श्रीस्वामीसमर्थ जयजय स्वामीसमर्थ। भजन यथार्थ करा तुम्ही ॥



श्री स्वामी समर्थ
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
स्वामी वैभव दर्शन भाग -02
॥ श्री स्वामीसुताची सत्यवाणी ॥
पुष्प 20 वे
श्रीस्वामीसमर्थ जयजय स्वामीसमर्थ भजन यथार्थ करा तुम्ही

स्वामी भक्तांनो,
               श्री स्वामी वैभव दर्शन भाग 02 मधील हे शेवटून दुसरे पुष्प आहे. यानंतर एकविसावे पुष्पानंतर आपण काही दिवस थांबणार आहोत. पुन्हा काही काळानंतर नविन विषयावर नव्याने लेखमाला सुरू केली जाईल. श्री स्वामीसुत महाराजांच्या अभंगवाणीद्वारे आपण अनेकविध विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. यात श्री स्वामी महाराजांच्या जयंती महापर्वणीचे महत्व, स्वामी महाराजांच्या प्रकटदिनाचे महारहस्य, स्वामी नामाचे श्रेष्ठत्व, स्वामी पंथाचे श्रेष्ठत्व, मोक्षभूमी अक्कलकोट व तेथिल कुशावर्त तीर्थ, स्वामी भजनाचे महत्व, नरदेहाचे श्रेष्ठत्व, सर्वश्रेष्ठ स्वामी महाराज, ढोंगी बुवा-बाबांचे कारस्थान इ. अनेकविध विषयावर आपण श्री स्वामीसुत महाराजांच्या दिव्य अभंगवाणीद्वारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्व अभंगातून स्वामीसुत महाराजांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्याला स्वामी महाराजांचे श्रेष्ठत्व आणि शुध्द भक्तीभाव याची शिकवण दिली. प्रसंगी खडे बोल सुनावून दांभिकांचे पितळ उघड करण्याचे कामही केले. स्वामी महाराजांच्या एकूण अंतरंगीच्या शिष्यापैकी एक लाडके शिष्योत्तम असणारे स्वामीसुत महाराजांची वाणी ही मधूर आणि दिव्यत्वाचा गंध असलेली आहे.  या वाणीला स्वामींचा आशिर्वाद असल्यामुळे तिला आपोआपच अधिकारपणा प्राप्त झालेला आहे.
तेव्हा या वाणीतील प्रत्येक शब्दावर पुर्ण विश्वास ठेऊन आपण स्वामी सेवेची पुढिल वाटचाल करावी, म्हणजे आपला आध्यात्मिक प्रवास सुखकर व सुसह्य होईल. हीच सर्व स्वामी भक्तांना हात जोडून विनंती असेल.
               आजच्या आपल्या अभंगातून श्री स्वामीसुत महाराजांनी स्वामी महाराजांच्या मंत्राचे श्रेष्ठत्व वर्णन केलेले आहे. स्वामीसुत महाराजांनी हयातभर ज्या स्वामी मंत्राचा अखंड जप केला, त्या  महाशक्तीशाली मंत्राचे माहात्म्य वर्णन त्यांनी आजच्या या आपल्या दिव्य रचनेतून केले आहे. स्वामींच्या नामस्मरणाने होणारे लाभ आणि या नामचिंतनाची गरज त्यांनी यातून व्यक्त केलेली आहे. तेव्हा आपण अधिक वेळ न लावता, त्यांच्याच शब्दात हे महत्व जाणून घेऊ या.........
श्रीस्वामीसमर्थ जयजय स्वामीसमर्थ । भजन यथार्थ करा तुम्हीं ॥1॥
या हो भजनाने सर्वांसी विसावा।  देवाही दानवां हेंचि सुख ॥2॥
समर्थभजनीं निमग्न तें खरे । स्वामीला आदरें ध्याती नित्य ॥3॥
नारीनरें हेंचि भजन करावे।  जरी तुम्हां व्हावे, मोक्षसुख ॥4॥
पंचदशाक्षरी भजन बरवे।  भावें तें करावे सर्वजनीं ॥5॥
आसनी शयनी भोजनी तें करा । स्वामीभक्ति वरा प्रेमभावें ॥6॥
स्वामीभजनाची अक्षरे पंधरा । चुकविती फेरा चौऱ्यांशीचा ॥7॥
स्वामीसुत म्हणे तरणोपायासाठी । भजन जगजेठी स्वामीराव ॥8॥
               आपल्या या अभंगात श्री स्वामीसुत म्हणतात की, सज्जनहो ! तुम्हाला जर आपल्या मनुष्य देहाचे सार्थक करायचे असेल तर माझ्या स्वामीरायांचा ‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ हा मंत्र जप करा. या महामंत्राचा तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढा यथार्थ जप करा, भजन करा. कारण याशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही. हाच एकमेव महामंत्र असा आहे की, ज्याने फक्त मानव प्राणी नाही तर दानव आणि देवांचे कल्याण होते. देव-दानवांना सुध्दा या मंत्राशिवाय गत्यंतर नाही, एवढे माहात्म्य या महामत्रांचे आहे. याही पुढे जाऊन स्वामीसुत सांगतात की, आपल्याला स्वामींचा कृपाशिर्वाद मिळावा आणि स्वामींची आपल्यावर अखंड कृपा राहावी, यासाठी सर्व देवी-देवता व दानव हे सदैव स्वामींच्याच भजनात निमग्न राहातात. आदरपुर्वक स्वामींचे नित्य भजन चिंतन करतात. एवढे अलौकिक शक्ती सामर्थ्य स्वामी महाराजांचे आहे, जेथे सुरासुर ही नतमस्तक होऊन शरणांगत आहेत. तेव्हा आपण तर तुच्छ मानव प्राणी आहोत, आपल्याला आपले हित साधावयाचे असेल तर स्वामींना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. याची जाणीव सर्व स्त्री-पुरुषांनी ठेवावी आणि स्वामी नामात स्वत:ला तल्लीन करून घ्यावे, जर आपल्याला मोक्ष वा मुक्ती पाहिजे असेल तर स्वामींच्या या महामंत्राशिवाय आपल्याला अन्य कोणताही पर्याय नाही, असे स्वामीसुत सांगतात.
