मायाधिपती सर्वेश्वर स्वामी महाराज !



श्री स्वामी समर्थ
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
स्वामी वैभव दर्शन भाग -02
॥ श्री स्वामीसुताची सत्यवाणी ॥
पुष्प 10 वे
मायाधिपती सर्वेश्वर स्वामी महाराज !
स्वामी भक्तांनो,
                              या भूतलावर जन्म घेतलेल्या प्रत्येकालाच एक दिवस हे नश्वर जग सोडून जावे लागणार आहे. त्यात कोणाचीही सूटका नाही. अगदी येथे अवतीर्ण झालेल्या राम, कृष्णादि देवतानांही शरीराचा त्याग हा करावाच लागला. तेथे आपला काय पाड लागणार ? पण गमंत अशी की, आपण आज ना उद्या जाणार आहोत, याची जाणीव प्रत्येकाला असूनही आपण आपल्या मनाप्रमाणे जीवन जगतो, मनमौजीपणा करतो. आपल्या सुखासाठी इतरांचा बळी देतो, त्यांना त्रास देतो. या ना त्या प्रकारे आपण सूखी होण्याचा अट्टहास धरतो. जगातील नश्वर व क्षणिक लाभदायक गोष्टिच्या मागे दिवस-रात्र धावतो. परंतु महत्प्रयासाने मिळालेला हा नरदेह कसा सार्थकी लागेल,
याचा विचार कोणीही सहसा करत नाही. किंवा भौतिक सुखासाठी  आपण हा अनमोल मनुष्य देह व्यर्थ झिजवत आहोत, याबद्दल कोणालाही वाईट वाटत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. लक्ष चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यानंतर आपल्याला हा दुर्लभ मनुष्य जन्म मिळालेला आहे, याचे सार्थक करून मोक्षाचे धनी व्हावे, याचा साधा विचार ही कोणी करताना दिसत नाही. जो तो आपल्या पोटाची खळगी भरण्यात किंवा प्रापचिंक मायामोहात गुरफुटून गेला आहे. या प्रपंचात जास्त अडकून पडल्यामुळे तो आपली पुर्व ओळख व पुढिल ध्येय यापासून अनभिज्ञ आहे. याच अज्ञानात हा अनमोल नरदेह व्यर्थ जात आहे. अन् एकदा हा जन्म वाया गेला की, मग पुन्हा लक्ष चौऱ्याऐंशीचा महाफेरा प्रत्येकाला भोगावा लागणार आहे.
               याचाच विचार करून लोकांना संसाराचे, प्रपंचाचे फोलपण दाखऊन त्यांचे हित कशात आहे, याची जाणीव स्वामीसुतांनी आजच्या अभंगाद्वारे करून दिलेली आहे. आजचा अभंग हा मायामोहात गुंतून गेलेल्या मनुष्याला सत्याची वाट दाखवणारा व त्याच्या चुकीची जाणीव करून देणारा आहे. क्षणोक्षणी संपत असलेले जीवन आणि मृत्यूकडे होत असलेली वाटचाल सर्वांच्या लक्षात आणून देऊन स्वामीसुतांनी सर्वांना जागृत करण्याचे काम  केले आहे. तेव्हा आपण आता अधिक वेळ न लावता आजच्या अभंगाला सुरूवात करू या…..
