खोटे देव पुजूनिया । व्यर्थ बोंबावती वाया ॥



श्री स्वामी समर्थ
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
स्वामी वैभव दर्शन भाग -02
॥ श्री स्वामीसुताची सत्यवाणी ॥
पुष्प 16 वे
खोटे देव पुजूनिया व्यर्थ बोंबावती वाया
स्वामी भक्तांनो,
               आपण अनेक वर्षापासून परब्रह्म स्वामी महाराजांची भक्ती करत आहोत. स्वामींनीही आपल्यावर अनंत वेळा कृपादृष्टी केलेली आहे. आपल्या अनेक कठिण प्रसंगी स्वामींनी आपल्याला आधार देण्याचे व त्या कठिण प्रसंगातून बाहेर काढण्याचे काम केले आहे. आज घडीला स्वामी महाराज हे आपल्या कुटूंबाचे एक मुख्य घटक बनलेले आहेत. आपल्या सुख-दु:खात आपण स्वामी महाराजांना कधीही विसरत नाहीत. त्यामुळे की काय ? आपल्या घरातील स्वामींची प्रतिमा किंवा मुर्ती ही आपल्याला नेहमी स्वामी महाराज हे आपल्यातच आहेत याची जाणीव करून देण्याचे काम करते. 1878 ला समाधीस्थ झालेले स्वामी महाराज आज ही आपल्या सुख-दु:खात आपल्या सोबत कायम असतात. हिच बाब त्यांचे परब्रह्म स्वरूप स्पष्ट करणारी आणि ‘भिऊ नकोस, मी तुझ्या बरोबर आहे !
’ या स्वामींच्या मुळ अभिवचनाची सदैव जाणीव करून देणारी आहे.
               असा हा ब्रह्मांडनायक मुळ पुरूष आपला सदगुरू आणि आपला आराध्य दैवत असून ही आपण आज ही ईतर ढोंगी बुबा बाबांच्या आहारी जाऊन आपले आर्थिक  आणि मानसिक नुकसान करून घेतो. ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. तसेच आपला स्वामी महाराजांवरील अविश्वास प्रकट करणारी आहे. एकीकडे आपण सर्वेश्वर आणि सर्वसत्ताधिश स्वामी महाराजांची सेवा करतो आणि दुसरीकडे मात्र अनेक नवस-तावस करतो, मुक्या प्राण्यांचे बळी देतो, अनेक निरूपयोगी विधी करून आर्थिक नूकसान करून घेतो, ही बाब स्वामींच्या भक्तांना निश्चितच शोभणारी नाही. ज्या स्वामींनी अक्कलकोटी 22 वर्ष लोकांना अधश्रध्देपासून जागे करण्याचे काम केले. प्रसंगी खडे बोल सुनावले. कर्मकांडातील फोलपणा दाखवून दिला, त्याच स्वामींना साक्षी ठेऊन आापण आज काही क्षुल्लक विधी करतो, कर्मकांड करून कर्जबाजारी होतो. मुक्या प्राण्यांचे बळी देतो, ही गोष्ट स्वत:ला स्वामी भक्त म्हणणाऱ्यांना कधीही न शोभणारी तर आहेच, तसेच स्वामींचाही अक्षम्य अपराध करणारी आहे, तेव्हा आापण सर्वसत्ताधिश स्वामी महाराजांची सेवा करत असताना ईतर अंधश्रध्दा बाळगण्यापेक्षा डोळसपणे स्वामींची सेवा करावी, हीच अनमोल शिकवण देणारा आजचा हा अभंग आहे.
               चला तर मग आजचा श्री स्वामीसुत महाराजांचा स्वामींची मुळ सेवा समजाऊन सांगणारा व पाखंड मत खंडण करणारा अभंग पाहू या.....
स्वामी माझा सोडोनियां । गमजा करूं नका वायां ॥1॥
 आतां सांगतो लोकांना। पडू नका ह्या भरीला ॥2॥
सर्व लोक पिसाळले । भूतें पुजाया लागले ॥3॥
खोटे देव पुजूनियां । व्यर्थ बोंबावती वाया ॥4॥
धूप घालोनियां भूता । म्हणती येई येई आतां ॥5॥
अंगावरी येऊनी भूत । काय करील तुमचा स्वार्थ ॥6॥
कुंभीपाकाची भरती । करुनी घेतां आपुले हातीं ॥7॥
मारुनी पशूच्या दावणी । आयुष्य घालविती प्राणी ॥8॥
फोडूनि नारळाचे ढिग।  काय माजविलें ढोंग ॥9॥
जिता असूनियां काळें । त्यासी सेवेसी ग्रासिले ॥10॥
स्वामीसुत म्हणे उमजा । स्वामी भजा, सोडा गमजा ॥11॥
               आजच्या आपल्या अभंगात स्वामीसुत सांगतात की, सज्जनहो, माझा परब्रह्म स्वामीदेव सोडून तुम्ही ईतर कोणाच्या ही नादी लागू नका. या अखिल ब्रह्मांडात सर्वसत्ताधिश असणारा हा एकच मुळ पुरूष आहे, तुम्ही याची खुणगाठ बांधून ठेवा. ईतर कोणाच्याही नादी लागून आपला आत्मघात करून घेऊ नका. हे पाखंडी लोक तुम्हाला गोड गोड बोलून भरीस घालतील. तुटक्या-मुटक्या चत्मकाराने तूम्हाला फसवतील. पण तुम्ही यांच्या भरीस पडू नका. यांच्या शब्दाला भूलू नका. या पाखंडी लोकांच्या मागे लागल्याने तुमचेच नुकसान होईल. तेव्हा अशा लोकांपासून सावध राहा. असा ईशारा स्वामीसुत करतात.
