सर्वांतयामी सवेश्वर स्वामी महाराज !



श्री स्वामी समर्थ
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
स्वामी वैभव दर्शन भाग -02
॥ श्री स्वामीसुताची सत्यवाणी ॥
पुष्प 15 वे
सर्वांतयामी सवेश्वर स्वामी महाराज !
स्वामी भक्तांनो,
               परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे एक सदैव अनाकलनीय असणारे मुळ परब्रह्म तत्व आहे. त्यामुळे आजतागायत कोणालाही स्वामींच्या मुळ दिव्य स्वरूपाची ओळख पुर्णपणे झालेली नाही. स्वामींच्या मुळ स्वरूपाची ओळख वेदांनाही अगम्य असल्यामुळे वेद ही ‘नेति नेति’ म्हणून स्वामींचे सर्वश्रेष्ठत्व मान्य करतात. सर्व देवी देवता ही स्वामींच्या शक्ती सामर्थ्यापुढे नतमस्तक आहेत. तेथे आपल्या सारख्या पामरांना स्वामी शक्तीचे कोडे सुटणे हे अनंत जन्मातही अशक्यप्राय असणारी गोष्ट आहे. तेव्हा आपण आपल्या कल्याणासाठी स्वामी महाराजांना संपूर्ण शरणांगत भावनेने शरण जाणेच हितावह आहे. यातच आपले सर्वस्वी कल्याण आहे.
हिच जाणीव श्री आनंदनाथ महाराज, श्री बाळाप्पा महाराज, श्री स्वामीसुत महाराज आदि सर्व स्वामी भक्तांनी आपल्याला करून दिलेली आहे. या सर्व वंदनीय स्वामी भक्तांच्या मार्गावर वाटचाल करणे, हिच आपली स्नानसंध्या आहे. हिच आपली सर्वश्रेष्ठ साधना आहे.
               स्वामी महाराजांचा कृपाशिर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या मनातील सर्व शंका, गैरसमज, अहंकार दूर करून स्वामींचे नाम चिंतन करणे महत्वाचे आहे. आपल्यातील ‘मी-पणा’ पुर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय स्वामींची कृपा कधीही आपल्यावर होणार नाही. तेव्हा वृथा अहंकार बाजूला करून, सर्वांविषयी प्रेम, सदभावना ठेऊन स्वामींना शरण गेल्यास आपला उध्दार निश्चित आहे. हिच मुळ भावना आज आपल्या अभंगातून श्री स्वामीसुत महाराज आपल्याला सांगणार आहेत.
होऊ नका तुम्हीं वेंडे । व्हावे आमुचे सवंगडे ॥1॥
आनंदे नाचूं स्वामीपुढे । फोडूं काळाचीही तोंडे ॥2॥
गातां स्वामीचें पवाडें । काळ तें बापुडे ॥3॥
समर्थ बाप माझा धनी । हुकुम तयाचें कारणीं ॥4॥
स्वामींचे बांधू मठ झेंडे । बाहुटे लावू चहूंकडे ॥5॥
म्हणूनी नाचावया यावें । स्वामीरूप ते पाहावें ॥6॥
सारथी बाप रथावरी । नाम धनुष्यबाण करी ॥7॥
स्वामीसुत म्हणे कोडे । होऊं नका तुम्हीं वेडे ॥8॥
               श्री स्वामीसुत महाराज सांगतात की, सज्जनहो, तुम्ही आपल्या प्रपंचात, आपल्या संसारात अडकून पडून वेड्यासारखे करू नका. मायामोहात गुरफटणे हा वेडेपणा आहे. असा वेडेपणा करून आत्मघात करून घेऊ नका. या असार संसारात तुम्हाला काहीही लाभ होणार नाही, उलट तुमचा अनमोल मनुष्य जन्म वाया जाईल. दैव योगाने मिळालेली संधी हातातून निघून जाईल. तेव्हा असा वेडेपणा करू नका. आपला नरदेह व्यर्थ घालवू नका. आपल्या विनाशास आपण स्वत:च कारणीभूत ठरू नका. तर आमच्या सोबत या, आमचे संवगडी बना, आमचे मित्र बना. आम्हा