तुजविण दु:ख देवा । आतां सोसवेना जीवा ॥



श्री स्वामी समर्थ
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
स्वामी वैभव दर्शन भाग -02
॥ श्री स्वामीसुताची सत्यवाणी ॥
पुष्प 21 वे
तुजविण दु:ख देवा आतां सोसवेना जीवा
स्वामी भक्तांनो,
               श्री स्वामी वैभव दर्शन भाग 02 चा हे अंतिम पुष्प आपल्या समोर सादर करताना थोडीसी द्विधा मनस्थिती आहे. स्वामी कृपेने ही लेखमाला यशस्वीपणे पुर्ण झाल्याचा आनंद आहे, तर आता पुढिल काही दिवस स्वामींच्या वामय सेवेचा आणि आपल्या सर्वांचा विरह होणार याबद्दल मनात अस्वस्थता ही दाटली आहे. त्यातच आजचा अंतिम विषय हा सुध्दा श्री स्वामीसुत महाराजांच्या विरह दु:खाचाच असल्यामुळे ही अस्वस्थता मनात खोलवर रुतत चालली आहे. असाच काहीसा अनुभव आपल्याला ही आजचे पुष्प वाचताना येणार आहे. तेव्हा हा विरह कालावधी परब्रह्म स्वामी महाराजांनी शीघ्रातिशीघ्र भरून काढावा, हीच विनंती स्वामी महाराजांना करून विषयाला सुरूवात करू या…..

               घरादाराचा व संसाराचा त्याग केल्यापासून श्री स्वामीसुत महाराज हे सदैव स्वामींचेच बनून गेले होते. स्वामींच्या नामचिंतनात आकंठ बुडालेले स्वामीसुत हे स्वामी महाराजांशी एकरूप झालेले होते. स्वामींच्या नामाशिवाय आणि स्वामीशिवाय त्यांना एक क्षण ही घालवणे कठिण होते. आपल्या चित्तात त्यांनी स्वामींची प्रतिमा घट्टपणे कोरली होती. असे असून ही जेव्हा काही क्षण स्वामींची मूर्ती दृष्टीआड व्हायची तेव्हा स्वामीसुत हे अतिशय व्याकूळ व्हायचे. कारण देहाने जरी स्वामीसुत मुंबईला असले आणि स्वामी महाराज अक्कलकोटी असले तरी, मनाने मात्र स्वामीसुत हे कायम स्वामींच्या निकट असत. तेव्हा आपली गुरूराज मुर्ती ही काही काळ जरी मन:पटला आड गेली तर स्वामीसुत अस्वस्थ व्हायचे आणि त्यांचे चित्त हे स्वामी भेटीसाठी कासाविस व्हायचे. एवढी घट्ट गुरूशिष्याची नाळ जुळलेली होती. परंतु स्वामीसुताच्या या सुखाला कोणाची तरी नजर लागली आणि नियतीने आपला डाव साधला. एके दिवशी अक्कलकोटी स्वामीसुत स्वामींच्या समोर नेहमीप्रमाणे पायी खडांवा घालून भजन करत असताना, बऱ्याच दिवसांपासून स्वामीसुतांच्या भक्तीने धास्तावलेल्या काही चांडाळ चौकडींनी याची तक्रार स्वामीकडे केली की, हा आपल्या समोर पायी खडांवा घालून नाचतो, हे योग्य नव्हे. तेव्हा सर्वांन्तयामी स्वामी महाराजांनी स्वामीसुताला खडावा काढून भजन करण्याची आज्ञा केली. तेव्हा या चांडाळ चौकडींने जाऊन बळजबरीने सुतांच्या पायातून खडावा ओढून काढल्या. अशा प्रकारे स्वामीसुतांचा सर्वासमोर अपमानित करून चौकडी सुखी झाली. ईकडे स्वामीसुत स्वामींच्या चरणी जाऊन लोटांगण घालते झाले. तेव्हा स्वामींनी सुत काही बोलण्याअगोदरच सांगितले की, ही तुझी अंतिम परिक्षा होती. यात ही तू अपेक्षेप्रमाणे खरा उतरलास. स्वामींचे शब्द ऐकून चक्रावलेल्या सुतांने प्रतिप्रश्न केला की, स्वामी कोणती परिक्षा ? कसली परिक्षा ? यावर स्वामी उत्तरले, आम्ही तुला फार मोठ्या जवाबदारीसाठी निवडून तयार केले आहे. त्याचीच ही शेवटची पायरी होती. असे बोलून अचानक स्वामी महाराजांनी आपल्या अवतार समाप्ती विषयी स्वामीसुताला सांगितले. तसेच आपला वारसा पुढे तू चालव, अशी आज्ञा केली. स्वामींचे हे शब्द ऐकून स्वामीसुतांना धक्काच बसला. ते काही काळ मुर्च्छित पडले. स्वामी महाराजांनी त्यांना शुध्दीवर आणून पुन्हा आपला मनोदय व्यक्त केला. यासाठीच तुला तयार करून तुझी निवड केली आहे, असे स्पष्ट केले. परंतू स्वामी आपल्याला सोडून जाणार, ही कल्पनाच स्वामीसुतांना सहन झाली नाही. अशी विचित्र आणि अनपेक्षित