               पुढे स्वामीसुत सांगतात की, सज्जनहो, स्वामींचा पंचदशाक्षरी म्हणजे पंधरा अक्षरांचा असणारा ‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ हा मंत्र सर्वश्रेष्ठ असून सर्व मंत्राचा राजा आहे. तेव्हा याच महामंत्राचा भावपुर्वक जप सर्वांनी करावा. याचेच भजन चिंतन करावे. सदासर्वदा हाच मंत्र म्हणावा. आसनी बसल्यावर, जागेपणी किंवा रात्री झोपताना, प्रवासात, काम करताना किंवा जेवण करताना आपल्या ओठी हाच एकमेव मंत्र असावा. याचाच निजध्यास आपण धरावा. हाच दिव्य म्हणत स्वामींची श्रध्दाभावे, प्रेमपुर्वक भक्ती करावी. यातच आपले हित आहे. कारण स्वामी मंत्रातील हेच पंधरा अक्षरे आपला लक्ष चौऱ्यांशीचा भवफेरा चुकवणार आहेत. याच पंधरा अक्षरांचे भावपुर्वक भजन केल्याने आपण भवतापातून मुक्त होणार आहोत. तेव्हा आपल्या सर्वस्वी कल्याणासाठी, आपल्या हितासाठी आपण या मंत्राचा निजध्यास धरावा. सदैव स्वामी नामाचे चिंतन आणि संकिर्तन करावे. स्वामींची भक्ती करावी. स्वामींना हात जोडून शरण जावे, तरच आपली सुटका आहे, अन्यथा नाही. असे स्वामीसुत स्पष्ट करतात.
               अभंगाच्या शेवटी स्वामीसुत म्हणतात की, सज्जनहो, तुम्हाला जर तुमचा तरणोपाय व्हावा, असे वाटत असेल तर यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे जगजेठी स्वामी महाराजांचे भजन करणे हे होय. जर तुम्ही पंचदशाक्षरी स्वामी महामंत्राचा श्रध्दापुर्वक उच्चार केला तर तुमचे कल्याण झालेच म्हणून समजा. केवळ हाच मंत्र आणि हीच स्वामी शक्ती तुमचा तरणोपाय ठरू शकते, याशिवाय अन्य मार्ग नाही. तेव्हा आता आपण सावध होऊन स्वामींच्या या दिव्य मंत्राचा जप करावा, त्याचे भजन करावे, चिंतन करावे, हेच आपले निजकर्म असावे. तर आणि तरच आपले कल्याण होईल अन्यथा नाही. अशी माहिती अभंगाच्या अंती स्वामीसुत देताना दिसतात.
               स्वामी भक्तांनो, जीवनभर स्वामीसुतांनी स्वामींचा पंचदशाक्षरी मंत्र जप केला व त्यांच्याकडे आलेल्या सर्व दु:खितांना त्यांनी याच दिव्य मंत्राची दिक्षा दिली. याच मंत्राच्या प्रभावाने सर्व श्रध्दाळूंची दु:खे ही नाहीशी झाली. तेव्हा आपण ही हाच मंत्र आपल्या नित्यसेवेत जपासाठी घ्यावा. याच मंत्राचे भजन किर्तन करावे. नामचिंतन करावे, जेणेकरून आपलाही उध्दार हा दिव्य मंत्र सहजतेने करेल, यात तिळमात्र शंका नाही. कारण हे शब्द स्वामीसुत महाराजांसारख्या अधिकारी पुरूषाचे शब्द आहेत. यामागे स्वामींचा पुर्ण कृपाशिर्वाद आहे. चला तर मग आपल्या तरणोपायासाठी स्वामींचा हाच दिव्य मंत्र म्हणू या……
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
श्री स्वामीसुत महाराज की जय 
॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