स्वामी भक्तांच्या सहावासात या, आमची सोबत करा, म्हणजे तुमचे कल्याण होईल. आमच्या सोबत आल्यावर तुम्ही आम्ही एकत्र मिळून आनंदाने स्वामींच्या पुढे नाचू या. स्वामींच्या भजनात रंगून जाऊ, स्वामी नाम चिंतन करू, ज्यामुळे आपण काळालाही पराजित करून अमर होऊ. स्वामींच्या भजनाने काळाने तोंड  फोडून अजिंक्य होऊ, आपल्या मुखाने सदैव स्वामींचे लीला कथन करू. स्वामींचे पोवाडे गाऊ, जेणे करून प्रत्यक्ष काळ ही आपल्यापुढे हतबल होईल. मृत्यू ही आपला आज्ञाधारक होईल. एवढे सामर्थ्य आणि श्रेष्ठ अधिकार स्वामीनामाचा आहे. असे स्वामीसुत स्पष्ट करतात.
               पुढे स्वामीसुत म्हणतात की, परब्रह्म स्वामी हाच माझा बाप, धनी आहे, माझा मालक आहे. मी या समर्थ बापाचीच चाकरी करतो. माझा बाप मला जो हुकूम करील, त्याचे पालन करणे हेच माझे प्रमुख कर्तव्य आहे. स्वामी शिवाय ईतर कोणाचीही आज्ञा मी पाळत नाही. स्वामीशिवाय ईतर कोणीही माझा धनी नाही. त्यामुळे सर्वत्र स्वामी गुरूंचे मठ उभे करणे, स्वामी नामाचा झेंडा सर्वत्र फडकावणे हाच माझा प्रमुख धर्म आहे. संपूर्ण विश्वात स्वामी नामाचा गजर जागवणे हिच माझी चाकरी आहे. या चाकरीतच माझे सर्वस्वी कल्याण आहे. जर तुम्हालाही आपले कल्याण साधायचे असेल तर तुम्ही या, आणि माझ्या स्वामी बापाचा गजर सर्वत्र जागवण्याचे काम करा. माझ्या स्वामी गुरूंच्या मठात नाचायचे काम करा. स्वामी भजनात रंगून जा. माझ्या स्वामीदेवांचे मंगलमय रुप पाहून आपल्या मनुष्य देहाचे सार्थक करा. आपल्या डोळ्याचे पारणे फेडा. एवढे सुंदर स्वरूप माझ्या स्वामी बापाचे आहे. त्यामुळे माझ्या स्वामींच्या दरबारात या आणि आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्या. हिच सर्व स्वामी भक्तांना विनंती आहे. असे स्वामीसुत म्हणतात.
               सज्जनहो, जसे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचे सारथ्य स्विकारून त्याला विजय मिळवून दिला. अर्जुन जरी धनुष्यबाण चालवत असला तरी त्या बाणाला योग्य दिशा देण्याचे आणि शक्ती पुरवण्याचे काम हे भगवान श्रीकृष्ण करत होते, अगदी तसेच तुमचा योगक्षेंम चालवण्याचे काम स्वामी महाराज करतात. तुमच्या जीवनरूपी रथाचे सारथ्य हे स्वामी महाराज करतात, तेव्हा आपण स्वामी महाराजांना सरळ भावनेने आणि श्रध्दापुर्वक अंत:करणाने शरण जाणे महत्वाचे आहे. मनात कोणताही किंतू, संदेह, शंका न आणता, मनात कोणतेही कोडे न आणता, पुर्णपणे नतमस्तक होऊन स्वामींना शरण जाणे. हेच आपल्या हिताचे आहे. आपल्या मनातील प्रपंच, संसार या विषयी असणारा आसक्तीयुक्त वेडेपणा नाहीसा करून, त्या ठिकाणी परब्रह्म स्वामी महाराजांच्या सेवेचा, भजनाचा, नाम चिंतनाचा वेडेपणा निर्माण करणे, हेच आपले मनुष्य जन्मातील प्रमुख कर्तव्य आहे. हेच आपल्या इहलौकिक आणि पारलौकिक कल्याणासाठी उपयोगी आहे. तेव्हा आपण याचा अंगिकार करावा, असा संदेश स्वामीसुत महाराज अभंगाच्या शेवटी देताना दिसतात.