आज्ञा ऐकून स्वामीसुतांना डोंगर कोसळल्याचा भास झाला. त्यांनी स्वामींना अवतार लीला संपविण्यापासून थांबविण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला. अनेक वेळा विनंती, आर्जव, प्रार्थना केली. परंतु स्वामी महाराज मात्र आपल्या ईच्छेवर ठाम होते, त्यांचे मन जरासेही पुत्र मोहाकडे वळले नाही. उलटदर्शी त्यांनी मी आता लौकिक अर्थाने जरी जाणार असलो तरी सदैव तुझ्या जवळच आहे, मी तुला सोडून कोठेही जाणार नाही. मी ईथेच कायम असेल, तू आवाज दे मी ओ देईल, असे सांगितले. मात्र या गोड शब्दांनी स्वामीसुतांचे समाधान झाले नाही. त्यांना स्वामी जाणार या कल्पनेने अतिव धक्का बसला.  ते आपल्या स्वत:शीच पुटपुटले, ‘स्वामीशिवाय आपण कसे जगायचे ? आणि कशाला जगायचे ? का म्हणून जगायचे ?’ असा निश्चय करून स्वामीसुत स्वामींचे दर्शन घेऊन बाहेर पडले, ते थेट मुंबईला आले. (बऱ्याच चरित्रात स्वामीसुत हे खडावा काढल्याचा अपमान सहन न झाल्यामुळे थेट मुंबईला निघून गेले, असा उल्लेख केलेला आढळतो. हा प्रकार म्हणजे स्वामीसुतांवर आणि पर्यायाने स्वामी महाराजांवर अन्याय केल्यासारखे आहे. कारण ज्याने स्वामींच्या एका शब्दावर भरलेले घर आणि सुखी संसार हा तरुणपणी सोडला, ते स्वामीसुत खडावासाठी दु:खी होतील, ही कल्पनाच चुकीची आहे. जो आपल्या सदगुरूसाठी प्राणाचा त्याग करायलाही मागे पुढे पाहत नाही, तो आपल्या गुरू आज्ञेने खडावा काढल्याने दु:खी होऊन, गुरूला सोडून जाईल ही कल्पनाच लेखकाचा पुर्वग्रहदुषितपणा व्यक्त करणारी आहे. असो.) स्वामीसुत हे मुंबईला आल्यावर तेथे त्यांनी कायमचेच अन्नपाणी वर्ज्य केले. स्वामी महाराज मला सोडून जाणार ही गोष्ट त्यांच्या जिव्हारी लागली. आणि मग त्यांनी स्वामींच्या अगोदर आपण जायचे असा  निश्चय केला. यावेळी आपल्या मनाची अवस्था त्यांनी ओठावर आणली. स्वामी महाराज दृष्टीआड होणार याची जाणीव झाल्यावर आपल्या मनाची अवस्था स्वामीसुतांनी पुढिल अभंगाद्वारे व्यक्त केली आहे.
तुजविण दु:ख देवा। आतां सोसवेना जीवा॥1॥
असे जीवींचे जे दु:ख। तूंच जाणसी बा एक॥2॥
तूंचि एक चित्त-धन। करी आतां निवारण॥3॥
करा जीवाची विश्रांती। स्वामीराया विश्वपती ॥4॥
बहुत झालेले विव्हळ आतां सोडवावा बाळ 5
स्वामीसुत चरणांवरी माथा ठेवी, दु:ख वारी 6
               आपले इष्टदैवत, आपले सद्गुरू श्री स्वामीदेव दृष्टीआड होणार हे समजल्यावर स्वामीसुत पुर्ण शरणांगत भावाने आणि व्याकुळतेने स्वामींची करूणा भाकतात. त्यांची विनवणी करतात की, हे माझ्या स्वामीराया, आपण मला का दूर करत आहात, का माझ्यावर अशी अवकृपा करत आहात. माझा श्वास हा तुमच्याविणा अपूर्ण आहे. तुमच्याशिवाय एक क्षण ही मी जीवंत राहू शकत नाही. तुमच्याशिवाय या जगाची कल्पना ही सहन होत नाही. तुम्ही मला असे सोडून जाऊ नका. तुमच्या विरहाचे दु:ख मला सहन होत नाही. एका क्षणाचा तुमचा विरह हा अनंत जन्माचा विरह वाटतो, तेव्हा हे करूणानिधान प्रभो ! मला कधीही अंतर देऊ नका, मला कधीही अव्हेरू नका. हे दीनानाथा ! तुमच्याशिवाय ही सृष्टी अंधकारमय भासते, तूमच्याविणा हे जीवन एक अभिशाप वाटते. प्रत्येक क्षण हा एक युगासारखा भासतो आहे. माझ्या जीवाची सध्या जी अवस्था आहे, त्याचे मी शब्दात वर्णन ही करू शकत नाही. परंतु हे करूणाकार प्रभो ! आपणाला सर्व ज्ञात आहे, आपल्यापासून काहीही लपून राहू शकत नाही. माझ्या अस्वस्थ मनाची स्थिती फक्त तूम्हीच ओळखू शकता. अन्य कोणालाही ती कळणार नाही. हे सर्वेश्वर स्वामी देवा ! माझ्या मनाची ही केविलवाणी अवस्था ओळखून माझ्यावर दया करा. मला दूर करू नका. अशी आळवणी स्वामीसुत स्वामींना करतात.