               पुढे स्वामीसुत म्हणतात की, आज काही लोक हे पाखंडी लोकांच्या मागे धावताना दिसतात. ढोंगी बुवा बाबांच्या मागे धावताना दिसतात. तर काही ईतर दगड धोंड्याच्या देवांना नवस करताना दिसतात. असे महामुर्ख लोक पाहितले की, या लोकांची किव येते आणि वाईट ही वाटते. असे कसे हे लोक पिसाळले आणि भूत पुजाया लागले, याचा खेद वाटतो. हे मुर्ख लोक आपली बुध्दि गहाण ठेवून वागताना दिसतात. ढोंगी बुवांच्या मागे धावतात. तर काही जण दगड धोंड्याचे खोटे देव पुजतात. या देवांना मुक्या प्राण्यांचे बळी देऊन बोंबलताना दिसतात. अंगारे-धुपारे करून खोट्या देवांना हाका मारतात. त्यांना प्रसन्न करण्याचे प्रयत्न करतात. परंतू हे खोटे देव स्वत:च पराधिन असतात तर ते तुमचे काय कल्याण करणार ? ही साधी गोष्ट ही यांना कळत नाही. याचे नवल वाटते. असे स्वामीसुत खेदाने म्हणतात.
               याही पुढे जाऊन स्वामीसुत म्हणतात की, अशा पाखंडी लोकांच्या नादी लागून दगड धोंड्याच्या देवांना मुक्या प्राण्यांचा बळी देणारे, प्राण्यांच्या दावणीच्या दावणी कापणारे, नारळाचे ढिगच्या ढिग फोडणारे मुर्ख लोक हे शेवटी कुंभीपाक नरकाचे वाटेकरी होतात. खोट्या देवांकडून यांना कांडीचाही लाभ होत नाही, मात्र शेवटी नरकवास भोगावा लागतो. म्हणजे जीवंतपणे जीवन जगत असताना हे लोक आपला आपणच सर्वनाश करून घेतात. आपण आपल्या हाताने काळाचा घास बनतात. या पाखंडी लोकांच्या सेवेन यमाच्या दारात पाहूणे बनून जातात. हे यांचे दुर्दैव म्हणावे की, कपाळकरंटेपणा हेच उमगत नाही. असा प्रश्न स्वामीसुतांना पडतो.
               अभंगाच्या शेवटी स्वामीसुत सांगतात की, बाबांनो, अशा पाखंडी लोकांच्या नादी लागून आपला आत्मघात करून घेऊ नका. दगडा-धोंड्याच्या देवांना मुक्या प्राण्यांचे बळी देऊन आपण ही काळाचे घास बनू नका. स्वत:च स्वत:साठी नरकाचे दार उघडू नका. आता तरी जागे व्हा, तुम्ही पुर्ण परब्रह्म स्वामी महाराजांचे सेवक आहात. जो सर्व देवांचा देव आहे, अनंत ब्रह्मांडाचा मालक आहे. ज्याच्यापुढे सर्व शरणांगत आहेत. तो परब्रह्म परमात्मा तुमचा आराध्य दैवत आहे, सदगुरू आहे. तुम्हाला ईतर कोणाच्याही पाया पडायची गरज नाही. कोण्याही बुवा बाबांच्या नादी लागायची गरज नाही. कोणत्याही दगड-धोंड्याच्या देवाला नवस करायची गरज नाही. तुमचे सर्व प्रश्न सोडवण्यास स्वामी ‘समर्थ’ आहेत. त्यांना अनन्यभावाने शरण जा, ते तुमचा संपूर्ण योगक्षेंम चालवतील. तेव्हा ईतर सर्व काही सोडा आणि स्वामींना संपूर्ण शरणांगत भावनेने शरण जा. हिच शेवटची विनंती आपल्या सर्वांना हा स्वामीदास करत आहे. असे स्वामीसुत सांगतात.
               सज्जनहो, परब्रह्म स्वामी महाराज हे आपले सदगुरू आहेत, तेव्हा ईतर कोणाच्याही मागे न लागता, आपण सरळ स्वामी महाराजांना शरण जावे. स्वामी महाराज हेच आपले सर्वस्वी कल्याण करणारे आहेत. तेव्हा ईतर कोणांचाही मागे जाऊन आपल्या आयुष्याचा सर्वनाश करून घेण्यापेक्षा आपण जे होईल ते स्वामींच्या मर्जीने आणि स्वामींच्याच चरणी, असे संकल्प करून जीवनाच्या अंतापर्यंत स्वामींच्याच पायी नतमस्तक व्हावे. हाच संकल्प करून आपण ईथेच विरामू या,  अमंगलाचे ही मंगल करणाऱ्या स्वामींचे नामस्मरण करू या......
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
श्री स्वामीसुत महाराज की जय 
॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