सावध आधींच व्हा हो तुम्हीं लक्ष ठेवा स्वामीनामीं ॥1॥
लहानपण खेळामाजीं । वय घालविले सहजीं ॥2॥
तरुणपणीं विषयभर । त्यांत भुलला गव्हार ॥3॥
बायका-मुलांचा घोटाळा।  तेथ रंगोनियां गेला ॥4॥
मग म्हातारपण आलें । काय होईल तुमचें भलें ॥5॥
दांत हालती, जीभ लुळी । मग कासयासी बोली ॥6॥
हात हाले, मान डुले।  पाय कापूं ते लागले ॥7॥
सर्व अवयव लुळे झाले।  स्वामीनाम कैसे बोले ॥8॥
मग नव्हे कांही तुम्हा।  कोण घेईल तुमचा जिम्मा ॥9॥
काळ येऊनि अकस्मात । करील समूळ तुमचा घात ॥10॥
जन्म दिला हो जयांनी।  त्यासी भुलले प्राणी ॥11॥
आतां सर्वजण आधीं । सावध होऊनी साधा संधी ॥12॥
स्वामीसुत सावध होणें।  म्हणे स्वामीनाम घेणें ॥13॥
               सद्गुरूचा सत्संग लाभल्यामुळे जीवनात लख्ख प्रकाश पडून स्वामीसुत मायेच्या प्रभावातून मुक्त झाले. त्यांना आपला जन्म का व कशासाठी झाला आहे, याची जाणीव झाली. हिच जाणीव सर्वांना करून देताना स्वामीसुत म्हणतात की, सज्जनहो ! स्वामी कृपेने तुम्हाला हे जीवन मिळाले आहे, हे वाया जाण्यापूर्वीच तुम्ही सावध व्हा आणि आपले लक्ष स्वामींच्या नामात लावा. कारण अंतिम समयी हे स्वामी नामच तुम्हाला तारणार आहे. याशिवाय तुमचा उध्दार होणार नाही. हिच गोष्ट अजून चांगल्या पध्दतीने समजावून सांगताना पुढे स्वामीसुत सांगतात, बाबांनो, आपले लहानपण हे खेळण्यात आणि बागडण्यात गेले आहे. बालपणात अगदी सहज वय आपण घालवले आहे. या वयात आपल्याला कोणतीही समज नव्हती, त्यामुळे हे वय सहजासहजी गेले आहे. नंतर पुढे तरूणपण हे विषय वासनेत आपण घालवले आहे. ज्या वयात आपण प्रपंच करत करत ईश्वर प्राप्तीसाठी श्रम घ्यावेत, त्या वयात आपण मुर्खपणाने आकंठ वासनेत गुरफटले जातो. विषय वासने शिवाय आपल्याला ईतर कशातही राम दिसत नाही. एवढी भयानक आपली अवस्था होते. बायको आणि मुलांच्या घोटाळ्यात आणि क्षणिक सुखात आपण रंगून जातो, ईतर कशाचेही भान आपणाला राहत नाही. किंवा आपण स्वत:ही यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाहीत. एवढी आसक्ती आपल्याला या प्रपंचाविषयी असते.
               यानंतर मग तारुण्य लोप पावून म्हातारपण येते, जरावस्था प्राप्त होते. यावेळी आपले शरीरच आपल्याला सांभाळता येत नाही, तर मग ईश्वर प्राप्ती कशी करणार ? असा प्रश्न स्वामीसुत विचारतात. या वयात दात हालतात किंवा बऱ्यापैकी पडलेले असतात. वाचा किंवा जीभ ही सुध्दा लुळी पडून बोबडी वळते. नीट बोलताही येत नाही, उच्चार ही अस्पष्ट निघतात, त्यावेळी काय ईश्वर चिंतन करणार ? एवढेच नाही तर हात हालू लागतात, मान डोलायला लागते, पाय लटालटा कापू लागतात. नीट चालता ही येत नाही, आणि उभे ही राहता येत नाही. सर्वच अवयव थकलेले आणि निरूपयोगी झालेले असतात. लुळे पडलेले असतात. अशावेळी कसे स्वामी नाम घेणार ? असे स्वामीसुत विचारतात. मुखाने नाम घ्यावे तर जीभ लुळी पडून बोबडी वळते, हाताने टाळी वाजवावी तर हात ही लुळे झालेले, पायाने वारी करावी तर नीट उभे ही राहता येत नाही तर कशाची वारी आणि कशाची प्रदक्षिणा ? अशी अवस्था प्राप्त झाल्यावर मग कशी स्वामी सेवा करावी ? कसे स्वामी नाम घ्यावे ? असा मार्मिक प्रश्न स्वामीसुत विचारताना दिसतात.