               पुढे स्वामीसुत म्हणतात, हे दयाघना ! या नश्वर जगात माझा म्हणावा असा तूच आहेस.  माझ चित्त आणि धन ही तूच आहेस. तुझ्याशिवाय या जगात माझे कोणीही नाही. तुझ्याशिवाय या जगात मला ईतर काहीही नको. माझे सर्वस्व तूंच आहेस. माझी माता, माझा पिता, माझा बंधू, माझा सखा सर्व काही तूच आहेस. माझा श्वास आणि ध्यास ही तूच आहेस. हे कृपावंता ! तूला जरी अनंत मुलं असली तरी मला मात्र तूंच एक माता आहेस. तूझ्याविणा मी पोरका आहे. तेव्हा माझ्यावर हा अन्याय करू नका. मला टाकून जाऊ नका. हीच अंतिम विनंती आपल्याला आहे. हे भक्तवत्सला ! तुला जर माझा त्याग करायचा असेल तर मग माझा प्राण अगोदर घेऊन टाक. माझ्या जीवाला चिरविश्रांती दे. माझे जीवन संपून टाक, जेणेकरूण माझ्या व्याकूळतेचे निवारण होईल. हे विश्वपते ! स्वामीराया, आपल्याला अशक्य असे काहीच नाही. आपण सर्वेश्वर पुर्णब्रह्म आहात. आपण या अनंत ब्रह्माडांचे अधिपती आहात. प्रत्यक्ष काळ ही आपली आज्ञा निमूटपणे पाळतो. तेव्हा माझी ही व्याकूळ अवस्था आता मलाच सहन होत नाही आहे. मी आपल्या विरह दु:खाने विव्हळ झालेलो आहे. आपल्याला जर माझा वीट आला असेल किंवा माझा त्याग करायचा असेल तर, हे गुरूवर्या ! माझ्यावर एकच कृपा करा. माझी यातून सोडवणूक करा. मला मृत्यू द्या. कारण फक्त मृत्यूच माझी ही अवस्था थांबवू शकतो. तेव्हा आपल्या या बाळाला यातून सोडवा, माझ्यावर दया करा. तुमच्याविणा हे जीवन व्यर्थ आहे. मला या जीवनाचा त्याग करायचा आहे. हिच एक विनंती मी‍ आपल्याला हात जोडून, चरणावर माथा टेकवून करत आहे. माझ्यावर कृपा करा आणि मला या विरह दु:खातून मुक्त करा. हीच अखेरची विनंती आपल्याला आहे.
               स्वामींच्या विरह दु:खात आकंठ बुडालेल्या स्वामीसुत महाराजांची अशी केविलवाणी स्थिती झाली होती. बरेच दिवस स्वामीसुतांनी अन्नपाणी वर्ज्य केले होते, त्यामुळे शरीर हे थकले होते, याकाळात स्वामींनी आपले सेवक पाठवून स्वामींसुतांचे मन वळवून त्यांना अक्कलकोटी घेऊन यायचा प्रयत्न केला मात्र स्वामी नाहीत तर मीही नाही. अशी टोकाची भूमिका घेऊन त्यांनी अक्कलकोटी जाणे टाळले. स्वामींचे चिंतन करत करत प्रकृती अस्वस्थतेने आणि अन्नपाणीत्याग केल्यामुळे स्वामीसुतांनी स्वामींच्या अगोदर आपली जीवन यात्रा संपविली. श्रावण वद्य प्रतिपदा, शुक्रवार शके 1796 दि.28 ऑगस्ट 1874 रोजी स्वामीसुतांनी आपल्या बापाआधी प्रयाण केले. स्वामींच्या विरहात जगण्यापेक्षा त्यांनी स्वत:हून मृत्यूला आपलेसे केले. धन्य तो स्वामीसुत आणि धन्य त्याची भक्ती !
               अशीच भक्ती अक्कलकोट स्वामी आम्हांकडून ही करवून घेवोत, हिच अंत:करणातून विनंती करून येथेच या वामय सेवेला पुर्ण विराम देतो. यापुढे ही स्वामींची अशीच सेवा घडावी, आपल्या सर्वावरही स्वामींची कृपादृष्टी सदैव राहावी, हीच विनंती स्वामींना करतो.
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
श्री स्वामीसुत महाराज की जय 
॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