्या शब्दाला तारत आहात, म्हणूनच मी हे धाडस करू शकतो. माझ्या या कार्यामागे कृपाशिर्वाद आणि पाठबळ आपलेच आहे. मला जी काही आज थोडी फार किंमत आहे, ती केवळ आपल्यामुळेच आहे. आपण जर आपला वरदहस्त माझ्या डोक्यावरून काढलात तर मी पांगळा होईल. माझी सर्व अब्रू ही धुळीस मिसळेल. याची मला पुर्ण जाणीव आहे. आपल्या कृपेशिवाय मी शुन्य आहे. तेव्हा माझी साथ कधीही सोडू नका. मला कधीही अंतर देऊ नका. आपण जर आपला वरदहस्त आमच्या डोक्यावरून काढून घेतलात तर आम्ही अनाथ होऊ, पोरके होऊ. आपल्या कृपाबळाशिवाय आम्हाला काहीही किंमत नाही. आपण जर आम्हाला दुर लोटले तर आम्हाला सर्व सृष्टीसुध्दा दूर लोटेल. आम्हाला कोणीही तारणहार उरणार नाही. हे स्वामीबापा ! आमची शक्ती, भक्ती तुच आहेस. आमचा श्वास, ध्यास तुच आहेस. तुझ्याशिवाय आम्ही शुन्य आणि अस्तित्वहीन आहोत. तेव्हा आम्हाला सोडून दुर जाऊ नकोस. आम्हाला मोह मायेच्या बंधनात अडकवू नकोस. हीच कळवळीची प्रार्थना आहे.
               हे कृपावंता ! या अनंत ब्रह्मांडाचा नायक तुच आहेस, ही सर्व सृष्टी तुझ्यास ईच्छेने चालते. आम्हा सर्वांचा कर्ता धर्ता तुचं आहेस. कृती जरी आम्ही करत असलो तरी, त्यामागिल चैतन्य शक्ती ही तुंच आहेस. आम्हाला आपल्या ईच्छेप्रमाणे नाचवणारा व बोलवणारा तुच सर्वनियंता सर्वेश्वर आहेस. आज जरी मी जगात प्रसिध्द असलो तरी तो तुझा सुत म्हणूनच आहे. तुच माझा बाप आणि भाग्य विधाता आहेस. आज माझी ही ओळख केवळ तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. यात माझी काहीही पात्रता नाही. मी तुझ्या कृपेशिवाय शुन्य आहे. माझी ही वाटचाल तुझ्याच बळावर आहे. मी तुझ्या चरित्र प्रचाराची उडी ही केवळ तु सोबत आहेस, म्हणूनच घेऊ शकलो, याची मला पुर्ण जाणीव आहे. हे सर्व तुझेच कार्य आहे आणि ते तुंच करवून घेत आहेस, यात माझा कवडीएवढा ही वाटा नाही. कर्ता करविता तुंच आहेस. तुझ्या ईच्छेशिवाय झाडांचे पान ही हलू शकत नाही, तर आम्ही कशाचा मोठेपणा घ्यावा. कशाची प्रौढी मिरवावी ?
               हे दयाघना ! सर्व काही तुच करतोस मात्र त्याचा मोठेपणा ही आम्हाला मिळतो, हे तुझ्या मनाचे मोठेपण आहे. तुझी आपल्या भक्तांप्रती असणारी ओढ आहे. तुझी ही ओढ अशीच आम्हावरतीं राहू दे, एवढीच कृपा आम्हांवर कर. तसेच या मिळणाऱ्या मोठेपणाला बळी पडून आमचा आत्मघात होणार नाही. एवढीच आम्हावर दया कर. अहंकार, वासना किंवा वृथाभिमान आम्हाला कधीही बाधू शकणार नाही. षडविकार आणि मायेचा प्रभाव आम्हावर कधीही होणार नाही. एवढेच दान आम्हाला दे. हीच अंतिम मागणी आम्ही तुला करत आहोत. हे समर्थ प्रभो ! आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझेच कार्य हातून घडावे आणि तुझेच पाठबळ अंतिम श्वासापर्यंत सोबत असावे. हीच तुला आपल्या लेकराची विनंती आहे.
               सज्जनहो, स्वामींनी ज्यांना आपले लेकरू म्हणून स्विकारले त्या स्वामीसुतांचा त्याग, मनाचा मोठेपणा आणि निष्काम भक्ती पाहता, स्वामींचे लेकरू म्हणून घेण्याची योग्यता त्यांची अंगी होती, हे सत्य आहे. संसाराचा त्याग करून, अनंत अडचणीचा सामना करत त्यांनी स्वामी सेवेचा ध्वज अखंड फडकवत ठेवला. लाखो लोकांना स्वामी भजनाला लावले. लक्षावधी लोकांचे दु:ख दूर केले. मात्र याचा श्रेय अथवा मोठेपणा कधीही स्वत:कडे घेतला नाही. किंवा हे मी केले असा शब्द चुकूनही त्यांचे मुखातून बाहेर आला नाही. हीच त्यांच्या त्यागाची ओळख आहे. अन् परब्रह्माचा दास कसा असावा ? याची शिकवण म्हणजे स्वामीसुतांचे आचरण आहे. हे सर्व स्वामी भक्तांनी लक्षात घेण्यासारखे आहे. नाहीतर आज काही तथाकथित बाबा-बुवा हे स्वामींच्या सेवेच्या द्वारे भक्तांचे दु:ख दुर करतात आणि स्वत:च स्वामींचा अवतार असल्याचे आपल्या चांडाळ चौकडीद्वारे जाहिर करतात. अशा महाठगांनी स्वामीसुतांच्या भक्तीतून त्याग आणि निष्काम भक्ती शिकावी व वेळीच सावध व्हावे, अन्यथा स्वामींचा बडगा बसला तर सर्वंच होत्याचे नव्हते होईल. तेव्हा वेळीच सावध व्हा ! असो. शेवटी जाता जाता आपण स्वामींचे नामस्मरण करू या आणि स्वामींना स्वामीसुतांसारखी भक्ती व त्याग मागू या……
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
श्री स्वामीसुत महाराज की जय 
॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