               यापुढे ते म्हणतात, जर तुम्ही बालपण खेळण्यात, तरूणपण विषयात घालवले आणि म्हातारपण हे परावलंबीपणात व्यर्थ गेले, तर मग तुमचे कल्याण कसे होणार ? तुम्हाला मुक्ती कशी मिळणार ? अन् तुमच्या कल्याणाची जबाबदारी तरी कोण घेणार ? एक दिवशी काळ अकस्मात येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. काहीही शिल्लक ठेवणार नाही. समूळ तुमचा नायनाट होईल. मग कोण कोणाचे नातेवाईक आणि कोण कोणाचा मुलगा ? एकदा जीव गेला की संपले, मग जास्त वेळ कोणी मढे दारात ठेऊ देत नाही. बायको दारापर्यंत आणि नातेवाईक स्मशानभूमीपर्यंत आणि मुलगा राख पाण्यात मिसळेपर्यंत तुमची सोबत करतो. त्यानंतर मात्र मुलगा ही जन्म देणाऱ्या बापाला काही वेळाने विसरून जातो. ईतर सर्वांनाही विसर पडतो. पण नंतरची वाटचाल ही तुम्हालाच करावी लागते. तेथे कोणीही सोबत नसते. कोणाचाही वशिला चालत नाही. तेथे कोणतीही पळवाट नसते. तेव्हा सावध व्हा, आणि यातून योग्य तो बोध घ्या. असे स्वामीसुत सांगतात.
               ते म्हणतात, बाबांनो, हिच आपल्या सर्वांची अवस्था आहे, आपल्या विषयभोगामुळे हिच गती आपल्याला मिळणार आहे. तेव्हा भविष्याची पावले ओळखा, सावध व्हा. खडबडून जागे व्हा. भानावर या. मिळालेल्या संधीचे सोने करा. हिच शेवटची संधी आहे, ही संधी साधा. परत आता संधी ही नाही. अन् सांगणारा ही कोणी नाही. तेव्हा त्वरीत सावध व्हा. मायेच्या मोहातून जागे व्हा. मायेच्या आहारी जाणे सोडा. आहारी जायचेच असेल तर माझ्या बापाच्या आहारी जा. स्वामी देवांचे भजन करा. माझ्या बापाचे नामच तुमचे कल्याण करणारे आहे. हेच तरणोपाय तुमच्याकडे शिल्लक आहे. तेव्हा सज्जनहो, आता तरी जागे व्हा, सावध व्हा. आणि स्वामी नामाचे चिंतन करून आपले जीवन सार्थकी लावा. य नरदेहाचे सार्थक करा. मोक्षाचे मानकरी व्हा. मुक्तीचे भागीदार व्हा. हेच आपल्या जीवनाचे अंतिम कर्तव्य आहे. तेव्हा याचा विचार करून, आचरण करा. आपला मार्ग बदला. प्रपंच करत करत परमार्थ करा. वासनेत अडकून पडू नका, तर वासनेला जिंका. म्हणजे माझा स्वामी देव तुम्हाला सापडेल. यासाठी सतत माझ्या स्वामींच्या नामाचा जप करा. चिंतन करा, भजन करा. हिच आपल्याला शेवटची प्रार्थना आहे. असे स्वामीसुत अभंगाच्या शेवटी सांगतात.
               सज्जनहो, स्वामीसुतांनी वरील अभंगाद्वारे मानवी जीवनाचे यथायोग्य आणि वास्तविक असे वर्णन केलेले आहे. हा अभंग म्हणजे सर्वांचे डोळे उघडणारा अभंग आहे. तसेच बऱ्याच वेळा तरूणपणी आध्यात्मिक सेवा करताना, अनेक जण सांगतात, हे काय वय आहे का ? या वयात मौज मजा करावी व मग म्हातारपणी देवधर्म आणि तीर्थयात्रा करावी. अशा आत्मघाती लोकांना वरील अभंग हा झणझणित अंजन ठरणारा व सत्य स्थितीचे वर्णन करणारा आहे. तेव्हा आपण ही स्वामीसुताची ही सत्यवाणी ऐकून आपले जीवन हे स्वामीनामी एकरूप करावे. आपला प्रपंच, आपला संसार करत करत आध्यात्मिक वाटचाल व स्वामींची सेवा करावी, स्वामी नामाचा ध्यास धरावा. स्वामी नामाचे भजन चिंतन करावे. म्हणजे मग वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करायची गरज भासणार नाही. अन् आपला अनमोल नरदेह ही वाया जाणार नाही. तर स्वामींच्या सेवेने त्याचे सार्थक होऊन आपले सर्वस्वी कल्याण होईल. तेव्हा आता या क्षणापासून आपण हित साधू या. मागिल सर्व सोडून देऊन आता यापुढे स्वामी नामात दंग होऊन आपल्या मनुष्य जन्माचे सार्थक करू या…...
श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ।
सद्गुरू स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ॥