स्वामी नामाचे महत्व !



श्री स्वामी समर्थ
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
स्वामी वैभव दर्शन भाग -02
॥ श्री स्वामीसुताची सत्यवाणी ॥
पुष्प 09 वे
स्वामी नामाचे महत्व !
स्वामी भक्तांनो,
               सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयास कारणीभूत असणाऱ्या मुळ पुरूषोत्तम भगवान श्री स्वामी समर्थ देवांच्या सर्वश्रेष्ठ अक्कलकोट भूमीचे महत्व जाणून घेतल्यानंतर आता आपण स्वामी नामाचे महत्व जाणून घेणार आहोत. सज्जनहो, स्वामी महाराजांचे प्रकटीकरण होण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, हे आपण पूर्वीच्या काही भागात पाहिले आहे. यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे जनसामान्यांना आध्यात्माचा खरा मार्ग सांगणे व पाखंड खंडण करणे, हे स्वामी प्रकटीकरणामागील महत्वाचे गमक आहे. आपल्या भोळ्या भाबड्या भक्तांना सहजतेने ईश्वर कसा आपलासा होईल याची माहिती करून देण्यासाठी व त्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी ब्रह्मांडनायक स्वत:च भूवर प्रकट झाला. त्याचे येणे हे दैव रहस्य होते हे जसे सत्य आहे, तसेच त्याचे जाणे हे केवळ दृष्टीभ्रम होते, हे तितकेच अंतिम सत्य आहे.

               जो सर्व चराचरात व्याप्त असून ही आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी सगूण रूपात प्रकट झाला तो नंतर समाधिस्थ होऊन दूर गेला असे म्हणणे म्हणजे हे केवळ आपले अज्ञान प्रकट करणे आहे, असेच मानावे लागेल. काही जणांना ही अतिशयोक्ती वाटेल मात्र याला पुर्ण आधार प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी महाराजांनीच दिला आहे. त्याचे झाले असे की, चैत्र वद्य त्रयोदशी शके 1800 च्या मंगळवारी स्वामींनी समाधी नाट्य रचले आणि लगेच तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी स्वामी महाराज हे आपल्या भक्तांच्या लवाजाम्यासह निलेगावी प्रकट झाले. निलेगावच्या पाटलाला ‘आम्ही तुझे गावी शनिवारी येऊ !’ असे अभिवचन स्वामींनी दिले होते, म्हणून आपल्या शब्दाखातीर समाधीस्थ परब्रह्म शुक्रवार आणि शनिवार असे दोन्ही दिवस निलेगावी प्रकट झाला. यातून स्वामींनी ‘हम गया नही, जिंदा है !’ याचीच प्रचिती दिली आहे. तसेच दुसरा एक प्रसंग आहे, तो असा की, ‘अक्कलकोट स्वामीदर्शन’ हे त्रैमासिक श्री सतीश कुलकर्णी हे सोलापूरहून दर तीन महिन्याला प्रकाशित करत असतात. त्यातील एक अंक ते ‘स्वामी पुण्यतिथी विशेषांक’ म्हणून प्रकाशित करीत असत. परंतू योग्यवेळी स्वामींनी आपल्या एका भक्तांकरवी श्री कुलकर्णी यांना ‘श्री स्वामी पुण्यतिथी विशेषांक ऐवजी श्री स्वामी प्रकटदिन विशेषांक’ म्हणून हे त्रैमासिक प्रकाशित करायला सांगितले. त्यामुळे तेव्हापासून ‘अक्कलकोट स्वामी दर्शन’ चा अंक हा प्रकटदिन विशेषांक म्हणून प्रकाशित केला जातो.
वरील दोन्ही प्रसंगावरून आपल्या लक्षात येईल की, स्वामींनी केलेली समाधी लीला ही एक नाट्यलीला होती. याशिवाय ही हजारो जणांना स्वामींनी आपल्या समाधी नाट्यापश्चात्य आपल्या असण्याचा आणि अस्तिवाचा दाखला दिलेला आहे आणि अजूनही देत आहेत. ‘स्वामी कालही होते, आजही आहेत आणि उद्या ही राहतील कारण ते ब्रह्मांडनायक पुर्ण परब्रह्म आहेत.’
