पोटासाठी केलें काज। तेथें कैसा स्वामीराज ॥



श्री स्वामी समर्थ
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
स्वामी वैभव दर्शन भाग -02
॥ श्री स्वामीसुताची सत्यवाणी ॥
पुष्प 19 वे
पोटासाठी केलें काज तेथें कैसा स्वामीराज
स्वामी भक्तांनो,
               मुळपुरूष समर्थ सदगुरुंची सेवा करत असताना, अन्य चिंता करायची गरज उरत नाही. रंकाचा राव आणि रावाचा रंक करणे हा ज्यांचा नित्य खेळ आहे. त्या समर्थांची सेवा हातून घडावी, यापेक्षा दुसरे भाग्य ते कोणते ? ज्यांच्या पायी सर्व शरणांगत आहेत, तेथेच आपण आपले मस्तक ठेवले आहे. ही आपली अपुर्व पुण्याई आहे. मानवी जीवनात अनेकदा असंख्य अडचणी, समस्या, दु:ख येतात. परंतु यावेळी जर आपल्या मुखी समर्थांचे नाम असेल तर त्या दु:खाला सामोरे जाण्याची आणि त्यातून सुखरूप बाहेर पडण्याची शक्ती ही समर्थांचीच असते. एवढी कनवाळू ही स्वामीआई आहे. जी प्रत्येक सुख-दु:खात सोबत राहते, फक्त तिला ओळखण्यासाठी चित्त शांत आणि शुध्द असावे लागते. बाळाचे रडू ऐकून जशी आई दुधाचे पातेल चुलीवर ठेऊन धावत येते, अगदि तसेच तुम्ही आम्ही संकटकाळी अंत:करणातून शुध्द प्रमाने हाक मारल्यास आपली स्वामी आई सृष्टीचा खेळ अर्धवट सोडून आपल्याकडे धावत येते.
फक्त तो भक्तीभाव आपल्यात दिसला पाहिजे. कारण स्वामींना ढोंग अजिबात चालत नाही, तर स्वामींना शुध्द भाव पाहिजे. एकवेळ स्वामींची सेवा नाही झाली तरी चालेल, मात्र चित्त शुध्द असेल तर स्वामी महाराज नक्की कृपा करतात, हे वास्तव्य सत्य आहे. याची जाणीव सर्व स्वामी भक्तांनी ठेवावी.
               संतश्रेष्ठ स्वामीसुत महाराज आजन्म हीच भक्ती लोकांना शिकवत राहिले. गावोगांव फिरून त्यांनी जनमाणसात स्वामी सेवेची ज्योत पेटविली, अनेकांना स्वामी सेवेला लावले. हे कार्य करत असताना त्यांना काही ठिकाणी ढोंगी लोक नजरेस पडले, जे त्याकाळी सुध्दा स्वामींच्या नावावर भोळ्या भाबड्या लोकांना लुटण्याचे काम करत होते, लोकांच्या श्रध्देच्या गैरफायदा घेत होते. हे पाखंडी लोक पाहिल्या नंतर स्वामीसुतांनी यांच्या पासून लोकांना सावध करण्याचे काम केले. या पाखंडी लोकांचे सत्य स्वरूप लोकांसमोर मांडले. आजचा आपला अभंग सुध्दा अशाच काही पाखंडी लोकांचे लक्षण सांगणारा व त्यांची ओळख पटवून देणारा आहे. आपण अशा लोकांपासून सावध राहावे, हीच एक सदिच्छा स्वामीसुतांची आहे.
पोटासाठी केलें काज । तेथें कैसा स्वामीराज ॥1॥
अन्न मिळेना खायासी । मग म्हणती होऊं ऋषि ॥2॥
लोक म्हणती बावा, बावा । न कळे गुलामाचा कावा ॥3॥
ऐसीयासी कैचा देव । भुलला तो मुळ ठाव ॥4॥
स्वामीसुत खरा भुका समर्थनाम खातो फुका 5
               आजच्या आपल्या अभंगातून स्वामीसुत महाराज ढोंगी लोकांचे लक्षण सांगताना म्हणतात की, हे ढोंगी लोक आपले पोट भरण्यासाठी स्वामी स्वामी करत राहतात. यांच्या ठिकाणी काडीचाही भक्तीभाव नसतो, तर हे लोक फक्त पैशाचे भुकेले असतात. या ना त्या कोणत्याही उपायाने धन जमा करणे, एवढाच यांचा मुळ उद्देश असतो. यांना स्वामी महाराज व त्यांची मुळ शिकवण, यांच्याशी काहीही देणेघेणे नसते. फक्त स्वामींचे नावाने लोकांना लूबाडणे, हाच एकमेव नित्यक्रम यांचा असतो. तेव्हा अशा लोकांपासून सावध राहा, ही शिकवण स्वामीसुत देतात. हे लोक फक्त पैसे जमा करतात, यांना ईतर कशाचेही देणेघेणे नसते. त्यामुळे अशा ठिकाणी स्वामी महाराज कधीही राहत नाहीत. कारण स्वामी महाराज भावाचे भुकेले आहेत, ऐश्वर्याचे नाही, तेव्हा अशा ढोंगी व पैसे जमा करणाऱ्या लोकांपासून सावध राहा.