               समर्थ भक्तांनो, आजच्या अभंगात स्वामीसुत महाराजांनी जागोजागी स्वामी महाराजांचे मठ उभे करा, सर्वत्र स्वामी नामाचा झेंडा फडकवा, हा जो उपदेश दिला आहे. त्याचा शब्दश: अर्थ घेऊन जागोजागी मठ, मंदिर उभे करणे हे आजच्या काळी उपयोगी नाही आणि हे स्वामीसुतांसह प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी ही मान्य नाही. तर जागोजागी दगडा-मातींचे निर्जीव मठ, मंदिर उभे करण्यापेक्षा स्वामींची सेवा ही निस्वार्थ आणि निष्काम भावनेने करावी, स्वामींची सेवा ही शुध्द चित्ताने करावी. स्वामी महाराजांना सेवेच्या संख्येचा डोंगर कधीही मोहित करू शकत नाही, तर स्वामींना शुध्द अंत:करणाने केलेली अल्पसी सेवा ही आपलेसे करू शकते. हा स्वामी महाराजांचा सहज स्वभाव आहे. तेव्हा स्वामींच्या या सहज स्वभावाला समजून घेऊन आपण अल्पसीच मात्र शुध्द मनाने स्वामींची सेवा करावी. स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करावे. मानवतेचा अंगिकार करावा. भूतमात्रावर दया करावी. मुक्या प्राण्यांना प्रेम द्यावे. वृक्षांची जोपासना करावी. अडल्या-नडल्या लोकांना शक्य होईल ती मदत करावी. परदु:ख समजावून घेण्याचा प्रयत्न करावा.  नर हाच नारायण आहे आणि स्त्री हिच आदिशक्ती आहे. याची जाणीव ठेऊन कोणाचीही फसवणूक करू नये. कोणावरही अन्याय करू नये. कोणाच्याही परिस्थितीचा फायदा घेऊ नये. माता-भगिंनीचा सन्मान करावा. अंधश्रध्देचा त्याग करावा. या विषयी जनजागृती करावी. केवळ मुर्ती आणि प्रतिमा यात स्वामींना शोधण्यापेक्षा ‘अकल से खुदा पहचानो’ या स्वामी वचनाप्रमाणे सर्वत्र स्वामींचा शोध घ्यावा. दीन-दु:खितांचे दु:ख करून त्यांच्या आनंदात स्वामींना पाहावे, त्यात दिसणारे स्वामींचे स्वरूप हे निरागस आणि चैतन्यमयी असते. अशा रंजल्या गांजल्यांची सेवा करणे म्हणजेच सर्वत्र स्वामींचे मठ, मंदिरे उभे करणे होय. अशी स्वामींची मंदिरे प्रत्येक गरजवंताच्या मनात उभे राहण्यासाठी सदैव झटणे हिच स्वामींची मुळ सेवा आहे. अन् हाच स्वामींनी दाखवलेला मुळ मार्ग आहे. तेव्हा आपण ही या मार्गावर वाटचाल करण्याचा संकल्प करून स्वामींचे मंगलमय नाम घेऊ या....!
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
श्री स्वामीसुत महाराज की जय 
॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