               स्वामी भक्तांनो, जो कोठूनही आला नाही आणि कोठेही गेला नाही, तर सदैव आपल्या सोबत आणि आपल्यातच आहे. अशा परब्रह्माचे नाम घेणे म्हणजेच स्वत:तील ‘स्वा-मी’ ला ओळखणे होय. आत्मा आणि परमात्मा यांचे एकत्व साधणे होय. मुळ परब्रह्माचे दिव्य अंश असणारे आपण मायेच्या प्रभावामुळे आपले दिव्य स्वरूप विसरलो आहोत, या दिव्य स्वरूपाची जाणीव पुन्हा एकदा होण्यासाठी आपण हे स्वामींचे नाम घ्यायचे आहे. स्वत:तील ‘स्वा-मी’ ला ओळखायचे आहे. हे थोडेसे अवघड असले तरी अशक्य असे नाही. अन् ‘अशक्यही शक्य ही करतील स्वामी’ ही ज्यांची ओळख त्यांच्या भक्तांना तर अशक्य हा शब्दच माहित नाही. तेव्हा आपल्यातील परमेश्वर ओळखण्यासाठी एकच उपाय आणि एकच मार्ग आहे, तो म्हणजे स्वामी नामस्मरण. तेव्हा चला तर आजच्या अभंगाद्वारे स्वामी नामाचे महत्व जाणून घेऊ या......
स्वामीलागी ध्याता नसे भवचिंता। तयाची ही सत्ता सर्व जगी ॥1॥
गाता कोणी त्याला नाही वाया गेला। असे या दाखला पुराणाचा ॥2॥
कित्येक तरले पुढे तरतील। भाव-भक्तीबळ धरलीया॥3॥
स्वामीसुत म्हणे ब्रह्मीचा हा ठसा। ठेवा भरवसा याचे पायी ॥4॥
               स्वामींच्या दिव्य हस्तस्पर्शाने ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या हरिभाऊंनी वरील अभंगाद्वारे स्वामी नामाचे श्रेष्ठत्व गायले आहे. स्वामीनामाचे महत्व समजावून सांगताना, ते म्हणतात, ‘ज्याने कोणी स्वामी नामाचे ध्यान केले, त्याला कसलीही भवचिंता शिल्लक राहत नाही. तो सर्व भवतापातून मुक्त होतो. त्याची इहलौकिक आणि पारलौकिक वाटचाल ही सुखकर होते. प्रत्यक्ष काळ हा सुध्दा त्याला सहाय्यभूत ठरतो. कारण तो ज्या स्वामींचे ध्यान करत आहे, तो स्वामी हाच सकल विश्वाचा सर्वसत्ताधिश आहे. जगाचा चालक, मालक आणि पालक आहे. ज्याच्या ईच्छेशिवाय झाडाचे पान ही हालत नाही, तो स्वामी आपला आराध्य असेल तर मग व्यर्थ का धडपड करावी. कशाला ईतर वृथा श्रम करावेत. केवळ स्वामींचे ध्यान करावे, यानेच सर्वस्व लाभेल. असे स्वामीसुत स्पष्ट करतात.
               यापुढे जाऊन स्वामीसुत अधिकारवाणीने सांगतात की, बाबांनो, माझ्या या स्वामींचे नाम घेऊन अथवा ध्यान करून सर्वांचेच कल्याण झाले आहे. सर्वांना अपेक्षेपेक्षा जास्त माझ्या स्वामींनी दिले आहे. माझ्या स्वामींचे नाम घेऊन कोणाचे अहित झाले किंवा कोणी वाया गेला, असा एक ही जीव शोधून ही सापडणार नाही. तर सर्वांचेच सर्वस्वी कल्याण माझ्या स्वामीदेवाने केले आहे. हे केवळ मीच सांगत नाही तर याला सर्व पुराणांचा दाखला आहे. कोणतेही पुराण उघडून पाहा, त्यात ईश्वर सेवेचे फळ हे नक्कीच भेटलेले आहे. ईश्वरसेवेने कोणाचेही कधीही अहित झालेले नाही. हा पुर्वोतिहास आहे. अन् सर्व ईश्वरांचा ईश्वर असणारा माझा सर्वेश्वर श्री स्वामीदेव आहे. तो आपल्याकडे दुर्लक्ष करेल अथवा आपली सेवा व्यर्थ जाईल, अशी पुसटशीही शंका मनात आणू नका. पुर्ण श्रध्देने आपण माझ्या स्वामींदेवांचे ध्यान करावे, नामस्मरण करा, याने आपले जीवन धन्य होईल. हा लक्षावधी लोकांचा स्वानुभव आहे, असे स्वामीसुत स्पष्ट करताना दिसतात.
               स्वामी महाराजांच्या सेवेने कोणाचे अहित तर झालेच नाही, परंतु स्वामी कृपाछत्रात न्हाऊन निघालेले कोट्यावधी जीव आहेत. स्वामींच्या कृपाशिर्वादाने या भवसागरातून तरून गेलेले अनंत जीव आहेत. ज्यांची जीवन नौका ही केवळ स्वामींच्या सेवेने तरली, असे अगणित जीव आहेत. त्यांची गणनाही होऊ शकत नाही. एवढे दयाळू स्वामी महाराज आहेत. अन् हा स्वामी कृपेचा झरा अखंड वाहतो आहे, तो कधीही आटणारा नाही. त्यामुळे जेवढे जीव तरले त्याहून अधिक पुढे ही तरतील, एवढे प्रेमळ आणि सामर्थ्यवान श्री स्वामी देवांचे नाम आहे. तेव्हा आपण ही आपले सर्वस्वी कल्याण साधण्याकरीता ईतर कोणताही अन्य उपाय न करता केवळ स्वामींच्या नामावर अढळ भाव ठेवावा. स्वामी चरणांवर निष्ठा ठेवावी. ज्याने भाव-भक्तीपुर्वक श्री स्वामी देवांचे ध्यान केले, त्याचा योगक्षेमं स्वत: स्वामी महाराज चालवतात. असे अभिवचन स्वत: स्वामी महाराजांनीच दिलेले आहे. त्यामुळे आपण आता तरी ईतरांच्या मागे न लागता स्वामींच्याच चरणी धाव घ्यावी, अशी विनंती स्वामीसुत करताना दिसतात.