               काही जण असेही असतात की, ज्यांना खायला काहीही मिळत नाही, यांचा संसार फाटका असतो, कष्ट करण्याची वृत्ती नसते. असे लोक मग ऋषी होण्याचे नाटक करतात. नाना प्रकारचे ढोंग करून, धन जमा करतात. त्यातून आपला प्रपंच चालवतात. यांना आध्यात्म कशाशी खातात हे माहित नसते, आध्यात्म्यातला ‘आ’ सुध्दा यांना येत नाही, मात्र हे लोक भोळ्या लोकांना फसवण्याचे काम करतात. अशा नाटकी लोकांच्या मागे समाज ‘बाबा ! बाबा !’ म्हणून धावत जातो. मात्र या ढोंगी लोकांचा कावा समाजाच्या लक्षात येत नाही. ही महाचतुर मंडळी भावनेच्या आहारी लुबाडण्याचे काम करते. अशा महाठग लोकांपासून सावध राहावे, असा संदेश स्वामीसुत देतात.
               पुढे स्वामीसुत म्हणतात की, अशा ढोंगी लोकांना कसा देव भेटेल किंवा कसे हे लोक देवाला ओळखतील. देवाला शोधण्याचे आणि ओळखण्याचे पहीले लक्ष्य म्हणजे, षडविकांराचा त्याग आणि वासना व लालसा यांचा त्याग होय. पण हे पाखंडी लोक सर्व काही वासना आणि लालसा यासाठीच तर करतात, आणि यांच्या षडरिपू तसूभरही कमी झालेले नसतात, म्हणून शेवटी या लोकांचे बिंग फुटते, आणि सत्य स्वरूप सर्वांसमोर येते. तेव्हा अशा पासून सावध राहा, जो तुम्हाला मुळ स्वामींची शिकवण सोडून ईतर फाफट पसाऱ्यास अडकवतो, किंवा ईतर क्षुल्लक बाबीद्वारे धन जमा करतो, अशा पाखंडी लोकांपासून सावध होऊन, मुळ स्वामींना शरण जा. स्वामींची मुळ शिकवण जाणून घ्या, तरच तुमचे कल्याण आहे. जो गुरू आपल्याला संसारातील आसक्ती कडून मुक्तीकडे नेतो, तोच खरा गुरू होय. अन् जो आपल्या मुक्ती मार्ग न सांगता संसारातील बाबीमध्ये अडकवतो, तो पाखंडी समजावा. कारण ज्यांना स्वत:लाच कधीही स्वामी अथवा स्वामींची शिकवण समजली नाही, तो तुम्हाला काय सांगणार ? तेव्हा अशा पाखंडी लोकांच्या वरवर दिसणाऱ्या बाह्य स्वरूपाला पाहून भूलून न जाता त्यांचे सत्य स्वरूप जाणून घ्या आणि अशांचा त्याग करून स्वामींना शरण जा, हीच सर्व स्वामी भक्तांना विनंती आहे. असे स्वामीसुत स्पष्ट करतात.
               अभंगाच्या शेवटी स्वामीसुत सांगतात, खरा गुरू, साधू किंवा संत कसा ओळखावा ? तर ते म्हणतात की, ज्याला फक्त आणि फक्त स्वामी नामाचीच भुक आहे, आणि जो केवळ स्वामींचे नामच खातो, तोच खरा गुरू, तोच खरा साधू आणि तोच खरा संत. स्वामीसुत महाराजांनी अगदी एका वाक्यात खऱ्या गुरूचे लक्षण सांगितले आहे, जे वेदवाक्याप्रमाणे आहे. बऱ्याच खरं कोण आणि खोटं कोण ? हे कसं ओळखावं असा गोंधळ सर्वसामान्य लोकांचा होता. पण स्वामीसुत महाराजांनी अगदी वाक्यात यातील भेद स्पष्ट केला, तो सर्वांना सहज लक्षात येणारा आणि परखड सत्य सांगणारा आहे. ज्याला स्वामींचे सत्य स्वरूप समजले, ज्याला स्वामींच्या मुळ शक्ती स्वरूपाची जाणीव झाली, तो कधीही पद, पैसा, ऐश्वर्य अशा नश्वर बाबीच्या पाठीमागे लागणार नाही. किंवा त्याला कधीही पैशाची भुक लागून तो नाना प्रकारे कार्यक्रम करून पैसा गोळा करणार नाही. तर त्याला फक्त एकच भुक असेल ती म्हणजे स्वामी नाम घेणे, या पलिकडे त्याला काहीही गोड वाटणार नाही. अन् तो आपल्या अनुयायांना सुध्दा ईतर कोणतीही मागणी करणार नाही अथवा त्यांना ईतर काहीही करण्यास सांगणार नाही. तर तो त्यांना ही केवळ स्वामी नामाची भुक भागवायला आणि स्वामी नामाचे अखंड चिंतन करायला सांगेल. हा झाला खरा गुरू. अन् जो पाखंडी असेल त्याला स्वामींचे स्वरूप आणि शक्ती न समजल्यामुळे तो आपल्या भक्तांना ईतर निरर्थक गोष्टीमध्ये अडकून ठेविल, त्यांना स्वामी नामापेक्षा ईतर दुय्यम बाबीमध्ये गुंतवून ठेविल. असे असेल तर ओळखून घ्यावे की, आपली निवड चुकली आहे. आपण चुकीच्या व्यक्तीमागे धावत आहोत. तेव्हा अशा व्यक्तींचा तात्काळ संग सोडावा व स्वामींच्या मुळ संगतीत यावे, आणि स्वामी नामाची भुक भागवावी. तरच आपले कल्याण होऊन, अंती आपल्याला स्वामींची कृपा प्राप्त होईल. ही जाणीव सर्व स्वामी भक्तांनी ठेवावी. हिच सर्वांना विनंती आहे. अशी विनंती शेवटी स्वामीसुत आपल्याला करतात.
               स्वामी भक्तांनो, आजच्या अभंगाचे चिंतन करून आपण आपला मार्ग निवडावा, ही एक प्रार्थना….!
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
श्री स्वामीसुत महाराज की जय 
॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