               अभंगाच्या अंतिम चरणात स्वामीसुत मनुष्याचा चंचल स्वभाव आणि अस्थिर मन याचा विचार करून पुन्हा पुन्हा बजावून सांगतात की,  सज्जनहो, आपण मनुष्य प्राणी सहजासहजी कोणावरही विश्वास ठेवतो, आपण सत्यासत्य याचा पुरेसा विचार करत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा आपण ईतरांच्या सांगण्यावरून पुर्व संचिताने मिळालेले हे स्वामी चरण निधान सोडून ईतर निरर्थक गोष्टीच्या मागे जाऊन आपली वाताहात करून घेतो. देवांनाही दुर्लभ असणारे हे सद्गुरू चरण सोडून आपण आत्मघात करून घेतो. तेव्हा असे कोणाचेही काहीही ऐकून आपले अहित करू नका. तर देवांचेही देव श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपले हित साधा. हे स्वामी चरण साधेसुधे नाहीत तर देवांनाही वंदनीय आहेत. हे चरण पुर्ण पुरूषोत्तम परब्रह्म भगवान असणाऱ्या ब्रह्मांडनायक स्वामी महाराजांचे आहेत. त्यामुळे हे अंतिम सत्य आहेत. तेव्हा याच अंतिम तत्वाला शरण जाऊन आपले कल्याण साधावे. स्वत: परब्रह्मानेच अक्कलकोटी आपल्या परब्रह्म असल्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे. आपला सर्वश्रेष्ठ अधिकार सर्वांना दाखऊन दिलेला आहे. तेव्हा आता या प्रत्यक्ष परब्रह्माच्या शब्दावर विश्वास ठेऊन आपण स्वामी पंथाचे अनुकरण करावे आणि स्वामी नामाचे ध्यान करावे. स्वामी महाराजांवर पुर्ण श्रध्दा ठेवावी. यातच आपल्या सर्वांचे सर्वस्वी कल्याण आहे. असे स्वामीसुत स्पष्ट करून सांगतात.
               सज्जनहो, श्री स्वामीसुत महाराज हे तरूण वयात वयाच्या केवळ 30 व्या वर्षी सर्वसंग परित्याग करून स्वामींचे प्रचार कार्य करायला लागले. ज्या वयात वासनेने चरणसीमा गाठलेली असते, त्याच वयात त्यांनी वासनेचा त्याग करून, जगत् कल्याणाचे महान कार्य हाती घेतले. त्या महान स्वामी भक्तांने केलेला हा उपदेश म्हणजेच प्रत्यक्ष स्वामी महाराजांनीच त्यांच्याकडून वदवून घेतलेले हे दिव्य शब्दसुमन आहेत. तेव्हा आपण वरील शब्दावर पुर्ण विश्वास ठेऊन, सेवा करावी. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे ध्यान करावे, स्वामी नामाचे चिंतन करावे. याऊपर काहीही करायची फारशी आवश्यकता नाही. कारण केवळ स्वामी नाम स्मरणानेच भवपार तरून मोक्षाचे धनी झालेले हजारो महात्म्ये आहेत, ज्यांनी स्वामी नामाशिवाय ईतर काहीही साधना केलेली नाही, तरीही त्यांना स्वामींनी मुक्ती प्रदान केलेली आहे. तेव्हा आपण ही पुर्ण श्रध्देने स्वामी नामाचे चिंतन करून, श्री बाळाप्पा महाराज, श्री चोळाप्पा महाराज, श्री आनंदनाथ महाराज, श्री स्वामीसुत महाराज,श्री बीडकर महाराज, श्री गोपाळ बुबा केळकर महाराज, श्री वामन बुबा वैद्य महाराज, श्री शंकर महाराज, श्री पिठले महाराज इ. स्वामी भक्तांप्रमाणे स्वामी कृपेने धनी होऊ या..... सदैव स्वामी नाम गाऊ या......
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥
अंनतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय !
अक्कलकोट स्वामी महाराज की जय !
श्री स्वामीसुत महाराज की जय 
॥ श्रीस्वामीसमर्थमहाराजार्पणमस्तु ॥